पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपकडून ‘सॅनिटरी नॅपकीन’चा घोटाळा !

राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप

पुणे – महापालिकेच्या शाळांतील इयत्ता ७ वी ते १० वीच्या ३८ सहस्र विद्यार्थिनींना मासिक पाळीमध्ये ‘सॅनिटरी नॅपकीन’चे वाटप करण्यात येते. याची निविदा आपल्या मर्जीतील ठेकेदाराला दिली, त्यासाठी भाजपचे खासदार आणि लोकसभा प्रभारी हे महापालिकेवर दबाव आणत आहेत, असा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि पुणे शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी ३१ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये केला.

शिंदे म्हणाले, ‘‘या व्यवहारामध्ये मनपाची २४ लाख रुपयांची हानी होत असल्याने शहरातील भाजप लोकप्रतिनिधींनी आयुक्तांना याविषयी लेखी पत्र दिले आहे. या दोघांच्या वादातून मनपाला ‘सॅनिटरी नॅपकीन’ खरेदी करता येत नाहीत. ८ सहस्र कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणार्‍या मनपाला या खरेदीसाठी ‘सी.एस्.आर्.’ फंडातून साहाय्य घ्यावे लागत आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.’’

पुणे महानगरपालिकेची मुदत संपून २ वर्षे झाली आहेत. या २ वर्षांमध्ये निविदा प्रक्रिया राबवली गेली नाही. तसाच ठेका देण्यात आला. सध्या त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यातून आर्थिक लाभ व्हावा, यासाठी भाजपचे नेते मर्जीतील ठेकेदारास निविदा मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. सदर निविदा प्रकरणी दोन्ही बाजूंनी निविदा पात्रतेसाठी केलेल्या पत्रव्यवहार गृहखाते यांनी पडताळून त्वरित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.