अध्ययनातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतची रुची निर्माण व्हावी ! – डॉ. माधवी जोशी

डॉ. पां.वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रात सरलमानक संस्कृत कार्यशाळेला प्रतिसाद

डॉ. माधवी जोशी यांचा सत्कार करतांना डॉ. दिनकर मराठे

रत्नागिरी – सरल संस्कृत शिकवता आले पाहिजे. त्याकरता प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. मी विविध पदव्या मिळवल्या; पण संस्कृतमध्ये बोलतांना मला पुष्कळ परमानंद होतो. त्याप्रमाणेच आपल्या अध्ययनातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतची रुची निर्माण व्हायला हवी, असे प्रतिपादन कालिदास पुरस्कार विजेत्या, डी.बी.जे. महाविद्यालयातील संस्कृत प्राध्यापिका डॉ. माधवी जोशी यांनी केले.
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (रामटेक), भारतीय भाषा समिती (नवी देहली) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) अन् संस्कृत विश्वविद्यालयाच्या महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या वतीने एकदिवसीय सरलमानक संस्कृत कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, संस्कृत अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये  उपस्थित होत्या.

अध्यक्षस्थानावरून डॉ. मकरंद साखळकर म्हणाले की, आजची कार्यशाळा महत्त्वाची आणि उपयुक्त आहे. मी वाणिज्यचा विद्यार्थी आहे. त्याअनुषंगाने विचार मांडतो. कोणत्याही संस्कृत स्तोत्रामध्ये फलश्रुती दिलेली असते. त्यानुसार स्तोत्र म्हटल्यानंतर त्याची फलश्रुती मिळाली आहे का ? यासंबंधी काही प्रकल्प करता येऊ शकतो. गोगटे महाविद्यालय स्वायत्त झाल्यामुळे आता वाणिज्यच्या विद्यार्थ्यांनाही संस्कृत घेता येणार आहे. डॉ. काणे संस्कृत अध्ययन केंद्रासमवेत महाविद्यालयाचा सामंजस्य करार केला असल्याने एकत्रित उपक्रम यापुढेही राबवूया.

प्रास्ताविकामध्ये डॉ. दिनकर मराठे यांनी सांगितले की, सरलमानक संस्कृत ही संस्कृत भाषेचे अध्यापन करण्यासाठी विकसित करण्यात आलेली सुलभ पद्धती आहे. याद्वारे सर्व संस्कृत शिक्षकांचा संभाषण सराव होणे, नव्या पाठ्यपुस्तकांची रचना करणे, विद्यार्थ्यांशी संस्कृत भाषेत व्यवहार करणे यामुळे संस्कृत शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणणे, हे आपले कार्य आणि हिच सध्याच्या काळाची आवश्यकता आहे. शिक्षकांनी संस्कृत स्वभाषा म्हणून अवगत करावी. संस्कृत भाषेतच आपले वर्ग घ्यावेत, संस्कृत भाषेचा अभ्यास रंजक आणि रोचक करावा. या सरलमानक संस्कृत पद्धतीच्या आधारे उत्तरोत्तर प्रौढ ग्रंथांचे अध्ययन करता यावे, या सर्व गोष्टींचा विचार करून रत्नागिरी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी डॉ. माधवी जोशी आणि डॉ. साखळकर यांचा सत्कार डॉ. मराठे यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केला. कश्मिरा दळी यांनी सूत्रसंचालन केले. चिन्मयी सरपोतदार हिने स्वागतगीत सादर केले. डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले. दिवसभर झालेल्या कार्यशाळेमध्ये ‘सरलमानक संस्कृत कशासाठी ?’ यावर अविनाश चव्हाण, ‘सरल संस्कृतचे स्वरूप’ यावर डॉ. कल्पना आठल्ये, ‘प्रौढांसाठी संस्कृत अभ्यास’ यावर अधिवक्ता आशिष आठवले आणि ‘सरलमानक संस्कृत कृती’ यावर डॉ. माधवी जोशी यांनी विवेचन केले.