विद्यापिठातील साम्यवाद्यांची नाटके !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे हे अमृत महोत्सवी वर्ष ! ‘शिक्षणाचे माहेरघर’, ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’, अशी बिरूदे मिरवणार्‍या विद्यापिठाची कधी नव्हे, तेवढी अनावश्यक चर्चा काही ना काही कारणाने गेल्या काही दिवसांपासून होत आहे; पण ही चर्चा जाणीवपूर्वक केली जात आहे का ? कि कुणी काही घडवून आणण्यासाठी अदृश्यपणे काम करत आहे ? यामागे काही राजकीय ‘प्रपोगंडा’ (प्रचार) आहे का ? याचे या निमित्ताने चिंतन…

ललित कला केंद्राने सादर केलेल्या नाटकातील एक प्रसंग

१. २ फेब्रुवारी २०२४ च्या घटनेचा साक्षीदार म्हणून…

सावित्रीबाई फुले विद्यापिठाचा ‘ललित कला’ हा कला, नाट्य, संगीत शिक्षण आणि प्रशिक्षण देणारा विभाग. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ‘जब वुई मेट’ हा परीक्षा प्रयोग प्राध्यापक, विद्यार्थी आणि कलाप्रेमी या सर्वांसमोर चालू असतांना प्रयोगाच्या प्रारंभी राम, सीता, लक्ष्मण आणि रावण या पात्रांच्या तोंडी विनोदासाठी अश्लील भाषा वापरण्यात आली. लक्ष्मण-सीता यांना विसंगत उपमा आणि गलिच्छ शिव्या देण्यात आल्या. ‘भागा भागा राम भागा’, हे न पटणारे पार्श्वगीत, याची परिसीमा म्हणून सीतेच्या तोंडी सिगारेट दाखवण्यात आली; तेव्हा मात्र अनेक सज्ञान प्रेक्षक आणि अभाविपचे कार्यकर्ते यांना ते न पटल्याने प्रयोग थांबवण्यात आला.

जेव्हा अभाविपचे कार्यकर्ते आणि काही विद्यार्थी कला मंचावर गेले, तेव्हा ललित कलाच्या आक्रमक विद्यार्थ्यांनी ‘व्हिडिओ शूटिंग’ (चलचित्रण) करणार्‍या सामान्य विद्यार्थ्याला धक्काबुक्की केली. या वेळी वादावादी झाल्यानंतर ललितच्या विद्यार्थ्यांनी काठ्या, टिकाव, रॉड काढून हिंसक प्रतिक्रिया देत काहींना मारहाण केली. अर्थात् गोंधळ होणार, याची कल्पना असल्यानेच त्यांनी पूर्वसिद्धता केली असावी. याचा व्हिडिओ आणि रुग्णालयाची देयके यांचा पोलिसांनी प्रथमदर्शनी अहवाल नोंद करतांना आधार घेतला. घडलेल्या प्रसंगामध्ये राजकीय संधी दिसतात. हिंदूविरोधी संघटना आणि त्यांनी पाळलेली मिडिया यांनी ‘अभाविपने मारहाण केली’, असा उलट कांगावा केला.

‘प्रा. भोळे अन् कलाकार यांनी क्षमा मागावी आणि प्रकरण मिटते घ्यावे’, असा पवित्रा अभाविप आणि श्रीराम यांच्यावर श्रद्धा असणार्‍यांनी घेतला; मात्र दिलगिरी तर व्यक्त केली नाहीच, उलट अरेरावी अन् उर्मट वर्तन करत ‘तुम्हाला पोलिसांत दाखवू’, अशा शब्दांत घडलेल्या घटनेचे समर्थन केले. परिणामी प्रकरण चिघळले आणि विद्यापिठाला कलंकित केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ ललित कला केंद्र

