उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. गायत्री सचिन नाईक ही या पिढीतील एक आहे !
चि. गायत्री सचिन नाईक हिची तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
अ. ‘मला गरोदरपणात मोदक खाण्याची पुष्कळ इच्छा झाली होती.
आ. या कालावधीत मी श्रीकृष्णाच्या गोष्टी, त्याच्याविषयी कविता आणि स्तोत्र ऐकत असे. मी दत्तगुरूंची उपासना करत होते आणि साईबाबांचे कीर्तन ऐकत होते. मला असे करण्याची आतूनच इच्छा होत असे.
इ. या काळात मला सनातन संस्था आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पहाता आला.
२. जन्म ते १ वर्ष
अ. चि. गायत्री हसतमुख आहे.
आ. ती अगदी लहान असल्यापासूनच सहनशील आहे.
इ. ती लहान असतांना ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ हा नामजप ऐकून झोपत असे. तिला लहानपणासूनच देवाचे स्तोत्र आणि नामस्मरण ऐकायची आवड आहे.
ई. ती १ वर्षाची होण्यापूर्वीच व्यवस्थित बोलू लागली. ती कधी बोबडे बोलली नाही. तिचे उच्चार सुस्पष्ट आहेत.
उ. तिची स्मरणशक्ती चांगली आहे. तिला एखादा शब्द कळला की, ती तो शब्द अर्थासह लक्षात ठेवते. ती प्रसंगानुरूप शब्दांचा योग्य वापर करते. असे ती ८ – ९ मासांची असल्यापासून करते.
३. वय – १ ते २ वर्षे
३ अ. लाघवी
१. मी सकाळी गायत्रीला फिरवून आणते. त्या वेळी सर्व वयोगटातील व्यक्ती तिच्याशी बोलायला येतात. आम्ही त्या व्यक्तींना ओळखतही नाही. त्या व्यक्ती सांगतात, ‘‘गायत्रीला पाहून आम्हाला चांगले वाटते. आम्हाला तिला भेटावेसे वाटते.’’
२. एका आजींनी मला सांगितले, ‘‘मी शेजारच्या इमारतीत रहाते. तू गायत्रीला घेऊन आमच्याकडे ये. आमचे घर प्रसन्नतेने भरून जाईल.’’
३. एका २५ ते ३० वर्षांच्या महिलेने सांगितले, ‘‘गायत्री अन्य मुलांपेक्षा वेगळी आहे. तिच्यात सकारात्मक स्पंदने जाणवतात. आम्ही गायत्रीला पहाण्यासाठी या मार्गाने जातो.’’
३ आ. देवाची ओढ
१. ती मला आणि आईला मारुतिस्तोत्र, अन्य स्तोत्रे आणि नामजप भ्रमणभाषवर लावण्याची आठवण करून देते.
२. आम्ही अग्निहोत्र करत असतांना ती आमच्या जवळ येऊन बसते. ती अग्निहोत्रपात्रात तूप घालून नमस्कार करते. नंतर ती ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप करते.
३. तिची अंघोळ झाल्यावर ती देवाला फुले वहाते, उदबत्ती लावते आणि प्रत्येक खोलीत जाऊन घंटानाद करते.
४. ती झोपतांना ‘ॐ’ म्हणते, तसेच ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ आणि ‘ॐ नमः शिवाय ।’ हे नामजप करते.
५. दूरदर्शनच्या एका वाहिनीवर ‘रामायण’ ही मालिका लागते. एकदा मी दूरदर्शन चालू केल्यावर त्या मालिकेचे शीर्षक गीत लागल्यावर गायत्री धावत गाणे ऐकायला आली. तिने गाणे चालू असतांना पायाने ठेका धरला होता. तिने गाण्याचा शेवट होत असतांना गिरकी घेऊन नमस्कार केला आणि टाळ्या वाजवल्या. नंतर ती खेळत होती. ती अन्य कोणत्याही गाण्याच्या वेळी असे करत नाही.
३ इ. इतरांना साहाय्य करणे : ती आम्हाला मटाराच्या शेंगा सोलून देते. ती तिचे धुऊन वाळत घातलेले कपडे गोळा करून एका ठिकाणी ठेवते. ती तिची खाण्याची ताटली ओट्यावर नेऊन ठेवते.
३ ई. गायत्री सगळ्यांमध्ये मिळून मिसळून असते. ‘ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपलेसे करते’, असे आमच्या अनेक नातेवाइकांनी सांगितले.
३ उ. तिच्याकडून काही अयोग्य कृती झाल्यास ती समोरच्या व्यक्तीची क्षमा मागते.
४. गायत्रीचा स्वभावदोष :
हट्टीपणा.’
– सौ. दुहिता सचिन नाईक (चि. गायत्रीची आई), डोंबिवली, ठाणे. (नोव्हेंबर २०२३)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |