India Russia Relation : अमेरिका भारतासमवेतचे आमचे संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे ! – रशिया

रशियाचा पुन्हा अमेरिकेवर आरोप !

भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह

नवी देहली – रशिया आणि भारत हे दीर्घ काळापासून विश्‍वासार्ह मित्र आहेत आणि आजही त्यांचे संबंध उत्कृष्ट आहेत; परंतु अमेरिका निर्बंधांची धमकी देऊन हे संबंध धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी केला आहे.

डेनिस अलीपोव्ह पुढे म्हणाले की,

१. रशिया हा भारतियांमध्ये एक विश्‍वासार्ह, प्रामाणिक आणि चांगला मित्र म्हणून ओळखला जातो. भारतीय सामाजिक आणि आर्थिक विकासात रशियाच्या मोठ्या योगदानामुळे अशी प्रतिमा प्रारंभी निर्माण झाली होती आणि ती आजही कायम आहे.

२. ‘भारताला रशियापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने काम करत आहेत’, हे भारतात येणारे अमेरिकी अधिकारी थेट सांगण्यास अजिबात संकोच करत नाहीत. यासाठी ते भारतावर निर्बंध घालण्याची धमकीही देत आहेत. खरे सांगायचे तर, काही भारतीय भागीदारांना कधी कधी अत्यंत सावधगिरी बाळगण्यास भाग पाडले जाते; मात्र अशा धमक्या न स्वीकारणार्‍यांची संख्या मोठी आहे.

३. आमचे संबंध विविध क्षेत्रांमध्ये विस्तारत आहेत; परंतु आमच्या पाश्‍चात्त्य भागीदारांप्रमाणे आम्ही कधीही आमच्या सहकार्‍यांसमोर अटी ठेवल्या नाहीत. आम्ही सहकारी देशांच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप केला नाही आणि नेहमीच परस्पर आदर आणि विश्‍वासार्ह संबंध राखले.

संपादकीय भूमिका

अमेरिकेपासून भारताने नेहमीच सावध रहाणेच आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !