रत्नागिरीत जायंट्स ग्रुपचे कार्य विस्तारणार ! – सीए  भूषण मुळ्ये

जायंट्सच्या सहा ग्रुपच्या नूतन कार्यकारिणीचा रत्नागिरीत शपथविधी आणि पदग्रहण समारंभ

जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलतांना अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये डावीकडून प्रकाश कारखानीस, संजय पाटणकर, डॉ. मिलिंद सावंत आणि गजानन गिड्ये

रत्नागिरी – जायंट्स ग्रुपचे सामाजिक कार्य चालू आहे. सध्या रत्नागिरीमध्ये १० ग्रुप असून आगामी काळात यात नक्की वाढ होणार आहे. सामाजिक दायित्व म्हणून आपण काम केले पाहिजे, अधिकाधिक नवीन सभासद, कार्यकर्ते तयार करूया, असे आवाहन प्रतिपादन जायंट्स फेडरेशनचे (२ ड) नूतन अध्यक्ष सीए. भूषण मुळ्ये यांनी केले.

सलग दुसर्‍या वर्षी सीए भूषण मुळ्ये यांच्यावर फेडरेशन २ ड च्या अध्यक्षपदाचे दायित्व जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन वर्ल्ड चेअर पर्सन श्रीमती शायना एन्.सी. यांनी सोपवले आहे. जायंटस् ग्रुपच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आणि शपथविधी सोहळ्यात ते बोलत होते. प्रसाद हॉटेलच्या सभागृहात कार्यक्रम झाला.

या वेळी रत्नागिरीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत भुते यांनी नूतन अध्यक्ष आणि अन्य नूतन कार्यकारिणीने शपथ घेतली. कार्यक्रमात नूतन अध्यक्षांनी मनोगत व्यक्त करतांना जायंट्सच्या माध्यमातून अधिकाधिक समाजसेवा करण्यावर भर देणार असून कायमस्वरूपी उपक्रम राबवण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगिले.

जायंट्सच्या वतीने सामाजिक चळवळ

जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन ही समाजसेवी संघटना आहे. जायंट्सची स्थापना १७ सप्टेंबर १९७२ या दिवशी मुंबईत माजी नगरपाल नाना चुडासामा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. १७ ते २३ सप्टेंबर या काळात जायंट्स सेवा सप्ताहात विविध कार्यक्रम आणि नावीन्यपूर्ण उपक्रम केले जातात. जायंट्सचे भारतात ५०० हून अधिक ग्रुप कार्यरत आहेत. तसेच मॉरिशस, ब्रिटन, आफ्रिका, केनिया, नेपाळ, नॉर्वे, तैवान, अमेरिका, नैरोबी या देशांतही जायंट्स ग्रुप सक्रीय आहे, अशी माहिती या वेळी प्रास्ताविकात अनुया बाम यांनी दिली.