उद्या (२६ फेब्रुवारी २०२४ या दिवशी) स्वातंत्र्यवीर सावकर यांचा स्मृतीदिन (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी योगशास्त्राचा अभ्यास केला होता. कुंडलिनी जागृतीची अनुभूती घेतली होती. हिंदु महासभेच्या ध्वजावर त्यांनीच ‘कुंडलिनी’ अंकित केली होती. मोठेपणी सगुण मूर्तीपूजेत सावरकर यांनी रस दाखवला नसला, तरी ते नास्तिक नव्हते. लहानपणी त्यांनी घरातील अष्टभुजादेवीसमोर घेतलेली स्वातंत्र्याची शपथ सर्वांनाच ठाऊक आहे. रत्नागिरीत पतित पावन मंदिराची उभारणी, तेथे श्रीविष्णु आणि श्रीलक्ष्मी यांची वेदोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा, अखिल हिंदु गणेशोत्सवाचा आरंभ इत्यादी गोष्टी धर्माचे महत्त्व जाणूनच सावरकर यांनी केल्या. आपण योगशास्त्र, मंदिरे, सनातन धर्म यासंबंधीचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काही विचार पाहूया.
संकलन : श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी
१. आनंद प्राप्ती हे मनुष्याचे सर्वश्रेष्ठ ध्येय !
‘योगशास्त्राची गोडी सावरकर यांना तरुण वयात लागली. त्यांच्या ‘सप्तर्षी’ या काव्यात आणि ‘माझी जन्मठेप’ या आत्मचरित्रात त्याचे उल्लेख आढळतात. अंदमानातील काबाडकष्टाचे जीवन आणि आत्महत्येला प्रवृत्त करणारी छळवणूक यांवर त्यांनी योगशास्त्राच्या साहाय्याने मात केली. स्वामी विवेकानंद यांचा ‘राजयोग’ हा त्यांचा आवडता ग्रंथ होता. स्नानानंतर ध्यानधारणा करण्याचा त्यांचा नित्यक्रम असे. स्वातंत्र्यवीर सावरकर योगशास्त्राविषयी म्हणतात, ‘‘मानवाला मिळालेले सर्वश्रेष्ठ वरदान’, असे ज्याचे वर्णन करता येईल, असे एक प्रयोगावर आधारलेले शास्त्र हिंदूंनी पूर्णत्वास नेले आहे, ते शास्त्र म्हणजे योगशास्त्र ! योगशास्त्र मनुष्याच्या आंतरिक शक्तींच्या संपूर्ण विकासाचे एक सर्वश्रेष्ठ आणि ते वैयक्तिक अनुभवाचे शास्त्र आहे; म्हणून त्यात मतभेदाला जागा नाही. योग आचरणार्या मनुष्याला आश्चर्यकारक, इंद्रियातीत आणि उत्कट आनंद प्राप्त होतो. या अवस्थेला योगी ‘कैवल्यानंद’, वज्रायनी ‘महासुख’, अद्वैती ‘ब्रह्मानंद’ आणि भक्त ‘प्रेमानंद’ म्हणतात. हा सर्वश्रेष्ठ आनंद प्राप्त करून घेणे, हे मनुष्याचे मग तो हिंदु असो किंवा अहिंदु. आस्तिक असो किंवा नास्तिक, नागरिक असो किंवा वनवासी, सर्वश्रेष्ठ ध्येय आहे.’’ (संदर्भ : ‘समग्र सावरकर वाङ्मय, खंड ६’)
२. मंदिरांविषयी सावरकर यांचा दृष्टीकोन
ऊठसूट हिंदु देवतांचा अपमान करणार्या अंनिसवाल्यांनी वर्ष १९२७ मध्ये सावरकर यांनी काढलेल्या पत्रकातील पुढील उतारा वाचावा. सावरकर लिहितात, ‘आपापल्या गावात जी जी देवळे आणि धार्मिक स्थाने असतील, त्यांची योग्य निगा राखण्याचे अन् त्यांचे पूर्ण रक्षण करण्याचे आपले कर्तव्य आहे, याची पूर्ण जाणीव लोकांना देऊन कोणत्याही गुंडाला त्या देवीदेवतांचा अपमान आणि भ्रष्टाचार करता येऊ नये’, असा सर्वकाळ जागता डोळा त्यावर ठेवला पाहिजे.
‘मुसलमानांना हिंदूंच्या देवळात प्रवेश द्यावा का ?’, या मुद्यावरचे सावरकर यांचे तर्कशुद्ध विचार अनेकांना पेलवणारे नाहीत. या संदर्भात सावरकर यांचे निरीक्षण आश्चर्यकारक आहे. ते म्हणतात, ‘‘एखादा हिंदु चोर मंदिरात किंवा हिंदूंच्या घरी चोरी करायला गेला, तर तो चोरी करून निघून जाईल; मात्र मुसलमान चोर त्या ठिकाणी चोरी करील किंवा जाता जाता त्या देवालयातील / देव्हार्यातील मूर्तीवर घाव घालेल आणि मूर्तीभंजनाचे ‘पुण्य’ मिळवायचा प्रयत्न करील. ज्या मुसलमानाला मूर्ती बघितल्यावर मूर्तीभंजन करावेसे वाटते, त्याला मंदिरात प्रवेश देऊ नये’’, असे सावरकर यांचे स्पष्ट सांगणे आहे.
३. खरी वैज्ञानिक वृत्ती कोणती ?
सावरकर विज्ञाननिष्ठ होते, तरीही ‘आम्हाला सगळे कळले’, असे त्यांचे म्हणणे नव्हते. ते म्हणतात, ‘‘आम्हा मानवांना आज कळलेले सृष्टीनियम तेवढेच समग्र ज्ञान. आता कळायचे काही बाकीच नाहीच, अशा दंभाने फुगून आजच्या ज्ञात कार्यकारणभावाच्या कक्षेत जे सामावू शकत नाही, ते ते सारे खोटेच असले पाहिजे, असे ठाम प्रतिपादन करणे आणि असा काही चमत्कार हेटाळून ऐकून सुद्धा न घेणे, ही एक ‘बुद्धीवेड’ वा हा एक बुद्धीभोळेपणाच होणार आहे !’’
अंनिसने आपल्या बुद्धीवादाचे ‘बुद्धीवेडात’ कधी रूपांतर झाले, याचा शोध घ्यावा.
४ . सनातन धर्म बुडवणे कुणाच्या हातचे नाही !
सनातन धर्माविषयी वर्ष १९३० मधील आपल्या लेखात सावरकर म्हणतात, ‘‘जुनी सर्व कर्मकांडे पालटली, तरी सनातन धर्म बुडणे शक्य नाही. सनातन धर्म बुडवणे मूठभर सुधारकांच्याच नव्हे, तर मनुष्य जातीच्याही हातचे नाही. प्रत्यक्ष देवाच्या हातचे आहे कि नाही ? याविषयीही शंकाच आहे.’’ स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘‘जेव्हा आपण धर्म शब्दास ‘सनातन’ हे विशेषण लावतो, तेव्हा त्याचा अर्थ ईश्वर, जीवन आणि जगत् यांच्या स्वरूपाविषयी अन् संबंधांविषयी विवरण करणारे शास्त्र अन् त्यांचे सिद्धांत, तसेच तत्त्वज्ञान असा असतो. आदिशक्तीचे स्वरूप, जगताचे आदिकारण आणि आदिनियम हे सनातन, शाश्वत आणि त्रिकालाबाधित आहेत. भगवद्गीतेत किंवा उपनिषदांत याविषयीचे जे सिद्धांत प्रकट केले आहेत, ते सनातन आहेत. ते पालटणे ही मनुष्यशक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे. ते सिद्धांत आहेत ते आहेत आणि तसेच कायम रहाणार.’’
५. श्रीकृष्णाचा आदर्श
ऊठसूट मनु, प्रभु श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर टीका करणार्यांनी सावरकर यांचे पुढील विचार वाचावेत. सावरकर म्हणतात, ‘‘मनु आणि श्रीकृष्ण हे नीतीनियम सांगणारे आहेत. श्रीराम आमचे सेनापती आहेत. त्यांनी दिलेले पौरुषयुक्त धडे आपण पुन्हा गिरवूया आणि आपल्या हिंदु राष्ट्रास पुनः अजिंक्य अन् विजिगीषू करूया. श्रीकृष्णाने केले बहुत आणि सांगितलेही बहुत; पण त्या सर्व कृत्यांत अनन्य साधारण कृत्य म्हणजे कंस वध ! त्याच्या सर्व उपदेशात जी अनन्यसाधारण शिकवण त्याने दिली, ती म्हणजे भगवद्गीता !’’
६. यज्ञ आणि सत्यनारायण पूजेला सावरकर यांची उपस्थिती
आचार्य बाळाराव सावरकर त्यांच्या ‘सावरकर’ चरित्रात लिहितात, ‘वीर सावरकर यांच्या उपस्थितीत पतित पावन मंदिरातही गोपूजन होत असे. हिंदूसंघटनार्थ करण्यात येणार्या यज्ञाला, सत्यनारायणाला ते उपस्थित रहात, तसेच हिंदु समाज बलवान करणार्या गोरक्षण आंदोलनालाही सावरकर पाठींबा देत असत.’
‘गाय मारलेली केव्हा चालेल ?’, हे सांगतांना स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात, ‘पूर्वी हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी मुसलमान गायींचे कळप पुढे ठेवून आक्रमण करत. त्या गायींचा वध आपल्या हातून होऊ नये; म्हणून हिंदु राजे स्वतःची शस्त्रे म्यान करत. हिंदूंच्या या सद्गुणविकृतीमुळे मुसलमानांना विजय मिळवणे सोपे व्हायचे. जी गाय शत्रूला साहाय्यकारी ठरते, ती गाय मारली तरी चालेल. त्या वेळी पाच-पन्नास गायी मेल्या असत्या; पण आज भारतात होणारी लक्षावधी गायींची कत्तल वाचली असती’, असे सावरकर यांचे सांगणे होते. ‘जर आपण पाकिस्तानवर अणुबाँब टाकला, तर तेथील अनेक गायी मरतीलच ना ?’, असा विचार सावरकर यांनी बोलून दाखवला.
गायींसंबंधीचे सावरकरांचे मूळ लेख हिंदुत्वनिष्ठांनी वाचले, तर गोपालनासमवेत गोसंरक्षण कसे करायचे ? मुसलमानांच्या सैन्यापुढील गायींचे कळप कापून आपली सद्गुणविकृती कशी दूर करायची ? आणि शेवटी त्या मुसलमानांना ‘आम्ही गाय झालो, आमची हत्या करू नका’, असे दाती तृण धरून शब्दशः म्हणायला लावणार्या राजा हरिसिंह नलवा या शूर शीख सरदाराची कथा तरी कळेल. त्या निमित्ताने आजचे जन्महिंदु कर्महिंदु बनतील.
धर्म म्हणजे काय ?‘धर्म म्हणजे केवळ पारमार्थिक गोष्टींची चर्चा, केवळ द्वैत-अद्वैताचे वादविवाद किंवा चेतन-अचेतन वस्तूंचा शोध नव्हे. धर्म म्हणजे व्यवहार, धर्म म्हणजे इतिहास, धर्म म्हणजे राष्ट्र आणि हा धर्म कुणाला सुटला आहे ? इंग्लंडचा राजा प्रोटेस्टंट नसला, तर त्याला गादीचे त्यागपत्र द्यावे लागते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला प्रोटेस्टंट बायबलची शपथ घ्यावी लागते. मध्यपूर्वेतील प्रत्येक लहान लहान राष्ट्रही धर्मप्रधान आहेत. आम्ही जग पाहून आलेले लोक आहोत. मनुष्य धर्मातीत राहूच शकत नाही. ‘धर्मामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे’, हे निधर्मी असलेल्या स्टॅलीनलाही मान्य करावे लागले.’ – स्वातंत्र्यवीर सावरकर |
७. बौद्ध धर्माचा अभ्यास
सावरकर यांचा बौद्ध धर्मग्रंथांचा सूक्ष्म अभ्यास होता. वैदिक हिंदु धर्मावरील विपर्यस्त टीका ते ऐकून घेत नसत. वर्ष १९५६ मध्ये (डॉ. आंबेडकर यांनी या वर्षी धर्मांतर केले.) लिहिलेल्या एका लेखात सावरकर म्हणतात, ‘स्वतः बुद्ध पूर्वजन्म मानत होते; कारण आपण पूर्वजन्मी माणसांचेच नव्हे, तर पशूपक्ष्यांचे जन्म घेतलेले आहेत, असे स्वतः गौतमबुद्ध सांगत. बुद्धांनंतर त्याच्या उपदेशाच्या प्रभावाने पुन्हा मोठमोठे यज्ञ झाले नाहीत, ही आंबेडकर पक्षियांची विधाने, म्हणजे निव्वळ थापेबाजी आहे. बुद्धांनंतर १ सहस्र वर्षांपर्यंत, म्हणजे हुणांना पिटाळणार्या राजा यशोवर्धनाच्या काळापर्यंत अश्वमेधासारखे महायज्ञ चालू होते. हिंदूंची धर्मतत्त्वे आणि धर्माचरण यांविरुद्ध कुणीही जीभ सैल सोडली, तरी हिंदू सहसा लक्ष देत नाहीत. हा हिंदूंचा दुबळेपणा आणि भेकडपणा आहे.’
