दुचाकी मागे ओढतांना  पायाला जखम झालेली असतांना प.पू. अनंतानंद साईश एका दाढीवाल्या तरुणाच्या रूपात साहाय्यासाठी धावून आल्याची साधकाला आलेली अनुभूती

९.२.२०२४ या दिवशी प.पू. अनंतानंद साईश यांचा दिनांकानुसार प्रकटदिन आहे. त्या निमित्ताने …

प.पू. अनंतानंद साईश
श्री. जगदीश पाटील

‘एके दिवशी मी पनवेल येथे साहित्य आणण्यासाठी एका दुकानात गेलो होतो. दुकानातून बाहेर आल्यावर दुचाकी मागे ओढतांना तिचा ‘स्टॅण्ड’ माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याला लागला. माझ्या अंगठ्याचे अर्धे नख निघाले आणि त्यातून रक्त वाहू लागले. तेवढ्यात अचानक एक दाढीवाला तरुण माझ्याजवळ आला. त्याने माझ्या पायाच्या बोटातून रक्त वहात असल्याचे पाहून माझ्या हातातील गाडी बाजूला लावली आणि माझा हात धरून मला एका औषधालयाजवळ (‘मेडिकल’ दुकानाजवळ) नेले. तेथे त्याने मला लावण्यासाठी मलमपट्टी (‘बँडेज’) मागितली. तसेच एका किराणा दुकानात जाऊन हळद मागून आणली आणि ती माझ्या पायाच्या अंगठ्याला लावून त्यावर पट्टी बांधली. तो म्हणाला, ‘‘नंतर चांगल्या आधुनिक वैद्यांकडून उपचार करवून घ्या’’, एवढे बोलून तो लगेच गर्दीतून निघून गेला. मी त्याच्याकडे बघतच राहिलो.

वरील प्रसंगात दाढीवाला तरुण हिंदी भाषेतून बोलत होता. आश्रमात पोचल्यावर मी खोलीत विश्रांतीला आलो. तेव्हा तो दाढीवाला तरुण आणि वरील प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर दिसत होता. त्याच्या बाजूलाच मला हसणारे प.पू. अनंतानंद साईश दिसले. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले. ‘त्या दाढीवाल्या तरुणाच्या रूपात प.पू. अनंतानंद साईश माझ्यासाठी धावून आले’, असे मला जाणवले आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली अन् ‘प.पू. अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले काही दिवसांपूर्वीच माझ्या स्वप्नात आले होते’, याची मला आठवण झाली.

वरील अनुभूती लिहितांना माझी भावजागृती होत होती आणि प.पू. अनंतानंद साईश यांचे रूप डोळ्यांसमोर दिसत होते.’

– श्री. जगदीश पाटील (वय ४३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.८.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक