‘२५.१२.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात नामस्मरणाच्या संदर्भातील विषय चालू असतांना एका शिबिरार्थीनी ‘पश्यंती वाणीतील जप म्हणजे काय ?’, असा प्रश्न विचारल्याचे कळले. तेव्हा मला सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘नामजप करण्याच्या पद्धती’ या ग्रंथातील पश्यंती वाणीसंदर्भातील लिखाण आठवले. त्या ग्रंथात पृष्ठ १७ वर सूत्र क्रमांक ‘१ आ ३.’ मध्ये लिहिले आहे की, ‘पश्य म्हणजे पहाणे. त्रिकाल पहाणार्या द्रष्ट्या ऋषीमुनींचा नामजप होतो, तशा प्रकारच्या नामजपाला ‘पश्यंती’ म्हणतात.’
१. पश्यंती वाणीसंदर्भात चिंतन झाल्यावर मिळालेले उत्तर
पश्यंती वाणीच्या सूत्रावर माझ्या मनात चिंतन झाले, ‘या वाणीत साधकाला नामजप करावा लागत नाही. तो त्याच्याकडून आपोआप होत असतो. ‘आपोआप होणारा नामजप ऐकणे’, एवढीच त्याची क्रिया असते. या अवस्थेत त्याला त्याचा स्थूल जगताशी संबंध नसल्याची जाणीव होते आणि काळाचे ज्ञान होऊ लागते.’ हा विचार एवढ्यावरच सोडून मी पुढील सेवा करू लागलो.
२. भगवंताने उन्नत साधकाच्या अनुभूतीच्या माध्यमातून ‘मला चिंतनातून मिळालेले उत्तर योग्य आहे’, याची पोचपावती देणे
२६.१२.२०२३ या दिवशी दुपारी ४.३० वाजता ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. दिनेश शिंदे यांनी मला सांगितले, ‘‘आता मला नामजप करावा लागत नाही. तो आपोआप होत रहातो. त्या वेळी ‘केवळ तो ऐकणे आणि स्वतःकडे, तसेच अवतीभवती असलेल्या परिस्थितीकडे साक्षीभावाने पहाणे’, एवढेच मी करत असतो. त्या वेळी माझा या जगताशी संबंध नसल्याची जाणीव मला होते.’’
श्री. दिनेश शिंदे यांनी मला हे सांगितल्यावर मला आदल्या दिवशीची पश्यंती वाणीच्या संदर्भातील माझी विचारप्रक्रिया आठवली. तेव्हा मला वाटले, ‘देवाने मला माझी विचारप्रक्रिया योग्य असल्याची पोचपावती साधकाच्या अनुभूतीतून दिली आहे.’
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |