राज्य परिवहन महामंडळातील ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील गतीदर्शक यंत्र बंद !

  • अनियंत्रित वेगामुळे वाहतूक पोलिसांनी चालकांकडून आकारला ५०० ते २ सहस्र ५०० रुपयांपर्यंत दंड

  • दंड वेतनातून कापला जात असल्याने ३२ सहस्र बसचालक तणावात !

मुंबई – महाराष्ट्रात विविध गावांमधून धावणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील ‘स्पीडोमीटर’ (गतीदर्शक यंत्र) बंद आहे. त्यामुळे चालकांना गाड्यांची गती समजत नाही. एखाद्या बसगाडीचा अधिकचा वेग पाहून वाहतूक पोलीस चालकांवर कारवाई करत आहेत. यामुळे त्यांना दंड सुनावला जात असून ती रक्कम चालकांकडूनच वसूल करण्यात येत आहे. अनेक बसचालकांकडून ५०० ते २ सहस्र ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे अधिक गती आणि मार्ग पालटणे (‘लेन कटिंग’) याच्याशी संबंधित आहेत.
राज्य सरकारच्या महामंडळाच्या ताफ्यात एकूण १६ सहस्र बसगाड्या आहे. प्रतिदिन १४ सहस्र बस रस्त्यावर धावतात. या गाड्या अतिवेगाने धावणार नाहीत, यासाठी महामंडळांच्या सर्व गाड्यांना ताशी ८० कि.मी. वेगाची मर्यादा नियंत्रित (लॉक) करण्यात आली आहे; पण उतारावर बस या वेगमर्यादेचे उल्लंघन करते. या प्रकरणी कारवाई करण्यात आले आहे. बसचालकांचा दोष नसतांना अशा प्रकारे वसुली करून चालकांवर अन्याय केला जात असल्याचे मत चालकांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणात वसूल करण्यात येणारा दंड बसचालकांच्या वेतनातून महामंडळ कापत आहे. यामुळे ३२ सहस्र बसचालक तणावात आहेत.

माहिती चुकीची असल्याचे व्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक यांचे विधान !

‘आम्ही आतापर्यंत चालकांकडून चुकीच्या पद्धतीने दंडाची रक्कम वसूल केलेली नाहीत. यासंदर्भातील माहिती घेत आहोत’, असे महामंडळाचे (वाहतूक) व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी म्हटले आहे. ‘गतीदर्शक यंत्र बंद असल्याची माहिती चुकीची असून याविषयी चौकशी करत आहोत’, असे (अभियांत्रिकी) महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर यांनी म्हटले आहे.