श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी संत आहेत. भगवान दत्तात्रेय हे सनातन धर्मातील आराध्य दैवत आहे. सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर स्वामी समर्थांची मालिका चालू आहे. या मालिकेत आरंभीपासून स्वामींची प्रतिमा काहीही कारण नसतांना धर्मनिरपेक्ष दाखवण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना अनेकदा दृष्टांत देतांना मौलवीच्या वेषात दाखवण्यात येत आहे. प्रत्यक्ष स्वामी समर्थांच्या चरित्रामध्ये असे काही नसतांना हे का दाखवले जात आहे ? हे कोडे ही मालिका पहाणार्या प्रेक्षकांना पडले आहे; परंतु त्याविरोधात कुणीही वाहिनी किंवा संबंधित निर्माते यांना आतापर्यंत जाब विचारल्याचे ऐकिवात नाही. खरे तर अशा प्रकारे प्रेक्षकांची दिशाभूल करून जाणूनबुजून इस्लामचे उदात्तीकरण करणे हाही जाणीवपूर्वक केलेला ‘जिहाद’च आहे. हळूहळू होणार्या विषप्रयोगाप्रमाणे चित्रपटांसमवेत अनेक विज्ञापनांतून आणि आता मालिकांमधून हिंदु धर्माचा मोठ्या प्रमाणात अवमान करण्यात येऊन इस्लाम पंथाचा उदो उदो करण्यात येतो.
गेली कित्येक दशके हिंदी चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून हिंदु देवता आणि धर्म यांच्यावर अश्लाघ्य विनोद करण्यात येत आहेत. दुसर्या बाजूला ‘मुसलमान समाज आणि त्यांचे धर्मगुरु कसे चांगले आहेत’, हे दाखवून इस्लाम पंथाचे उदात्तीकरण करण्यात येत आहे. हे सर्व इतके बिनबोभाट चालत आहे की, हिंदूंना ते कळतही नाही. हाच प्रकार आता मालिकांमधूनही चालू आहे. आजपर्यंत स्वामी समर्थांना किमान ६ वेळा वेगवेगळ्या कथानकांमध्ये मौलवीच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. इस्लाम पंथ हिंदूंवर थोपवण्याचाच हा प्रकार नाही का ? अशा मालिका पहाणारा हिंदु प्रेक्षकवर्गच मोठा आहे. त्यामुळे हिंदूंवर सर्वधर्मसमभावाचा कुसंस्कार या मालिकेतून होऊ शकतो, यात शंका नाही. ‘कलर्स वाहिनी’वरील मालिकांमध्ये बहुतांश वेळा ‘सर्वधर्मसमभाव’ दाखवण्याचा विशेष प्रयत्न होतो, हे प्रकर्षाने लक्षात आल्याविना रहात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालिकांमध्येही समर्थ रामदासस्वामींना त्यांचे गुरु म्हणून दाखवले गेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना ‘धर्मनिरपेक्ष’ दाखवण्याचा प्रयत्न वारंवार होत असतो. खरे तर मालिका, चित्रपट हे समाजप्रबोधनाचे उत्तम माध्यम ठरू शकते; पण त्याच वेळी सत्याचा अपलाप करणारा इतिहास दाखवून या वाहिन्या एकप्रकारे करत असलेला विद्रोह हा समाजद्रोह ठरू नये, यासाठी त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे वाटते. वाहिन्यांना श्रद्धेने मालिका पहाणार्यांची दिशाभूल करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी योग्य आणि खरा इतिहास दाखवणे अपेक्षित आहे, अन्यथा विरोध झाल्यास आश्चर्य ते काय ?
– सौ. अपर्णा जगताप, पुणे.