गोवा पर्यटन खात्याच्या वतीने १९ फेब्रुवारीला राज्यात ६ ठिकाणी शिवजयंती कार्यक्रम

डिचोली येथे मुख्य कार्यक्रम

पणजी, १३ फेब्रुवारी (वार्ता.) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झालेली आहेत. या अनुषंगाने हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे आणि पोर्तुगीज काळात मंदिरांचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोव्यासंबंधीचे कार्य युवा पिढी आणि गोव्यात येणारे पर्यटक यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी पर्यटन खाते प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने पर्यटन खात्याने सांखळी, मडगाव, पणजी, वास्को, फोंडा आणि पर्वरी येथे स्थानिक पालिका अन् पंचायती यांच्या सहकार्याने शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डिचोली येथे शिवजयंतीचा मुख्य कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांचीही उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेत डावीकडून डॉ. चंद्रकांत शेट्ये, रोहन खंवटे आणि प्रेमेंद्र शेट

पर्यटनमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पर्यटकांना समुद्रकिनार्‍याच्या पलीकडील गोव्यासंबंधी माहिती देतांना आपली संस्कृती आणि इतिहास चांगल्या रितेने लोकांसमोर यावा, यासाठी पर्यटन खाते प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून गतवर्षी पर्यटन खात्याने माशेल येथे ‘चिखल काला’ मोठ्या स्वरूपात साजरा केला. सरकारच्या या प्रयत्नांमुळे लोकांचा आता गोव्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन हळूहळू पालटत आहे. मुख्य कार्यक्रम डिचोली येथे श्री सप्तकोटेश्‍वर मंदिर, नार्वे येथे होणार आहे. पर्वरी येथे १९ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाईल आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. १८ आणि १९ फेब्रुवारी असे २ दिवस शिक्षण खात्याच्या पर्वरी येथील ‘डी.आय्.टी.’ सभागृहात शिवकालीन शस्त्रे अणि चलन यांचे आगळेवेगळे प्रदर्शन भरवले जाणार आहे.’’

डिचोली ते नार्वे येथील श्री सप्तकोटेश्‍वर मंदिर आणि परत अशी मिरवणूक काढणार ! – आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये

डिचोली येथील छत्रपती शिवाजी मैदानात शिवजयंती कार्यक्रम १८ आणि १९ फेब्रुवारी, असा २ दिवस होणार आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी मैदानाचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी राज्यस्तरीय वेशभूषा, किल्ले बनवणे आणि फुगडी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. १९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी डिचोली ते नार्वे येथील श्री सप्तकोटेश्‍वर मंदिर आणि परत अशी भव्य मिरवणूक होणार आहे. सायंकाळी मुख्य कार्यक्रम होणार असून यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचाही सहभाग असेल.’’ आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या वेळी गोव्यातील सर्व शिवप्रेमींनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले