कतारने भारताच्या ८ माजी नौदल अधिकार्यांना मुक्त केले आहे. हे भारत शासनाचे कूटनीतीक यश असून याविषयी शासनाचे निश्चितच कौतुक करायला हवे. कतारशी चर्चा करण्याची आघाडी परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी सांभाळली, तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या संवेदनशील सूत्राविषयी भारताची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी मागील ३ मासांत अनेक वेळा दोहाला भेट दिली. या हालचालींमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुशल नेतृत्वही होते. कुणी असेही म्हणेल की, कतार तसा छोटासा देश. त्यामुळे त्याला वाकवण्यात कसले आले आहे यश ? हा प्रश्न विचारणार्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, जागतिक राजकारणाचा विचार करता देशाचा आकारमान नव्हे, तर ‘त्याचे उपद्रव मूल्य किती आहे ?’, हे महत्त्वाचे असते. आकारमानाने इस्रायलही तसा लहानसा देश; मात्र अख्ख्या जगाला झुकवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. कतारही मध्यपूर्वेतील एक लहानसा देश ! तेलामुळे समृद्ध ! त्यातही जागतिक राजकारणात स्वतःचे अस्तित्व बळकट करण्याची खुमखुमी असणारा आहे. मध्य पूर्वेत जराही ‘खट्’ झाले की, संबंधित देशांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावण्यात कतार नेहमीच अग्रेसर असतो. तालिबानी त्याचे मित्र आहेत आणि हमासला त्याचा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे जागतिक राजकारणात कतारचे उपद्रव मूल्य अधिक आहे. त्यातही तो अमेरिकचा सखा आहे. त्यामुळे या देशाला न्यून लेखून कसे चालणार ? या सर्व अंगांचा विचार करता भारताचे हे यश निर्भेळ आहे. २३ ऑक्टोबर २०२३ या दिवशी ८ माजी नौदल अधिकार्यांना हेरगिरी केल्याच्या प्रकरणात कतारच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर साधारण ३ मास भारत शासनाने पडद्यामागून अशा कोणत्या हालचाली केल्या, ज्यामुळे कतारला ३६० अंश कोनामध्ये त्याचा निर्णय पालटावा लागला ?
कतारला कात्रीत पकडले !
कतारमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय माजी नौदल अधिकार्यांवर हेरगिरीचे आरोप लावल्यावर भारतियांना आश्चर्याचा धक्का बसला, तसेच अनेक प्रश्नही उपस्थित झाले. कतार छोटासा देश असल्याने त्याची कोण आणि कशासाठी हेरगिरी करणार ? बरं, याविषयी कतार सरकारकडून अधिकृत काहीही माहिती सांगितली गेली नाही. त्यामुळे संशयाचे धुके अधिकच दाट झाले. ‘आम्ही बनवत असलेल्या आण्विक पाणबुडीविषयीची गोपनीय माहिती या ८ जणांनी इस्रायलला पुरवली’, असा आरोपही कतारने केला. वास्तविक चीन, अमेरिका किंवा अन्य देश त्यांच्या शस्त्रास्त्रनिर्मितीचा कार्यक्रम उघडपणे जगाला सांगत असतात, तसेच अत्याधुनिक पाणबुड्या किंवा शस्त्रास्त्रे बनवली जात असली, तरी त्याविषयी काही गोष्टी सर्वज्ञात असतात. त्यामुळे कतार आण्विक पाणबुडी बांधत असल्यास त्याची हेरगिरी करायची कुणाला काय आवश्यकता होती ? या ८ जणांना कह्यात ठेवून कतार भारताला कुठेतरी झुकवण्याचा प्रयत्न करत होता का ?
