Pune Drug Adict Girls : पुणे येथील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणार्‍या तरुणींचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर नशेचे माहेरघर होईल ! – अभिनेते रमेश परदेशी यांची संतप्त प्रतिक्रिया !

अभिनेते रमेश परदेशी

पुणे – येथील अमली पदार्थांची तस्करी करणारा ललित पाटील या अटक केल्यानंतर शहरात अमली पदार्थांच्या होत असलेल्या तस्करीविषयी बरीच माहिती पुढे आली होती. मिळालेल्या माहितीनुसार सांस्कृतिक शहर असलेले पुणे शहर अमली पदार्थांचे केंद्र होऊ लागले आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी उपाख्य पिट्या भाई यांनी पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणार्‍या तरुणींचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या ‘व्हिडीओ’मध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे, तर दुसरी मुलगी अमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे नशेत बडबड करतांना दिसत आहे. ‘प्रत्येक पुणेकराने विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर नशेचे माहेरघर होईल’, असे अभिनेते रमेश परदेशी यांनी म्हटले आहे.

सौजन्य : एबीपी माझा 

पुणेकरांसाठी वेताळ टेकडी शहरातील महत्त्वाचे स्थान आहे. ही टेकडी वाचवण्यासाठी पुणेकरांनी आंदोलने केली आहेत. अनेक जण फिरण्यासाठी वेताळ टेकडीवर नियमित येत असतात; परंतु आता या टेकडीवर जे चालले आहे, ते पाहिल्यावर पुणेकरांना धक्का बसला आहे. पुणेकरांची ही भावना मराठी अभिनेता रमेश परदेशी याने समोर आणली आहे. ‘एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहीण म्हणून आपण याकडे गांभीर्याने बघणार आहोत की नाही ?’, असा रोखठोक प्रश्‍नही रमेश परदेशी यांनी विचारला आहे.

संपादकीय भूमिका 

आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थाचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो !