इस्रायलच्या सैनिकांची साहसी कारवाई !‘इस्रायल आणि हमास यांचे युद्ध अद्यापही चालू आहे. गाझा पट्टीच्या एका हॉटेलमध्ये आतंकवादी लपून बसले होते. ते तेथील रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये स्वत:ला लपवत होते. त्यामुळे इस्रायलच्या सैनिकांनी त्यांच्या नेहमीच्या वेषात हॉटेलमध्ये प्रवेश केला नाही, तर मुसलमान महिला आणि डॉक्टर्स किंवा कर्मचारी यांच्या वेषात हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तेथे लपलेल्या आतंकवाद्यांना ओळखून ठार मारले. ही अत्यंत साहसी कारवाई आहे.’ – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. |
‘यावर्षी २६ जानेवारीला ‘पद्मभूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आले. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते कुणी वलयांकित किंवा आपल्या परिचयाची माणसे नव्हती, तर ते त्यांच्या कर्तृत्वाने असामान्य होती. त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये अतिशय चांगले काम केले होते. यापूर्वी आपण त्यांचे नाव ऐकल्याची शक्यता फारच अल्प आहे. या सर्व असामान्य लोकांना आपण नमन केले पाहिजे. भारत सरकारने तैवानच्या ‘फॉक्सकॉन’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यंग लियू यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार घोषित केला. भारत सरकारचा हा अतिशय चांगला निर्णय आहे.
१. ‘फॉक्सकॉन’च्या ‘सीईओं’ना ‘पद्मभूषण’ देण्यामागील कारणे
‘फॉक्सकॉन’ हे जगातील एक प्रचंड मोठे इलेक्ट्रॉनिक आस्थापन आहे. भारताच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीत तिचा मोठा वाटा आहे, तसेच हे आस्थापन भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महाशक्ती बनवण्यात एक मोठी भूमिका बजावत आहे.
या आस्थापनाने काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती चालू केली आहे. त्यांच्या कारखान्यात लक्षावधी भारतियांना रोजगार मिळाला आहे. ‘फॉक्सकॉन’ हे ‘ॲपल’ आस्थापनाचीही उत्पादने बनवते. आता ‘आयफोन’पासून ‘आयपॅड’पर्यंत सर्वच उत्पादने भारतातच बनत आहेत. भारतात ‘सेमीकंडक्टर’ आणि ‘मायक्रोचिप’ बनवण्याचीही त्यांची याेजना आहे. त्यांनी भारतात २ मिलीयन डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. भारताला त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे.
त्यांचे सर्वांत मोठे कारखाने हे चीनमध्ये आहेत. चीन हा धोकादायक देश आहे. त्यामुळे तेथील कारखाने हे चीनच्या बाहेर नेण्याची तैवानची इच्छा आहे. यात भारताचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. येणार्या काळात ‘फॉक्सकॉन’ची भारतातील गुंतवणूक वाढणार आहे. त्यामुळे भारतात रोजगाराची निर्मिती होणार आहेच; पण त्याहूनही ‘भारत जगातील ‘सेमीकंडक्टर’ची महाशक्ती बनायला पाहिजे’, असे भारताला वाटते. जगातील अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही ‘सेमीकंडक्टर’वर चालतात. यात ‘फॉक्सकॉन’ आणि तैवान यांचा मोठा सहभाग असणार आहे. त्यामुळे ‘फॉक्सकॉन’च्या ‘सीईओं’ना भारताचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार देणे योग्य आहे.
२. ‘फॉक्सकॉन’ला पुरस्कार म्हणजे चीनला चेतावणी !
भारताचा तैवानशी ७ अब्ज डॉलर्सहून (५८ सहस्र १०० कोटी रुपये) अधिक व्यापार झालेला आहे. तैवान त्यांचे तंत्रज्ञान भारतात हस्तांतरित करण्यास सिद्ध आहे. त्यामुळे ‘फॉक्सकॉन’च्या ‘सीईओं’ना पुरस्कार देणे, हा चीनसाठी एक धक्का आहे. जे विदेशी नागरिक भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात साहाय्य करत आहेत, त्यांनाही पुरस्कृत करणे अतिशय उचित आहे. त्यामुळेच ‘फॉक्सकॉन’च्या ‘सीईओं’ना यावर्षी पुरस्कार देण्यात आला.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.