‘आषाढी एकादशीच्या दिवशी असलेल्या भक्तीसत्संगाची संहिता सिद्ध करण्याच्या सेवेत साहाय्य करण्याची सेवा मला मिळाली. महाराष्ट्रातील थोर विठ्ठलभक्त संत जनाबाईंच्या सर्वश्रुत अभंगाशी संबंधित काही सूत्रे संहितेला जोडायची होती. अभंग होता – ‘विठु माझा लेकुरवाळा…’, या अभंगातील काही शब्दांवर माझी दृष्टी पडली आणि श्री गुरुकृपेने त्या शब्दांचा माझ्या अल्पमतीला जो अर्थ उलगडला, तो कृतज्ञतापूर्वक येथे दिला आहे.
१. श्री विठ्ठलाची आळवणी करतांना संत जनाबाईंना ‘विठ्ठल लेकुरवाळा आहे’, असे वाटून सुंदर दृश्य दिसणे
श्री विठ्ठलाची आळवणी करतांना संत जनाबाईंच्या डोळ्यांपुढे सुंदर दृश्य उभे राहिले असावे. त्या दृश्यात त्यांना श्री विठ्ठलाची आळवणी करणारे, त्याचे परम भक्त असलेले जनाबाईंचे समकालीन संतही विठ्ठलाच्या समवेत दिसतात. सर्व संतांचा प्राणाधार असलेला, सतत त्यांच्या सांगाती असलेला हा विठुराया एकेका संतांचा प्रपंच सहजतेने चालवतो. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ महाराज, नामदेव, तुकाराम महाराज, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका आदी संत जणू श्रीकृष्णाचा अवतार असलेल्या विठ्ठलाचे सवंगडी आहेत. ‘या सार्यांच्या अपार भक्तीमुळे विठ्ठलाने त्यांना माऊलीच्या मायेने उचलून घेतले आहे. विठ्ठल संतांचा योगक्षेम वहात आहे. त्यांचे कोडकौतुक करत आहे’, असे संत जनाबाईंना वाटत असावे; म्हणूनच भगवंताचे गुणगान करतांना संत जनाबाईंना श्री विठ्ठल ‘लेकुरवाळा’ वाटतो.

२. ‘माया आणि प्रपंच यांकडे विरागी वृत्तीने पहायला हवे अन् ‘भगवंतच सत्य असून त्याची भक्ती करणे’, हेच परम सत्य आहे’, याचे ज्ञान झाल्यावरच भक्तीचा सोपान चढता येतो अन् नंतरच मुक्तीचा मार्ग गवसतो’, हे लक्षात येणे
या अभंगाचा आरंभ निवृत्ती, ज्ञानदेवादि ४ भावंडांच्या उल्लेखाने होतो. ‘निवृत्ती हा खांद्यावरी…।’ जिवांच्या खांद्यावर असलेल्या मायारूपी प्रपंचाचा जो भार आहे, जगताचा जो पसारा आहे, त्याकडे विरागी वृत्तीने पहावे’, अशी शिकवण देणार्या निवृत्तीला विठ्ठलाने खांद्यावर घेतले आहे. ‘जन्माला आलेल्या जिवांच्या खांद्यावर प्रपंचाचा भार असला, तरीही त्याकडे विरागी वृत्तीने पहायला हवे’, ही िशकवण यातून मिळते. ‘प्रपंच ही माया असून भगवंतच सत्य आहे आणि त्याची भक्ती करणे’, हेच परम सत्य आहे. या ज्ञानाचे साक्षात् रूप असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानदेवाला विठुरायाने पुढे चालायला सांगितले आहे. ‘ज्ञान अन् भक्ती यांचा हा सोपान चढल्याविना मुक्ती मिळत नाही’, याची जाणीव करून देणार्या सोपानदेवांचा हात विठुरायाने धरला आहे. जणू भगवंत सोपानदेवांच्या रूपाने भक्तीचा सोपान हात धरून चढण्यास साहाय्य करत आहे. इवलीशी बालयोगिनी मुक्ताई त्याच्या मागून चालत आहे, म्हणजेच ‘निवृत्ती, ज्ञान, भक्तीचा सोपान आणि शेवटी मुक्ती’ या ४ पायर्या पार केल्याविना भगवंताशी एकरूप होता येत नाही. ही ४ त्या भगवंताची अंगे आहेत’, हे संत जनाबाई या अभंगातून सांगत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
३. भगवंताचे साहाय्य असल्याविना भवसागर पार करण्यासाठी पुढे पाऊलही टाकता न येणे
या ४ संतांप्रमाणेच विठ्ठलभक्ती करणारे गोरा कुंभार, चोखा मेळा, जीवा, बंका, नामदेव, असे अनेक संत विठुरायाचे बोट किंवा हात धरून त्याच्या समवेत आहेत. भगवंताच्या भक्तीची कास धरल्याविना आणि भगवंताचे साहाय्य असल्याविना भवसागर पार करण्यासाठी पुढे पाऊलही टाकता येत नाही.
४. ‘भगवद्भक्तीची कास धरून भगवंताच्या आनंददायी अनुसंधानात अविरतपणे राहू, तेव्हा या संतांप्रमाणे भगवंत प्रत्येक जिवाचे कोडकौतुक करील’, यात शंका नाही’, या दृढ श्रद्धेने श्री गुरुचरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण !’
(१८.८.२०२३)
– श्रीमती अलका वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.