श्री गुरुदेव दत्तांची मानसपूजा आणि नामजप करतांना सौ. स्मिता संजय भुरे यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

सौ. स्मिता भुरे

१. चंदनाचे अत्तर घरात नसतांना यजमानांना चंदनाचा सुगंध येणे आणि त्यामुळे मानसपूजेत श्री दत्तात्रेयांना चंदन अर्पण केले नसल्याचे लक्षात येणे

‘मी मागील एक वर्षापासून ऑनलाईन सत्संगाशी जोडले गेले आहे. त्यात सांगितलेल्या कृतीप्रमाणे मी प्रतिदिन गुरुदेवांची मानसपूजा करत असते. एके दिवशी मी श्री दत्तगुरूंची मानसपूजा करत असतांना देवाला सुगंधित जल आणि पंचामृतांनी अभिषेक केला. काही सुगंधी फुले वाहिली. आरती केली. हे सर्व भावपूर्ण झाल्यामुळे मी अतिशय आनंदात होते. तेवढ्यात माझे पती कामावरून आल्यामुळे मी दार उघडण्यास गेले. ते घरात आल्याबरोबर म्हणाले, ‘‘आज तू चंदनाचे अत्तर लावले आहेस का ? मला तू जवळून जात असतांना तसा सुगंध येत आहे.’’ मी म्हटले, ‘‘अहो, आपल्याकडे चंदनाचे अत्तर नाही.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले की, मी श्री दत्तगुरूंची मानसपूजा करतांना दत्ताला आवडणारे चंदन अत्तर लावले नाही. ते देवानेच माझ्या लक्षात आणून दिले. माझ्या यजमानांनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटले. त्यामुळे त्यांचीही देवावरील श्रद्धा वाढली.

२. श्री दत्तगुरूंचा नामजप करण्याने साधिकेचा बरा न होणारा कानदुखीचा त्रास दूर होणे आणि यजमानांचा झोपेचा त्रास उणावणे

मला कानदुखीचा (tinnitus) त्रास होता. मला मधून-मधून चक्करही येत असे. मी सगळे उपचार केले; परंतु काही उपयोग झाला नाही. आधुनिक वैद्यांनी सांगितले की, आता याची सवय करून घ्या. उपाय म्हणून मी श्री दत्ताचा नामजप चिकाटीने चालू ठेवला. तेव्हा ‘पंधरा दिवसांतच माझे दुखणे न्यून होत आहे’, असे माझ्या लक्षात आले. मी आता ७० टक्के बरी झाली आहे.

माझ्या यजमानांना निद्रानाशाचा त्रास होता. रात्र-रात्र ते जागे राहून नुसते बसून रहात. त्यांचा जीव घाबरत असे. त्यांना कामानिमित्त बाहेगावी जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना पुष्कळ थकवा जाणवायचा. त्यांनासुद्धा श्री दत्तगुरूंचा नामजप केल्यामुळे आता शांतपणे झोप येऊ लागली. हे केवळ ‘परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच होऊ शकले’, अशी आमची ठाम श्रद्धा आहे. परात्पर गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

– सौ. स्मिता संजय भुरे, अकोला (२८.६.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक