Caste Hinduism : ‘जातीभेद’ हा हिंदु धर्माचा भाग नसल्याची कॅलिफोर्निया सरकारची स्वीकृती !

सॅक्रामेंटो (कॅलिफोर्निया) – हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचा डाव अमेरिकेत फसला आहे. कॅलिफोर्निया सरकारच्या नागरी हक्क विभागाने म्हटले आहे की, जातीवर आधारित भेदभाव हा हिंदु धर्माचा आणि त्याच्या शिकवणीचा भाग नाही. यासोबतच या विभागाने २०२० मध्ये ‘सिस्को सिस्टीम्स’ या कॅलिफोर्नियामधील आस्थापनाच्या विरोधात नोंदवलेली जातीभेदाच्या विषयीची तक्रार संशोधनाअंती फेटाळून लावली. कॅलिफोर्निया नागरी हक्क विभागाने गेल्या वर्षीच या प्रकरणापासून स्वेच्छेने स्वतःला दूर केले होते.

हिंदु अमेरिकनांसाठी मोठा विजय ! – हिंदु संघटना

‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ या अमेरिकेतील हिंदूंच्या हक्कांसाठी लढणार्‍या संस्थेने निवेदन प्रसिद्ध करून म्हटले आहे की, हिंदु अमेरिकनांसाठी हा मोठा विजय आहे.

काय प्रकरण आहे ?

वर्ष २०२० मध्ये सिलिकॉन व्हॅलीमधील आस्थापन ‘सिस्को सिस्टीम्स’मधील भारतीय वंशाच्या अमेरिकी अभियंत्याने, ‘माझ्या भारतीय वंशाच्या सहकार्‍यांनी माझ्याशी जातीच्या आधारावर भेदभाव केला; कारण मी दलित समाजाचा आहे आणि माझ्या गटातील इतर कर्मचारी उच्चवर्णीय आहेत’, असा आरोप केला. याप्रकरणी कॅलिफोर्निया सरकारने नागरी हक्क कायद्याच्या अंतर्गत ‘सिस्को सिस्टीम्स’च्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणाने अमेरिका आणि भारत यांच्यात बरीच चर्चा झाली होती. अमेरिकेतील दलितांच्या हक्कांसाठी लढणार्‍या काही संघटना या खटल्यात सहभागी झाल्या होत्या.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्मात जातीव्यवस्था आहे’, असे सांगत भारतातील पुरो(अधो)गामी मंडळी  हिंदु धर्मावर टीका करतात. त्यांची तोंडे बंद करण्यासाठी भारत सरकारनेही प्रयत्न करावेत !