२. या निमित्ताने काही प्रश्न

अ. अभिव्यक्तीस्वातंत्र्यासह मर्यादांचे बंधन आवश्यक : हा प्रयोग ललित केंद्राच्या अंतर्गत परीक्षेचा भाग होता आणि ‘पडद्यामागच्या कलाकारांचे आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न होता’, असा दावा करण्यात आला; मात्र अंतर्गत परीक्षा असो वा कलाकारांची पडद्यामागची भूमिका दाखवण्याचा प्रयत्न असो, हिंदु देवीदेवता हाच विषय अश्लील विनोदासाठी का असावा ? इतकीच धार्मिक चिकित्सक विनोदाची खाज असेल, तर इतरही धर्मांचे कधी विडंबन करून तर बघा ! मुळातच हिंदू पूर्वापार सहिष्णू असल्यामुळे त्यांची द्वेषातून गळे चिरण्याची विकृती नाही. रामायण, महाभारत ही महाकाव्ये आणि यांतील श्रीराम, सीता, लक्ष्मण, श्रीकृष्ण या देवता भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक मनुष्यासाठी परम आदर्शच आहेत. अनेकांच्या श्रद्धेशी खेळणारी कोणती अभिव्यक्ती असू शकते ? राज्यघटनेच्या ‘कलम १९ (१)’ अनुसार अभिव्यक्तीसह काही मर्यादांचेही बंधन आहे; मात्र ‘केवळ’ हिंदु धर्म आणि संस्कृती याला अपवाद असल्याप्रमाणे सर्व चालू आहे.

आ. … तर ही अभिव्यक्तीस्वातंत्र्यांची गळचेपीच होत नाही का ? : मागील दोन वर्षांपासून अप्रत्यक्षपणे अनेकदा हिंदु अस्मिता, संस्कृती यांचे विडंबन करण्याचा प्रयत्न होत आहे. अनेकदा काही विद्यार्थ्यांनी मौखिक तक्रार विभाग प्रमुखांकडे केली. विद्यार्थ्यांना अमान्य असूनही गुणांच्या भीतीमुळे असे प्रयोग करावे लागतात. काही प्राध्यापक जाणीवपूर्वक अशा गोष्टी करण्यास पाठबळ देतांना दिसतात, असा अनेक विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

इ. पुणे विद्यापिठाला ‘जे.एन्.यू.’ (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) कोण करत आहे ? : खरे तर ‘जे.एन्.यू.’लाच रचनात्मक पद्धतीने साम्यवाद्यांनी विद्यार्थी चळवळींच्या नावाखाली देशविघातक आंदोलने आणि विशिष्ट धर्म अन् संघटनांच्या द्वेषापोटी नक्षलवाद, आतंकवाद, जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करून अपकीर्ती करण्याचे महापाप केले. यात कन्हैय्या कुमार, उमर खालिद, योगेंद्र यादव यांच्या संघटना आणि विद्यापिठातील अनेक प्राध्यापक सहभागी आहेत, जे त्यांच्या कृती आणि विचार यांचे जाहीर समर्थन करतात. काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंबॉयसिस, मॉडर्न कॉलेज आणि आताची ‘एफ्.टी.आय.’ (भारतीय फिल्म इन्स्टिट्यूट) या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत रामलल्लाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी बाबरी मशीदचे समर्थन केले. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता हिंसा केली, म्हणजेच यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि के.के. महंमद (भारतीय पुरातत्व खात्याचे माजी संचालक, ज्यांनी श्रीराममंदिराचे अवशेष खोदून काढले होते.) यांचा अहवाल मान्य नाही. अर्थातच तिथे ‘श्रीराम’ आहेत म्हणून !

गेल्याच वर्षी विद्यापिठामधील प्रश्नांच्या नावाखाली आंदोलनात देहलीत ‘मोदी सरकारसे आझादी’, ‘हिंदुत्व से आझादी’, अशा घोषणा दिल्या गेल्या. स्वतंत्र भारतात ‘आझादी’ ओरडणार्‍यांना नेमकी कोणती ‘आझादी’ (स्वातंत्र्य) पाहिजे ? यातील छुपा ‘अजेंडा’ (कार्यसूची) लक्षात घेणे आवश्यक आहे.

