१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या सत्संगामुळे साधकाचा चेहरा तेजस्वी दिसणे आणि त्याला उत्साह, दैवी ऊर्जा आणि आनंद जाणवणे
‘एकदा मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा दीड घंटा सत्संग लाभला. त्यानंतर मी सेवाकेंद्रात परत आल्यावर साधक मला म्हणाले, ‘‘तुमचा चेहर्यात पालट झाला आहे. तुमचा चेहरा तेजस्वी दिसत आहे.’’ श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे) मला म्हणाले, ‘‘तुम्ही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे आला होता, तेव्हा तुमच्या चेहर्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण जाणवत होते. तुम्हाला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा सत्संग लाभल्यानंतर तुमचा चेहरा चांगला वाटत आहे.’’ तेव्हा मलाही उत्साह, दैवी ऊर्जा आणि आनंद जाणवत होता. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘संतांमधील चैतन्यामुळे माझ्यावर स्थूल आणि सूक्ष्म प्रक्रिया घडून माझ्यात चांगले पालट झाले आणि हे पालट मला, तसेच साधकांनाही जाणवले.’ संतांच्या सत्संगाचे महत्त्व माझ्या लक्षात येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
२. साधकाला आलेली निराशा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अन्य साधकाच्या माध्यमातून विचारपूस किंवा भ्रमणभाष केल्यावर दूर होणे आणि साधकाला साधना करण्यासाठी प्रोत्साहन मिळणे
माझ्या मनात कधी नकारात्मक विचार आल्यास मला निराशा येते आणि ‘साधना करू नये’, असे मला वाटते. तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ विनायकदादांकडे माझी विचारपूस करतात किंवा दादाला मला भ्रमणभाष करायला सांगतात. त्या मला नकारात्मक स्थितीतून बाहेर काढून बळ आणि आध्यात्मिक ऊर्जा देतात. त्यामुळे मला साधना करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. ‘गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) माझ्यावर सतत लक्ष आहे’, असे मला वाटते.
३. स्वतःच्या आचरणातून साधकाच्या मनावर वेळेचे महत्त्व बिंबवणे
मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे थोडा वेळ जरी गेलो, तरीही त्या मला साधनेविषयी पुष्कळ सांगून माझे शंकानिरसन करत असत. मी त्यांच्याकडे सेवेनिमित्त गेल्यावर त्या माझे निवास, भोजन आणि सेवा यांचे नियोजन करत असत. ‘वेळेचा अधिकाधिक उपयोग साधनेसाठी कसा करायचा ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
४. साधकाच्या मनाची स्थिती सूक्ष्मातून जाणून घेऊन साधकाला साधनेविषयी मार्गदर्शन करणे
काही वेळा माझ्या मनात नकारात्मक विचार आणि शंका असतात. मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना विशेष काही न सांगता त्या माझ्या मनातील विचार जाणतात आणि साधनेविषयी मार्गदर्शन करतात. त्यामुळे माझे शंकानिरसन होऊन मला साधना करण्यासाठी दिशा मिळते.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा सत्संग लाभत आहे, त्याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘गुरुदेवा, मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून जे शिकायला मिळत आहे, ते आचरणात आणण्यासाठी तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न तुम्हीच माझ्याकडून करून घ्यावेत’, अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो.’
सतत इतरांचा विचार करणार्या प्रीतीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
१. ‘एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्यांच्या मैत्रिणीच्या घरी अल्प वेळेसाठी भेटायला जाणार होत्या. त्या प्रत्येक कृती करतांना इतरांचा विचार करतात. मैत्रिणीकडे जातांना त्या स्वतः चहा बनवून घेऊन गेल्या. ‘मैत्रिणीचा चहा बनवण्यात वेळ जाऊ नये आणि दोघींनाही बोलता यावे’, असा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा उद्देश होता. त्या प्रत्येक कृती करतांना इतरांचा विचार करतात.
२. एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ प्रवास करत असतांना एका सेवाकेंद्रातील साधकांना अल्प वेळेसाठी भेटणार होत्या. त्या सेवाकेंद्रातील सर्व साधक श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना भेटण्यासाठी वरच्या माळ्यावरून खाली आले होते; मात्र एक साधिका सेवेत व्यस्त असल्यामुळे खाली येऊ शकली नाही. हे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना कळल्यावर त्या स्वतः वरच्या माळ्यावर जाऊन साधिकेला भेटल्या.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चहा किंवा अल्पाहार घेण्याच्या वेळेत एखादा साधक त्यांच्याकडे आल्यास त्या साधकाला चहा किंवा अल्पाहार देतात. त्यामुळे साधकांना आपलेपणा वाटून आनंदही होतो.
४. एकदा एका गर्दीच्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. तेथे अकस्मात् एक बाळ आसंदीवरून खाली पडले. त्या बाळाची आई आणि अन्य व्यक्ती तेथे जवळच होत्या अन् आम्ही थोडे दूर होतो, तरीही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ त्या बाळाजवळ सर्वांच्या आधी पोचल्या. त्यांनी बाळाला उचलून घेतले आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.’
– श्री. श्रीकांत चौधरी, बेंगळुरू, कर्नाटक. (६.१२.२०२३)
|