महिमा श्रीरामाच्या अयोध्येचा आणि अयोध्येच्या श्रीरामाचा !

नास्तिक आणि पुरोगामी पत्रकारांनीही आवर्जून घेतले प्रभु श्रीरामाचे दर्शन !

या सोहळ्याचे वार्तांकन करण्यासाठी भाविकांप्रमाणेच देशाच्या कानाकोपर्‍यांतून पत्रकार आले होते. २२ जानेवारीला सायंकाळी सर्व पत्रकारांना रामललाच्या दर्शनाला नेण्याची व्यवस्था ट्रस्टकडून करण्यात आली होती. या वेळी ट्रस्टकडून ‘ज्यांना दर्शनाला जायचे आहे, त्यांनी ६ वाजता मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबावे’, असा निरोप पत्रकारांना देण्यात आला होता. प्रत्यक्षात मंदिरात पोचल्यानंतर बघतो तो काय, तर एरव्ही स्वतःला नास्तिक आणि पुरोगामी म्हणवणारे किंवा हिंदु अन् हिंदुत्व यांच्या विरोधात भूमिका घेणारे पत्रकार सर्वांच्या आधी मंदिरात उपस्थित होते ! जणू त्यांच्यातील दडलेल्या श्रद्धांना मोकळी वाट मिळाली होती ! ‘श्रीराम’ या ३ अक्षरी मंत्राची केवढी ही शक्ती ! एवढेच नव्हे, तर दर्शन घेऊन परततांना प्रवासात सर्वच पत्रकारांनी ‘प्रभु श्रीरामचंद्र महाराज की जय’, ‘एकही नारा, एकही नाम, जय श्रीराम जय श्रीराम’, अशा अनेक घोषणाही दिल्या. पत्रकारांमधील श्रीरामभक्तीचे हे उत्स्फूर्त प्रकटीकरण आश्चर्यचकित करणारे होते. – श्री. नीलेश कुलकर्णी

‘चैतन्याविना या जगाचा रहाटगाडा चालू शकत नाही. साधना करणारे हे क्षणोक्षणी अनुभवत असतात. हाच भाग २२ जानेवारीला झालेल्या श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कोट्यवधी भाविकांनी अनुभवला. जसा रामललाच्या (श्रीरामाचे बालरूप) मूर्तीसमोरील पडदा उघडला, तसे कोट्यवधी भाविकांच्या डोळ्यांत भावाश्रू तरळले. जणू या भावाश्रूंद्वारेच श्रीरामाला त्याच्या भक्तांकडून अभिषेक झाला !

१. कोट्यवधी हिंदूंना भावविभोर करणारा श्रीरामनामाचा महिमा !

श्री. नीलेश कुलकर्णी

अयोध्या ही प्रभु श्रीरामचंद्रांची भूमी आहे. या भूमीत प्रत्यक्ष श्रीरामाचा नित्य वास आहे. येथील लोकांच्या मनामनांत, तसेच येथील कणाकणांत श्रीराम आजही निसंशयपणे वास करतात. त्यामुळे सहस्रो वर्षांनंतर आजही येथील चैतन्य अनुभवता येते. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रभु श्रीराम पुन्हा अयोध्येत येऊन विराजमान होणार असल्याचे समजल्यापासून भाविकांना त्यांच्या आगमनाची आस लागली होती. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक अयोध्यानगरीत आले होते. सर्व जण जात-पात, पद, पक्ष, भेद आदी विसरून केवळ श्रीरामाच्या छत्रछायेखाली एकवटले. सर्वांनी आपापला स्वार्थ बाजूला ठेवत जमेल तितका सेवाभाव जोपासला, तसेच अहंकार बाजूला ठेवून सहकार्य केले. विशेष म्हणजे अशीच भावविभोर स्थिती हा सोहळा टीव्हीवर पहाणार्‍या प्रत्येक भाविकाची होती. अनेकांच्या डोळ्यांच्या कडा चिंब भिजल्या. अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. अनेक जण नि:शब्द झाले. सर्वांनी डोळे भरून श्रीरामाचे रूप डोळ्यांत साठवून घेतले. कोट्यवधी हिंदूंची भावजागृती करणारा श्रीरामनामाचा महिमा खरोखर विलक्षण आहे.

२. प्रभु श्रीराममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, पाहू याचि देही याचि डोळा !

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी लाखो भाविक अयोध्येत आले होते. प्रचंड गर्दीमुळे आपली गैरसोय होणार, आपल्याला त्रास होणार, कष्ट सोसावे लागणार, हे ठाऊक असूनही हा त्रास आणि कष्ट सहन करून आबालवृद्ध अयोध्येत ‘प्रभु श्रीराममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, पाहू ‘याचि देही याचि डोळा’, असा जणू पण करूनच आले होते. भाविकांच्या श्रीरामावरील प्रेमाला उपमा देणे केवळ अशक्य आहे.

३. सोहळ्याच्या ‘यजमानपदा’ची धुरा याशस्वीपणे सांभाळणारे अयोध्यावासीय !

श्रीरामाच्या अयोध्यानगरीत रहाण्याचे भाग्य लाभलेल्या अयोध्यावासियांची या सोहळ्यातील सेवा मोठी होती. बंदोबस्तासाठी ठिकठिकाणचे रस्ते बंद होते, त्यामुळे घर जवळ असूनही त्यांना वळसा घालून जावे लागत होते. एरव्ही कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्त अशा प्रकारे स्थानिक लोकांना अडवल्यावर वादावादी होते; परंतु हा सोहळा त्याला अपवाद ठरला. यासह अयोध्यावासियांनी येणार्‍या भाविकांना संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिकाही घेतली होती. चुकलेल्याला रस्ता सांगण्यापासून तहानलेल्यांना पाणी देण्यापर्यंत सर्व त्यांनी केले. यासह घरोघरी भगवे ध्वज फडकावून आणि प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी दिव्यांची आरास करून त्यांनी अयोध्यानगरी सजवली होती. थोडक्यात या सोहळ्याची अप्रत्यक्ष यजमानपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.

४. पोलीस आणि प्रशासन यांची श्रीरामभक्ती !

एरव्ही ‘उर्मटपणे वागणारे’ अशी प्रतिमा असलेले पोलीससुद्धा श्रीरामभक्तीत लीन झाल्याचे दिसत होते. अनेक पोलीस बंदोबस्ताचे कर्तव्य बजावतांना थोडा मोकळा वेळ मिळताच हात जोडून मंदिराच्या दिशेने नमस्कार करतांना अनेकांनी पाहिले आहे. इतकेच नव्हे, तर आपापसांत श्रीरामाविषयी ते चर्चाही करत होते. जसा भाव पोलिसांचा होता, तसाच प्रशासनाचाही होता. एरव्ही ‘टाळाटाळ करणारे’, अशी प्रतिमा असलेले प्रशासन या सोहळ्याच्या निमित्ताने अत्यंत गतीशील आणि तत्पर बनलेले दिसत होते. उदाहरण द्यायचे झाले, तर प्रशासनाकडून एका रात्रीत काही किलोमीटरचे रस्त्यांवरचे खांब, रस्त्यांच्या कडेला असलेले ‘रेलिंग’ आदी रंगरंगोटी करून सजवले जात होते. रातोरात काही भागांचा चेहरामोहरा पालटला जात होता. सहस्रो स्वच्छता कर्मचारी शब्दश: रात्रंदिवस सेवारत होते. ‘सर्व काही रामरायासाठी’ असा भाव त्यांच्या कृतीतून दिसत होता. थोडक्यात प्रशासनाने ‘जे जे उत्तम ते ते देण्यासाठी’ प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

५. ‘श्रीराम’ हा ३ अक्षरी मंत्रच भविष्यात हिंदूसंघटन करील !

या सर्वांवरून ‘श्रीरामाच्या केवळ आगमनाने नागरिक, पोलीस, प्रशासन, पत्रकार आदी समाजघटकांत कसे सकारात्मक पालट झाले, हे आपण प्रत्यक्ष अनुभवले. आता श्रीरामाची शिकवण आपण सर्वांनी दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संकल्प केला पाहिजे. सर्वसामान्य लोकांमध्ये इतकी उत्कंठा आणि इतका पालट यापूर्वी कधीही पहायला मिळालेला नाही. थोडक्यात सांगायचे, तर ‘श्रीराम’ हा असा ३ अक्षरी मंत्र आहे, जो सर्वांना येत्या काळात एका धाग्यात गुंफून हिंदूसंघटन करील. याचीच प्रचीती अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आली. खरोखर श्रीरामाच्या अयोध्येचा आणि अयोध्येच्या श्रीरामाचा महिमा अपरंपार आहे, हे त्रिवार सत्य आहे !

– श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, अयोध्या. (६.२.२०२४)