‘नुकत्याच आई झालेल्या महिला एकाकी असतात, तेव्हा अनेकविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्या नैराश्यात जातात. अशा वेळी जर त्या सासू-सासरे किंवा आई-वडील यांच्यासमवेत रहात असतील, तर त्या निरोगी रहातात’, अशा प्रकारे एकत्र कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करणारा अहवाल फिनलँड हेलसिंकी विद्यापिठाने दिला आहे. ‘एकत्र कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे’, याचे महत्त्व आता पाश्चात्त्य हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध करत आहेत. दुसरीकडे भारतीय मात्र स्वपरंपरा विसरून पाश्चात्त्यांच्या आहारी गेले आहेत. या विद्यापिठातील लोकसंख्येविषयी संशोधन करणार्या डॉ. मेत्सा सिमोला यांनी सांगितले, ‘‘मुले असणार्या कुटुंबासाठी आजी-आजोबांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.’’
यामुळे एकत्र कुटुंबपद्धतीचे अनेक लाभ आता आपल्याला लक्षात येत आहेत. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत असल्यामुळे त्या कुटुंबातील आजी-आजोबा आपल्या मुलांना संध्याकाळच्या वेळेस शुभं करोती, रामरक्षा, मारुतीस्तोत्र, अथर्वशीर्ष, गोष्टी सांगून त्यातून घ्यावयाचा अर्थबोध, पाढे आदी शिकवायचे. पूर्वी नातवंडांना घडवण्याचे दायित्व पालकांसह आजी-आजोबांचेही असे. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे संस्कार, एकमेकांना साहाय्य करणे, समजून घेणे आदींसह अनेक लाभ व्हायचे. एकत्र कुटुंबात मोठ्यांचा आधार आणि प्रेम मिळाल्याने एकटेपणा वाटत नाही. कुठलीही अडचण आली, तरी बोलू शकतो, इतर समजून घेऊ शकतात, असे असते. मोठ्या व्यक्ती घरात असल्याने घरातल्यांवर बंधन रहाते. पालकही एका मर्यादेत वागतात. पालक त्यांच्या पालकांचा आदर करतात, ते पाहून लहान मुलेही त्यांचे अनुकरण करतात. घरात कुठलीही समस्या आली, तर कुटुंबातील मोठ्या व्यक्तींच्या अनुभवाचा लाभ होतो, त्यांचा आधार आणि सल्ला घेऊन त्या समस्येतून बाहेर पडता येते. एकत्र कुटुंबव्यवस्थेतून महिलांना सुसंस्कार, प्रेम आणि सुरक्षितता लाभते. एकत्र कुटुंबामुळे लहान मुलांसह सर्वांनाच जुळवून घेण्याची सवय लागते. आज कित्येक घरात वयोवृद्धांची अडचण वाटू लागल्यामुळे आई-वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते. आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणे, म्हणजे कुटुंबाचा आधार स्वतःच्या हाताने नष्ट करण्यासारखे आहे. सध्या एकत्र कुटुंबपद्धतीचा र्हास होत असल्यामुळे पालक आणि मुले यांच्या अनेक समस्या वाढत आहेत. हा भयानक परिणाम एकत्रित कुटुंबपद्धत लोप पावल्याचा आहे. विभक्त कुटुंबात मुक्त आणि चंगळवादी जीवन अधिक प्रमाणात असते. त्यामुळे ताण, निराशा येते. म्हणूनच एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ लक्षात घेऊन एकत्र कुटुंबपद्धत पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे.