World Corruption Index 2023 : भारत जागतिक क्रमवारीत ८५ व्या स्थानावरून ९३ व्या स्थानावर घसरला !

‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या वर्ष २०२३ च्या अहवालनुसार भारतातील भ्रष्टाचारात वाढ !

नवी देहली – ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या वर्ष २०२३ च्या अहवालानुसार भ्रष्टाचारामध्ये जगातील १८० देशांमध्ये भारताचा क्रमांक ९३ असल्याचे दर्शवण्यात आले आहे. वर्ष २०२२ मध्ये भारत ८५ क्रमांकावर होता. याचाच अर्थ भारतात वर्ष २०२२ च्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये भ्रष्टाचारामध्ये वाढ झाली, असेच निदर्शनास येत आहे. ज्या देशांमध्ये भ्रष्टाचार अल्प आहे त्यांची नावे पहिल्या स्थानी असतात आणि ज्या देशांत भ्रष्टाचार अधिक आहे, त्यांची नावे खाली दर्शवण्यात येतात. यानुसार पाकिस्तानचा क्रमांक १३३ वा आहे, तर चीन ७६ व्या क्रमांकावर आहे. सोमालिया सर्वांत भ्रष्ट म्हणजे १८० व्या क्रमांकावर आहे.

या क्रमांकांसाठी ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’चे तज्ञ प्रत्येक देशातील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे मूल्यांकन करतात. यानंतर प्रत्येक देशाला ० ते १०० गुण दिले जातात. ज्या देशात जितका भ्रष्टाचार असेल, तितके अल्प गुणे दिले जातात. या आधारावर क्रमवारी निश्‍चित केली जाते. भारताला वर्ष २०२३ अहवालात ३९ गुण मिळाले, तर वर्ष २०२२ मध्ये ४० गुण मिळाले होते. केवळ एक गुणामुळे भारताची ८ स्थानांनी घसरण झाली आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ किंवा अन्य विदेशी संस्था या भारतद्वेषी असल्यामुळे त्यांच्या अहवालांवर किती विश्‍वास ठेवायचा ?’, हा प्रश्‍नच आहे. अशा संस्थांच्या अहवालांवर भारतियांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • असे असले, तरी भ्रष्टाचार ही भारतातील गंभीर समस्या आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. भ्रष्टाचार्‍यांना फाशीची शिक्षा दिली, तरच ही समस्या आटोक्यात येईल !