छत्रपती शिवाजी महाराज, मुसलमान सैनिक आणि सर्वधर्मसमभाव !

आज (१९ फेब्रुवारी २०२४ या दिवशी) ‘शिवजयंती’ आहे. त्या निमित्ताने…

‘छत्रपती शिवाजी महाराजांना ‘सर्वधर्मसमभावी’ दाखवण्यासाठी ‘त्यांच्या सैन्यात ३५ टक्के मुसलमान होते’, अशी एक लोणकढी थाप सध्या विद्रोह्यांच्या भाषणातून ठोकून दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर स्वार्थासाठी करायचा, त्यांच्यासंबंधी कोणताही आधार नसणार्‍या गोष्टी सतत सांगत रहायच्या, असा उद्योग या विद्रोह्यांनी चालवला आहे. या संदर्भातील ऐतिहासिक तथ्य आपण या लेखातून पाहूया.

 १. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाकरीत एकूण मुसलमान किती होते ?

श्री. शेषराव मोरे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत जे काही २ ते ४ मुसलमान अधिकारी होते, ते महाराजांचे चाकर होते. या संदर्भात इतिहास संशोधक श्री. निनाद बेडेकर यांनी वर्ष १९९७ मध्ये श्रीक्षेत्र डेरवण (जिल्हा रत्नागिरी) येथील शिवजयंती उत्सवात पुष्कळ मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यांचे हे अध्यक्षीय भाषण पुस्तिकेच्या रूपानेही उपलब्ध आहे. आपल्या भाषणात

श्री. निनाद बेडेकर म्हणतात, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या समवेत असलेल्या ‘इब्राहिम खान’मुळे एक प्रश्न असा उपस्थित होतो की, शिवरायांच्या सेवेत, चाकरीत एकूण मुसलमान होते तरी किती ? इब्राहिम खान एक होता. त्याचा ठावठिकाणा काहीही ठाऊक नाही. त्याला पुढे फोंडा किल्ल्याची किल्लेदारी दिली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांकडे ‘पुष्कळ’ मुसलमान चाकरीत होते’, अशी कल्पना करून देण्यात आली आहे. मी त्यातील काही नावे सांगतो, त्या पलीकडील आणखी काही नावे असतील, तर सांगा. शिवाजी राजे जेव्हा पुणे, इंदापूर आणि सुपे या जहागिरीवर आले, तेव्हा शहाजी राजांच्या वतीने जे लोक आले, त्यात ३ मुसलमान आढळतात. एक होता ‘सिद्दी अंबर बगदादी’, दुसरा होता ‘जैनाखान परिजादे’ आणि तिसरा होता ‘बहलिमखान.’ याचसमवेत छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत आणखी काही लोक दिले होते, त्यात ‘नूरखान बेग’ हे नाव आढळते. हा त्यांच्या पायदळाचा मुख्य होता. गंमत अशी आहे की, ‘या सगळ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे कधीतरी हाकलून दिले का किंवा कसे ?’, याची इतिहासात नोंद नाही; पण हे लोक इ.स. १६५७ नंतर आढळतच नाहीत. सगळे नवीन आहेत.’

श्री. बेडेकर पुढे म्हणतात, ‘नूरखानाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘येसाजी कंक’ याला आणले. त्यानंतर महाराजांनी स्वतःची नवीन ‘फौज’ सिद्ध केली. त्यात आणखी २-३ नावे आढळतात. त्यातील एक आहे ‘सिद्दी हिलाल.’ हा ‘खेळोजी भोसले’ यांचा क्रीतपुत्र, म्हणजे विकत घेतलेला गुलाम आहे. एक बनावट (खोटे) नाव अजून आहे, ते आहे ‘मदारी मेहतर.’ या नावाचा उल्लेख असलेली खरी कागदपत्रे सोडूनच द्या; पण बखरीतसुद्धा यांचा उल्लेख नाही.  याखेरीज ‘दौलतखान’, असा उल्लेख आहे.

गोष्ट अशी आहे की, आपल्याकडे जलपर्यटन निषिद्ध मानले जात होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात समुद्रकिनार्‍यावरचे ‘खारवी’ आणि ‘दाल्दी’ जमातीचे लोक भरपूर होते. दौलतखान त्यांच्यातील एक होता. शिवाजी महाराजांच्या आरमारात दर्यासारंग ‘वेंटाजी भाटकर’ आणि ‘मायनाक भंडारी’ हे सुद्धा प्रमुख होते. शं.ना. जोशी नावाच्या संशोधकांनी शिवकालीन पत्रसारसंग्रहात शिवाजी महाराजांच्या जवळजवळ ९५ अधिकार्‍यांची सूची दिली आहे. यात एकही मुसलमान नाही.

महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के मुसलमान असते, तर त्यांना ‘कोंढाणा’ गड जिंकायला घरात मंगलकार्य असलेल्या तानाजीला का पाठवावे लागले ? घोडखिंडीत एखाद्या मुसलमानाने प्राण देऊन ती पावन का केली नाही ? ‘बहलोल’ खानाच्या सेनासागरावर वेडात धावून गेलेल्या ७ विरांमध्ये टक्केवारीनुसार २ तरी मुसलमान हवे होते ना ? विद्रोह्यांची निरर्थक बडबड बंद पाडण्यासाठी असे प्रश्न धर्माभिमानी श्रोत्यांनी त्यांना विचारले पाहिजेत !

२. हिंदू आणि तुर्क यांचे एकत्रीकरण शक्य आहे का ?

मोगलांची नोकरी सोडून ‘छत्रसाल बुंदेला’ हा उत्तरेतील राजा छत्रपती शिवाजी महाराजांकडे स्वराज्यात सेवा मागायला आला. महाराजांनी त्याला आपल्याकडे न ठेवता बुंदेलखंड स्वतंत्र करण्याची प्रेरणा दिली. हिंदु आणि मोगल या दोन संस्कृतींमधील भिन्नता सांगून महाराजांनी त्याला विचारले, ‘हिंदू आणि तुर्क यांचे एकत्रीकरण कधी झाला आहे का ?’ राजा छत्रसाल याला काय ते उमगले. त्याने परत जाऊन उत्तरेत नवीन हिंदु राज्याची स्थापना केली.

महाराजांना उमगलेली ‘एकत्रीकरण न होण्याची गोष्ट’ मात्र काही हिंदु राजांना कळली नाही. त्यांनी आपल्या सैन्यात हे एकत्रीकरण केले. अर्थात् त्याचा दुष्परिणाम हिंदूंनाच भोगायला लागला.

प्रतापगड

३. तेवढाच एक हिंदु न्यून होईल !

हिंदु राजांनी आपल्या पदरी मुसलमान सैन्य बाळगले. त्यांना योग्य ती वर्तणूक दिली; मात्र या सैन्याने अनेकदा आपली निष्ठा आपल्या ‘स्वामी’शी (राजाशी) न ठेवता ‘धर्मा’शी ठेवली, हे आपण पाहिले. तत्कालीन मुसलमान बादशाहच्या पदरी असलेल्या हिंदु सैनिकांकडे हे बादशाह कशा दृष्टीने पहात होते, तेही येथे देत आहे.

हळदीघाटच्या लढाईत (अकबराच्या जनानखान्यात स्वतःच्या मुली-बाळी लोटणार्‍या) राजा मानसिंगाचे राजपूत आणि राणा प्रतापचे राजपूत यांच्यात तुंबळ युद्ध चालू होते. या वेळी अकबराचा सेनापती अली असफ खान होता. त्याच्यासह अल बदायुनी हा अकबराच्या दरबारातील इतिहासकारही होता. अकबराच्या तुर्की अश्वदळाने अकबराचे राजपूत सैन्य आणि राणा प्रतापचे सैन्य यांच्याभोवती वेढा टाकून बाणांचा वर्षाव चालू केला. हे पाहून बदायुनी असफ खानाला म्हणाला, ‘हे बाण मानसिंगाच्या राजपूतांनाही लागणार !’ तेव्हा सेनापती असफ खान त्याला म्हणाला, ‘दोन्ही सैन्यांतील कुणालाही बाण लागला, तरी तेवढाच एक हिंदु न्यून होईल.’

आजपर्यंत मुसलमान आणि ख्रिस्ती यांनी ‘तेवढाच एक हिंदु न्यून’, हे सूत्र वापरून हिंदूंचे धर्मांतर अन् त्यांच्यावर अत्याचार केले आहेत. या सूत्राला यशस्वी छेद देणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘सर्वधर्मसमभावा’चे लोढणे कधीच गळ्यात बांधून घेतले नाही, हे त्यांच्या चरित्रावरून सहज लक्षात येते. अकबरापासून औरंगजेबापर्यंत कोणत्याही मुसलमान बादशाहने ‘सर्वधर्मसमभाव’ दाखवला नाही. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश किंवा इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर हे ‘सर्वधर्मसमभावा’ची धून वाजवत नाहीत. भारतातील जागृत हिंदूंनीच आता ही सर्वधर्मसमभावाची स्वतःच्या पायात अडकवून घेतलेली अदृश्य बेडी तोडून टाकायला हवी. अन्यथा निष्ठूर नियती हिंदूंना कधीच क्षमा करणार नाही !

– लेखक : श्री. शेषराव मोरे
(साभार : ‘काश्मीर : एक शापित नंदनवन’ या पुस्तकातून)