ठाणे – १९ फेब्रुवारी या दिवशी, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या दिनांकानुसार जन्मदिवशी सी.बी.एस्.ई. बोर्डाने संस्कृत विषयाचा पेपर ठेवला आहे. या विषयीची तक्रार पालकांनी मनसेकडे केली. ‘या दिवशी शासकीय सुटी असते. त्यामुळे याविषयी विचार का केला गेला नाही ? बोर्डाने याचा विचार का केला नाही ? त्यामुळे बोर्डाने या दिवशीचा पेपर रहित करावा’, अशी मागणी केली आहे आणि विषयीचे निवेदनही शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे. १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल या काळात ही परीक्षा आहे. या प्रकरणी बोर्डाने राज्यातील शिक्षण विभागाशी समन्वय साधणे आवश्यक होते, असे मनसेने म्हटले आहे. ‘सी.बी.एस्.सी. बोर्ड महाराष्ट्राच्या दैवताचा जाणीवपूर्वक अवमान करत आहे’, असे मनसेने म्हटले आहे.‘हा पेपर रहित न केल्यास मनसे पेपर होऊ देणार नाही’, अशी चेतावणीही मनसेने दिली आहे.
संपादकीय भूमिका :शासकीय सुटीच्या दिवशी सर्वांना सुटी असतांना शाळाही बंद असतात. अशा दिवशी पेपर ठेवणार्या सी.बी.एस्.ई. बोर्डाला वठणीवर आणण्यासाठी मनसेसारखेच पक्ष हवेत ! |