ई. विद्यापिठामध्ये खरेच विद्याभ्यास होत आहे का ? : अनेक वेळा तथाकथित साम्यवादी संघटना विनाकारण विद्यापिठाच्या प्रशासनाला वेठीला धरत आहेत. राजकीय संघटना आणि नेते यांच्या सहभागाने केवळ (हस्तक्षेप) ‘मिडिया’मध्ये (माध्यमांमध्ये) पोकळ हवा करत आहे. यासाठी काँग्रेस, मार्क्सवादी, आंबेडकर यांच्या साहित्याचा विपर्यास करून हिंदूविरोधी प्रक्षोभक वक्तव्ये करण्याचा, विद्यापिठातील कर्मचार्‍यांना अरेरावी करत त्यांचा अपमान करून राजकीय ‘स्टंट’ करण्याचा विद्यापीठ हा अड्डा होत आहे का ? याची चिंता वाटायला लागली आहे. याचे कारण, म्हणजे८ ते १० वर्षे विद्यापिठात केवळ अभ्यासाच्या नावाखाली घालवायची, अनावश्यक विषयात ‘पीएच्.डी.’ (विद्यावाचस्पति) करून सरकारची शिष्यवृत्ती लुटायची, माफक दरात वसतीगृह मिळते आणि आता फुकट भोजनही !

विद्यार्थी नेता म्हणून मिरवायचे, राजकारणाच्या स्वप्नात स्वतःसह कुटुंबालाही उद्ध्वस्त करायचे, स्वत:च्या बौद्धिक दिवाळखोरीची कमतरता झाकण्यासाठी ‘नोकर्‍या कुठे आहेत?’, असे म्हणत पुन्हा आजच्या सरकारलाच दोष द्यायचा, हाच यांचा दिनक्रम !

३. छुपा ‘अजेंडा’ 

विद्यापिठामध्ये अनेकदा नाटक, लोकगीत, व्याख्यानमाला, चर्चासत्र यांतून अनेक विभागांमध्ये साम्यवादी विचारसरणी असणारे वादग्रस्त लेखक, विचारवंत यांची व्याख्याने विद्यार्थ्यांच्या माथी मारली जातात. त्यांना केवळ क्रांतीची भाषा शिकवून वैचारिक हिंसक घडवण्याचा प्रयत्न होत आहे. विद्यापिठाचा अभ्यासक्रम ठरवतांना साम्यवादी विचारवंत आणि हिंदूविरोधी लेखक यांचीच पुस्तके का निवडली जातात ? याचाच अर्थ फार विचार करून व्यवस्थेवर वर्चस्व निर्माण करण्याचा डाव आखला जात आहे, यात तीळमात्र शंका नाही.

४. प्राध्यापकांची नव्या पिढीला भ्रमित करण्याची भूमिका

युवकांच्या बौद्धिक नवनिर्मितीचे उत्तरदायित्व ज्यांच्यावर आहे, तेच प्राध्यापक साम्यवादी विशिष्ट द्वेषात्मक राजकीय विचारांचा पट्टा गळ्यात घालून नव्या पिढीला भ्रमित करत आहेत. गुणांचा प्रश्न असल्याने विद्यार्थी सज्ञान असूनही शांत रहातात; कारण व्यक्तीगत भविष्याचा प्रश्न असतो.

५. हिंदुद्वेषाचे अजून एक उदाहरण

विद्यापिठात अनेक वेळा हिंदु धर्माच्या उत्सवांना सहजासहजी अनुमती दिली जात नाही. गणेशोत्सवात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे विचार मांडणार्‍या वारकरी संप्रदायाच्या युवा कीर्तनकारांचे कीर्तनही विद्यापीठ प्रशासन अन् काही हिंदुद्वेषी विद्यार्थी संघटनांनी होऊ दिले नाही. उलटपक्षी पोलीस कारवाईची चेतावणी दिली.

६. श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने साम्यवाद्यांनी केलेला विरोध

२२ जानेवारी २०२४ या दिवशी संपूर्ण देश दिवाळी साजरी करत होता. त्या दिवशी महाविद्यालय परिसरात श्रीराममंदिराच्या सदिच्छा संदेशाची पत्रके वाटतांनाही विरोध केला. त्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करून, फीत बांधून, मांसाहाराच्या मेजवान्या करण्यात आल्या. ‘स्टेटस’ ठेवून अप्रत्यक्षपणे भावनात्मक डिवचवण्याचा प्रयत्न केला गेला, यातून अनेकांना काय साध्य करायचे आहे ? कोणते प्रति आव्हान ते देऊ पहात आहेत ? इकडे सतर्कतेने लक्ष ठेवायला हवे.

