बनावट (खोटी) क्रीडा प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी पोलिसाच्या विरोधात गुन्हा नोंद !

पुणे – राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस भरतीसाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर करून ओबीसी खेळाडू प्रवर्गातून भरती झालेल्या वर्धा येथील नवप्रविष्ट पोलीस शिपायाच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. सुशील केशवराव वाघमारे (वय ३३ वर्षे) असे संशयिताचे नाव असून त्यांना लेखी परीक्षेत ७३ गुण, तर मैदानी परीक्षेत ८७ गुण मिळाल्याने निवड सूचीत नाव आले होते. ओबीसी खेळाडू प्रवर्गातून भरती होतांना त्याने २ ऑगस्ट २०२३ या दिवशी सेपाक टकरॉ (व्हॉलीबॉलसारखे नियम असणारा खेळ) या खेळाचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते, तसेच बालेवाडी, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय कार्यालयाच्या नावाने खेळासंबंधी बनावट पुनर्पडताळणी अहवाल आणि शिक्के सिद्ध करून, बनावट स्वाक्षरी करून कागदपत्रे सादर केली होती.

बनावट प्रमाणपत्रांविषयी भरतीसाठी आलेल्या उमेदवाराने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अन्वेषण केले असता प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वाघमारे यांच्या विरोधात फसवणूक करणे, बनावट दस्ताऐवज सिद्ध करणे, व्यक्तीच्या लौकिकास बाधा आणणे, बनावट शिक्का, मुद्रापट आणि अन्य साधनांचा उपयोग करून ते जवळ बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. साहाय्यक निरीक्षक अरविंद गटकुळ या प्रकरणी पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

फसवणुकीच्या पायावरच उभे असणारे पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?