आजही अंनिसच्या व्यासपिठावरून बौद्ध धर्मीय हिंदु धर्मावर आणि त्यातील पुनर्जन्मादी सिद्धांतावर अन् वटपौर्णिमेसारख्या व्रतांवर टीका करतात. या विद्रोहींचा मुखभंग करण्यासाठी तरी हिंदूंनी अन्य धर्मियांच्या ग्रंथांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात सावरकर म्हणतात, ‘बुद्ध तत्त्वज्ञानाचे वैदिक धुरंधरांनी जे वैचारिक खंडण यशस्वीपणे केले, ते काही भारतातून बौद्धांच्या झालेल्या समूळ उच्छेदाचे एकमेव कारण नाही. बौद्धांचा राष्ट्रद्रोह, बौद्धांची आततायी अहिंसा आणि बौद्धांची मुसलमानांशी पडलेली गाठ या घटनाही त्यांच्या उच्छेदाचे कारण आहे.’ या ग्रंथात त्या घटनांसंबंधीचे आधारही सावरकर यांनी दिले आहेत.
बौद्ध धर्मियांना मुसलमानांनी काही अल्प (कमी) छळलेले नाही. आजही लडाख भागातील बौद्धांना मुसलमानांपासून पुष्कळ भय आहे.
८. एक धर्मपुस्तक नाही, हेच चांगले !
ख्रिस्ती, मुसलमान आणि काही हिंदू ‘हिंदूंचा एक असा धर्मग्रंथ नाही’, असे सांगतात. वर्ष १९३७ मध्ये केलेल्या भाषणात सावरकर म्हणतात, ‘‘असे असल्यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्त्व कोणत्याही पुस्तकाच्या दोन पुठ्ठ्यांत सामावू शकणार नाही. या विश्वाच्या दोन पुठ्ठ्यांमध्ये जितके सत्य आणि ज्ञान पसरले आहे, तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत आहे. एकाच धर्मग्रंथामुळे मुसलमान आणि ख्रिस्ती संकुचित राहिले आहेत.’’
‘हिंदु धर्म, देव आणि संत यांविषयी हिंदु समाज अश्रद्ध होऊन सैरभैर व्हावा’, हा अंनिसचा हेतू आहे, तर ‘हिंदु समाज सामाजिक अन् राष्ट्रीय दृष्ट्या संघटित व्हावा, हिंदूंना राजकीय दृष्टी प्राप्त व्हावी’, यासाठी सावरकर यांनी विचार मांडले आहेत. नास्तिक असणार्या अंनिसला सावरकर यांचे विचार तेवढे लाभदायक वाटतात, त्याच्या दुपटीने ते अंनिसवाल्यांनाच अडचणीत आणणारे आहेत.’
(साभार : ‘स्वातंत्र्यवीर’, जानेवारी २००५)
स्वातंत्र्य संपादनाचे श्रेय देवाला केलेल्या अबोल प्रार्थनेलाही !
पूर्वीश्रमीचा ‘मानवीय नास्तिक मंच’, म्हणजे सध्याच्या अंनिसला सावरकर यांचे हे विचार ठाऊक आहेत का ? – संपादक
‘भारत स्वतंत्र करण्याचे श्रेय हे सशस्त्र किंवा निःशस्त्र अशा कोणत्याही पक्षाचे नसून ते गेल्या २ पिढ्यांतील सर्व पक्षांच्या सर्व स्वदेशनिष्ठांचे सामायिक श्रेय आहे. मी तर त्याच्याही पुढे जाऊन स्वानुभवाने असे सांगतो की, सशस्त्र किंवा निःशस्त्र अशा कोणत्याही गुप्त किंवा प्रकट चळवळीत ज्यांनी सक्रीय भाग घेतला नाही; परंतु ज्यांनी ज्यांनी आपापल्या हृदयात एक सहानुभूती बाळगली आणि ‘देवा, माझ्या भारताला स्वतंत्र कर’, असे म्हणून अबोल प्रार्थना केल्या. त्या आमच्या लक्षावधी स्वदेश बांधवांनाही या राष्ट्रीय विजयाचे श्रेय त्या त्या प्रमाणात आहेच आहे !’
– स्वातंत्र्यवीर सावरकर, वर्ष १९५२