७. छोट्या स्वरूपातील भ्रष्टाचाराची पेरणी

अक्षरशः धार्मिक किंवा जातीय आधार घेऊन काही प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थ्यांना असंतुलित वागणूक देतात. प्रशासकीय कामे करण्यासाठी लाच मागितली जाते. लाच घेणारा रंगेहात पकडला गेल्यावर काँग्रेसप्रणीत कामगार संघटना त्याच्या संरक्षणासाठी लगेच धावून येते, म्हणजे याला पाठीशी कोण घालते ? हे स्पष्ट होते.

८. विद्यापिठात नेमके कशाचे शिक्षण ? 

पुण्यातील ‘श्री शंकर महाराज ट्रस्ट’ हे गरीब, वंचित विद्यार्थ्यांना एक वेळ विनामूल्य जेवण वाटप करत असतांना विद्यार्थी हित न पहाता काँग्रेस आणि साम्यवादी संघटना यांनी जाणीवपूर्वक हिंदु धर्माचे म्हणून प्रचंड विरोध का केला ? २ मासांपूर्वी घटनात्मक पदावरील पंतप्रधानांविषयी अतिशय खालच्या भाषेत भिंतीवर व्यक्तीगत टिपणी सर्वसामान्य कुटुंबातून शिकायला आलेला विद्यार्थी एकटा कसा काय करू शकतो ? यामागे नेमके कोण आहे ? आणि याचे खुले समर्थनही केले जाते ? हे विचार करायला लावणारे आहे. घटनात्मक सरकार आणि व्यवस्था असूनही राजकीय, आदर्शवादी सिद्धांताची मोडतोड करून, विद्यार्थ्यांच्या मनात अन्यायाच्या भावनेला चिथावणी देऊन त्यांना वैचारिक द्वेषात्मक अन् हिंसक कोण करत आहे ? सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा ‘ब्रेन वॉश’ (बुद्धीभेद) करून रामायण-महाभारत, भारतीय संस्कृती आणि परंपरा, विचारधारा कपोलकल्पित आहेत, या विषयावर याच विद्यापिठात चर्चासत्र आयोजित का होतात ?

९. ढोंगी चेहर्‍यावरील पडदा वेळीच दूर करणे अत्यावश्यक !

राज्यघटनेचा कांगावा करणार्‍यांनी दुसर्‍याचेही मूलभूत स्वातंत्र्य, हक्क आणि अधिकार यांचा अभ्यास करावा. केवळ समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य यांच्या पोकळ वल्गना करू नयेत. त्या ढोंगी वाटतात. याच कपटी अजेंड्याचा शोध जागृत समाज आणि व्यवस्था यांनी वेळीच घेणे अत्यावश्यक आहे.

१०. पुढील पिढ्यांना दिशा देण्यासाठी प्रभु श्रीराम हेच आदर्श ! 

आपल्याला व्यक्ती, समाज निर्माण करून पुढील पिढ्यांची दिशा आणि दशा ठरवण्यासाठी रावण नाही, तर प्रभु श्रीरामच दीपस्तंभ आहेत ! प्रभु श्रीराम हे धार्मिक श्रद्धेच्याही पलीकडे व्यक्तीगत, कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय जीवनातही प्रेरणास्रोत आहेत. सामाजिक सुधारणेत स्वामी दयानंद सरस्वतींपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत धार्मिक सुधारणेत संत कबीरांपासून वारकरी संप्रदायापर्यंत अनेकांच्या केंद्रस्थानी प्रभु श्रीरामच आहेत. ज्या मूलभूत हक्कांचा आज ऊहापोह केला जात आहे, त्याच राज्यघटनेच्या तिसर्‍या प्रकरणाच्या प्रारंभी डॉ. आंबेडकर यांनी राम, लक्ष्मण, सीता यांचे सुंदर चित्र मूळ राज्यघटनेवर रेखाटून घेतले आहे. त्याग, तपस्विता, समभाव, एकवचनी, एकनिष्ठ, तत्त्वपरायण, आदर्श पुत्र, पती, पिता, प्रजापती आणि शत्रूही असे हे मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीराम अनंत, अनादी, अटळ अन् शाश्वत सत्य आहे; म्हणून सूर्याकडे पाहून थुंकणार्‍यांनी आपल्या चेहर्‍याचे आणि चारित्र्याचे अगोदर आत्मचिंतन करावे !

लेखक : श्री. महेश रहाणे, राज्यशास्त्र विभाग विद्यार्थी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. 

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, ११.२.२०२४)