आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या सहस्रो वर्षांनंतरही आरोग्यासाठी लाभदायक !

दिनचर्येचे पालन करणे का आवश्यक ?

आपण या लेखात दिलेला दिनचर्येचा अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येईल की,

अ. व्यायाम आणि अंघोळ केल्यानंतर शरिरातील जठराग्नी प्रदीप्त होतो अन् त्या वेळी आहार घेतल्यानंतर तो यथायोग्य पचतो. ‘मला उठल्यानंतर पहिले चहा लागतोच’, असे बरेच जण म्हणतांना दिसून येतात. उपाशीपोटी चहा प्यायल्याने जठराग्नी मंद होतो आणि तिथूनच पचनाच्या तक्रारी चालू होतात.

आ. प्रतिदिन आहार जसा महत्त्वाचा तेवढाच व्यायामही महत्त्वाचा आहे, हे मनावर बिंबवले पाहिजे.

इ. स्वतःची नोकरी, व्यवसायाचे स्वरूप कसे आहे, त्याप्रमाणे स्वतःचे नियोजन करून दिनचर्येत सांगण्यात आलेल्या ज्या ज्या कृती शक्य आहे त्या करण्यास प्रारंभ करावा, जेणेकरून स्वतःचे आरोग्य राखण्यास साहाय्य होईल.

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (२९.१.२०२४)

मध्यंतरी एका नामांकित योग प्रशिक्षकांनी एका व्याख्यानात त्यांच्या आरोग्याचे रहस्य सांगतांना त्यांनी त्यांची दिनचर्या सांगितली. ती पूर्णतः आयुर्वेदात सांगितलेल्या नियमांप्रमाणे होती. आयुर्वेद सहस्रो वर्षांपूर्वीपासून आहे; परंतु त्यातील सिद्धांत आजही तंतोतंत लागू होतात आणि त्या आधारे मनुष्याचे आरोग्य अबाधित ठेवता येते; म्हणूनच आयुर्वेद चिरंतन आहे. आजच्या लेखात आपण ‘स्वतःची दिनचर्या आयुर्वेदानुसार कशी असली पाहिजे ? ती तशी का असावी ?’, याचे महत्त्व जाणून घेणार आहोत. आताच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपल्याला आदर्श दिनचर्या १०० टक्के पाळणे एका दिवसात शक्य होईलच, असे नाही; पण प्रत्येकाने त्या आदर्श जीवनशैलीचा अधिकाधिक अवलंब करण्याचा नक्की प्रयत्न करायला हवा.

१. सकाळी लवकर उठणे

‘ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत् स्वस्थो रक्षार्थमायुषः । (अष्टाङ्गहृदय, सूत्रस्थान, अध्याय २, श्लोक १)’, म्हणजे ‘निरोगी व्यक्तीने आयुष्याच्या रक्षणासाठी (चांगल्या आरोग्यासाठी) ब्राह्म मुहूर्तावर उठावे.’ लहान मुले, आजारी व्यक्ती, वयोवृद्ध आहेत किंवा जे रात्री उशिरा झोपले आहेत, हे याला अपवाद आहेत. या श्लोकात ‘निरोगी व्यक्ती’ हे आवर्जून सांगितलेले आहे. प्रतिदिन ब्राह्म मुहूर्तावर उठले पाहिजे; पण त्यासाठी रात्री लवकर झोपायला हवे आणि किमान ७ घंटे झोप व्हायला हवी. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याचे रक्षण होते. पहाटे लवकर उठल्यामुळे मलप्रवृत्ती साफ होते. प्रतिदिन उशिरा उठणार्‍या व्यक्तींना मलबद्धतेचा त्रास हा होतोच. मग पोट साफ होत नाही; म्हणून चहा पिणे, तंबाखू खाणे असे केल्याविना शौचाला होत नाही. पोट साफ नसेल, तर अनेक आजारांना निमंत्रण मिळते. तोंडाला वास येणे, अन्नपचन नीट न होणे, भूक न लागणे, आळस अशा समस्या निर्माण होतात; म्हणून रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे ही साधी कृती आपल्या आरोग्याच्या बहुतांश समस्या न्यून करते.

२. सकाळी उठल्यावर पहिले शौचास जावे

सकाळी उठल्यावर शौचास होणे, हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. शौचाला गेल्यावर वर्तमानपत्र वाचणे, भ्रमणभाष (मोबाईल) बघणे इत्यादी कृती करतात. ते अत्यंत चुकीचे आहे. मल-मूत्र विसर्जन करतांना मनाला विचलित करणार्‍या गोष्टी घडल्या, तर शौचाला साफ होणार नाही. परिणामी अशी व्यक्ती पुष्कळ वेळ शौचालयात घालवते; म्हणून अशा चुका आवर्जून टाळल्या पाहिजेत. ज्यांना शौचाला जाण्याची संवेदना आली नाही, त्यांनी बळजोरीने कुंथू (जोर करू नये.) नये. शौचाला जाण्याची संवेदना झाल्यावरच शौचाला जावे.

३. दात घासणे आणि गंडूष (गुळण्या) करणे

वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर

दात घासण्यासाठी सध्या सर्वत्र ‘टूथपेस्ट’चाच वापर केला जातो. आपल्याकडे वनस्पतींच्या कोवळ्या काड्या चावणे, दंतमंजनचा वापर करणे, हे पूर्वापार चालत आलेले आहे; पण भारतात पाश्चात्त्यांनी टूथपेस्टची सवय लावली. काळानुरूप झालेला हा पालट असला, तरी आपण दात घासण्यासाठी अधूनमधून दंतमंजनचा वापर करायला हवा. त्यातील तुरट, तिखट आणि कडू चवीच्या वनस्पती दात अन् हिरड्या यांचे आरोग्य राखतात.

 

त्यानंतर गंडूष म्हणजे गुळण्या करणे आवश्यक आहे. मग त्या पाण्याने असो, औषधी काढ्याने अथवा तेलाने असो. दात, हिरड्या, गळा यांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी तेलाने (तीळ वा खोबरेल तेल) गुळण्या करायला हव्यात. गुळण्या करून झाल्यावर ते तेल थुंकून द्यावे आणि चूळ भरावी. याच क्रियेला ‘ऑईल पुलींग’ असे म्हणतात.

४. प्रतिदिन अभ्यंग करणे महत्त्वाचे !

प्रतिदिन शरिराला तेल लावण्याचे महत्व आपण आधीही समजून घेतले आहे. अभ्यंग केल्यामुळे शरिराचा थकवा निघून जातो, वात न्यून होतो, शरीर पुष्ट होते, आयुष्य वाढते, त्वचा सुकुमार होते, शरीर सुदृढ होते. आपल्याकडे दिवाळीच्या कालावधीत किंवा हिवाळ्यात अभ्यंग केले जाते. अन्य वेळी कुणी अभ्यंग करतांना दिसून येत नाही; परंतु आयुर्वेदाने दिनचर्येत याचा समावेश केला आहे, म्हणजे प्रतिदिन अभ्यंग होणे अपेक्षित आहे. प्रतिदिन शक्य झाले नाही, तर किमान आठवड्यातून २ वेळा तरी संपूर्ण शरिराला अभ्यंग करावे. त्यासाठी तीळ तेलाचा वापर करू शकतो. संपूर्ण शरिराला अभ्यंग करणे शक्य नसेल, तर डोके आणि पाय यांना अवश्य तेल लावावे. ज्यांना कफाचा त्रास आहे अथवा अजीर्ण झाले आहे, अशांनी मात्र अभ्यंग करू नये.

५. प्रतिदिन व्यायाम करणे

व्यायामाचे लाभ तर सर्वांनाच माहिती आहेत. व्यायामाने अंग हलके होते, दिवसभरात आपण जी कामे करतो त्यासाठीचे सामर्थ्य व्यायामाने मिळते. शरीर रेखीव आणि पिळदार होते. व्यायाम करतांना तो स्वतःच्या शक्तीच्या अर्ध्या प्रमाणात करावा, म्हणजे तोंडाने श्वास घ्यावा लागला की, थांबावे. अतीप्रमाणात व्यायाम करण्याचे टाळावे.

६. अंगाला उटणे लावणे आणि नंतर स्नान करणे

याला आयुर्वेदात ‘उद्वर्तन’ असे म्हणतात. अंगाला प्रतिदिन उटणे लावल्याने कफ न्यून होतो, अतिरिक्त चरबी झडते, त्वचा स्वच्छ होते. उटणे लावून झाल्यावर ऊन (कोमट) पाण्याने अंघोळ करावी. खांद्यापासून खाली गरम पाणी वापरावे, डोके आणि तोंड धुतांना अगदी कोमट ते थंड पाण्याने धुवावे. डोळे आणि केस यांसाठी गरम पाणी अहितकारी आहे. ज्यांना सर्दी, अजीर्ण, अतिसार झाले आहे अशांनी आणि सर्वसामान्यांनी जेवण झाल्यावर स्नान करू नये.

७. अंघोळ झाल्यावर जेवण करावे

रात्री घेतलेला आहार पूर्ण पचल्यानंतरच स्वतःच्या प्रकृतीसाठी योग्य आणि आवश्यक त्या प्रमाणात जेवण करावे. जेवणाचे नियम यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या (५ एप्रिल २०२३ आणि ५ जुलै २०२३ या दिवशीच्या) लेखात आपण बघितलेले आहेत. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती या लेखात टाळत आहे.

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (२९.१.२०२४)