मागील काही मास भारत आणि कतार यांच्यात भारताला नैसर्गिक वायू पुरवण्याच्या कराराचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया चालू होती. हा ७८ बिलियन डॉलर्सचा (६ लाख ४७ सहस्र ३६४ कोटी रुपयांचा) महत्त्वाचा करार आहे. नैसर्गिक वायू, कच्चे तेल ही भारताची मर्मस्थाने आहेत. यात भारत स्वयंपूर्ण नसल्यामुळे त्याला विविध देशांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे या कराराच्या माध्यमातून भारतावर दादागिरी दाखवून ‘स्वतःची झोळी कशी भरता येईल’, हा कतारचा अंतस्थ हेतू होता. ‘८ माजी अधिकार्यांना अटक केल्यावर भारत मवाळ भूमिका घेईल’, असे बहुदा कतारला वाटले होते; मात्र भारत सरकारने त्याच्या सर्व चालींवर पाणी फेरले. या आठही जणांना फाशीची शिक्षा सुनावल्यावर भारताने या करारावर चालू असलेली चर्चा तात्काळ थांबवली आणि प्रथम या ८ अधिकार्यांच्या सूत्रावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे कतारला ठामपणे सांगितले. त्यानंतर भारताने कतारच्या मर्मस्थानांवर आघात करण्यास आरंभ केला. कतार हा श्रीमंत देश असला, तरी तेथे काहीच पिकत नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी त्याला भारतासारख्या देशांवर अवलंबून रहावे लागते. भारताने हेच लक्षात घेऊन प्रथम औषधोपचारांचा पुरवठा करण्यास दिरंगाई करण्यास आरंभ केला. भारताचे ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’ म्हणजे आखाती देशांच्या संघटनेशी चांगले संबंध आहेत. या संघटनेतील सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात कतारला पाण्यात पहातात; मात्र या २ देशांशी कतार वैर पत्करू शकत नाही, हेही तितकेच खरे ! त्यामुळे या संबंधांचा वापरही भारताने कतारवर दबाव निर्माण करण्यासाठी केला. ‘भारत झुकत नाही’, हे लक्षात आल्यावर कतार नरमला. याचा लाभ असा झाला की, भारत आणि कतार यांच्यामध्ये नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्याच्या कराराचे नूतनीकरण झाले. महत्त्वाचे म्हणजे मागील करारापेक्षा या करारानुसार कतार भारताला अल्प किमतीमध्ये नैसर्गिक वायू विकणार आहे. याचा अर्थ करार भारताच्या मनाप्रमाणे झाला आणि तेथील कारागृहात खितपत पडलेले भारताचे ८ नागरिकही सुटले. योग्य परराष्ट्र नीती वापरून भारताने कतारला कात्रीत पकडले आणि त्याची बरोबर जिरवली.
भारताकडून अधिक विजयवार्तांची अपेक्षा !
कतार आणि अमेरिका एकमेकांच्या गळ्यात गळे घालून वावरत असले, तरी कतारच्या अमेरिकाविरोधी कारवायांमुळे अमेरिका हैराण आहे. त्यामुळे त्यांच्या मैत्रीचा फुगा कधीही फुटू शकतो. कतार हमासची पाठराखण करत असल्यामुळे इस्रायल त्याच्यावर सातत्याने डाफरत आहे. भविष्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे पित्त खवळले, तर कतारची राख-रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही. बेडूक फुगून तरी किती फुगणार ? कतारची सध्या हीच स्थिती झाली आहे. भारताच्या माजी नौदल अधिकार्यांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेऊन कतारने दुःसाहस केले. या पार्श्वभूमीवर त्याला वेगवेगळ्या माध्यमांतून त्याची जागा दाखवण्याची आवश्यकता होती. भारताने त्याला आरसा दाखवण्याची भूमिका चोखपणे बजावली.
जागतिक राजकारण हे अतिशय क्लिष्ट आहे. स्वतःचे राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक देशाशी संबंध प्रस्थापित करण्याची कसरत करणे, हे मोठे दिव्य असते. त्यामुळे ‘अमुक देश हा आमचा मित्रदेश आणि तमुक देश हा शत्रूदेश’, अशी टोकाची भूमिका घेता येत नाही. ‘कुणा देशाशी असलेल्या सकारात्मक संबंधांचा वापर कधी आणि कुठे होईल ?’, हे आपल्याला सांगता येत नाही. हे पथ्य भारताने उत्तमरित्या पाळल्यामुळे त्याचा भारताला लाभ झाला. भारताने अशीच भूमिका घेतल्यास भविष्यात अशा अनेक विजयवार्ता भारतियांना मिळतील, हे निश्चित !
फाशीची शिक्षा दिलेल्या भारताच्या ८ माजी नौदल अधिकार्यांना मुक्त करण्यास कतारला भाग पाडणे, हे भारताचे मोठे यश ! |