अनधिकृतपणे गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता ! – पोलीस महासंचालक जसपाल सिंह, गोवा

फुलांच्या माळेची गाठ सोडून उद्घाटन करतांना जसपाल सिंह, (मध्यभागी) त्यांच्या डाव्या बाजूला श्री. लक्ष्मण जोशी, श्री. हनुमंत परब, श्री. शिवानंद खेडेकर आणि इतर

वाळपई, ११ फेब्रुवारी (वार्ता.) : अनधिकृतपणे गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता आहे. अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राचे गोरक्षणार्च कार्य उल्लेखनीय आहे, असे उद्गार पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी येथे काढले. ११ फेब्रुवारी या दिवशी नाणूस, वाळपई येथील अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राच्या नूतन गोठ्याचे लोकार्पण आणि केंद्रामध्ये असलेल्या गोमाता मंदिराचा पाचवा वर्धापनदिन यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विविध पारंपरिक आणि धार्मिक उपक्रम झाले.

श्री. हनुमंत परब

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देतांना श्री. हनुमंत परब म्हणाले, ‘‘गोसंवर्धन केंद्राच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. गोमातेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने केंद्राचा विस्तार दिवसागणिक वाढत आहे. अनेक महनीय व्यक्ती आणि गोप्रेमी गोसंवर्धन केंद्राला जोडले जात आहेत. गोसंवर्धन केंद्राच्या कार्याला अनेकांचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभत आहे. यामुळे केंद्राचा विस्तार मोठ्या स्वरूपात केला जात आहे. ११ फेब्रुवारी या दिवशी नूतन गोठ्याचे उद्घाटनही याचाच एक भाग आहे.’’

पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांची अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राच्या ठिकाणी भेट घेऊन त्यांना सनातननिर्मित श्रीकृष्णाचे चित्र असलेली प्रतिमा भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर आणि सौ. शुभा सावंत. समवेत श्री. शिवानंद खेडेकर

केंद्राने संमत केलेले ३ नवीन कायदे देशहितासाठी ! – जसपाल सिंह, पोलीस महासंचालक

याप्रसंगी पोलीस महासंचालक जसपाल सिंह पुढे म्हणाले, ‘‘देशात यापूर्वी इंग्रजांनी सिद्ध केलेले कायदे कार्यवाहीत होते; मात्र मोदी सरकारने ‘भारतीय न्याय संहिता’, ‘भारतीय नागरी सुरक्षा संहिता’ आणि ‘भारतीय साक्ष संहिता’ हे ३ नवीन कायदे संसदेत संमत केले आहेत. हे कायदे संपूर्णत: भारतीय आहेत आणि यामध्ये राष्ट्रासमोरील नवीन संकटांवर मात करण्याची क्षमता आहे.’’