गुरुकार्यासाठी सदैव तत्पर आणि साधकांचा आधार असलेले झाराप (तालुका कुडाळ) येथील कै. वासुदेव प्रभूतेंडोलकर (वय ६६ वर्षे)

‘गावडेवाडी (झाराप, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनचे साधक श्री. वासुदेव विनायक प्रभूतेंडोलकर (वय ६६ वर्षे) यांचे २०.१.२०२४ या दिवशी निधन झाले. ३१.१.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवसआहे. त्यानिमित्त साधकांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कै. वासुदेव प्रभूतेंडोलकर

१. श्री. राजाराम परब, तेर्सेबांबर्डे

१ अ. स्वीकारण्याची वृत्ती असणे : ‘एकदा दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करण्यात अडचण निर्माण झाली होती. त्याविषयी प्रभूतेंडोलकर काकांना विचारल्यावर त्यांनी दैनिक वितरणाची सेवा अगदी सहजपणे स्वीकारली. दैनिक वितरणाचा मार्ग अधिक लांबचा असूनही काकांनी स्वतःच्या वयाचा विचार न करता ती सेवा केली. त्यांची सेवा करण्याची पद्धत चांगली आणि परिपूर्ण होती.

१ आ. इतरांना साहाय्य करणे आणि व्यवहार काटेकोरपणे करणे : कुणाचीही काही अडचण असली, तरी मागचा पुढचा विचार न करता ते कुणालाही सहकार्य करत असत. ते आर्थिक व्यवहार नेहमीच काटेकोरपणे पूर्ण करत असत. कुणाचेही देणे किंवा इतर कोणताही आर्थिक विषय ते कधीच अपूर्ण ठेवत नसत.’

२. सौ. प्रणिता तवटे, पाट

२ अ. प्रांजळ स्वभाव : काका मनाने एकदम प्रांजळ होते. ते स्पष्टवक्ते होते, तरीही सर्वांना त्यांचा आधार वाटायचा.

२ आ. समजूतदारपणा : ते सर्वांना समजून घ्यायचे आणि साहाय्य करायचे. ते साधकांना आध्यात्मिक आणि व्यावहारिक स्तरांवर साहाय्य करत असत.

२ इ. आनंदी : ‘कै. प्रभूतेंडोलकरकाका नेहमी आनंदी असायचे. त्यांना बघितल्यावर आनंद आणि चैतन्य जाणवायचे.

२ ई. परिपूर्ण सेवेचा ध्यास : एखादा उपक्रम करायचा असेल, तेव्हा काका उपक्रम चांगला होण्यासाठी पुष्कळ सेवा करत, उदा. फलक लावणे, छायाचित्र काढणे, प्रमाणपत्र सिद्ध करणे, उपक्रमाशी संबंधित अधिकार्‍यांशी बोलणे.

२ उ. अल्प अहं : ते बुद्धीमान आणि अध्यात्मातील माहिती असणारे होते, तरीही ते नवीन असल्यासारखे इतर साधकांचे ऐकायचे. ते सर्वांमध्ये मिळून मिसळून रहायचे.’

३. सौ. सीमा पै, कुडाळ

३ अ. ‘सेवेत सहभागी होऊन साधकांना साहाय्य करणे : ‘काकांचा प्रत्येक सेवेमध्ये सहभाग असायचा. ते प्रत्येक सेवा उत्साहाने करायचे. साधकांना सेवाकेंद्रात किंवा लांब कुठेही सेवेसाठी जायचे असेल, तेव्हा ते साधकांना स्वतःच्या गाडीने सोडत असत.

३ आ. सेवेची तळमळ : गुरुसेवा करतांना त्यांनी स्वतःच्या शारीरिक त्रासांची काळजी केली नाही. शारीरिक त्रास असूनही त्यांनी सेवेत कधीही खंड पडू दिला नाही.

३ इ. प्रभूतेंडोलकर काकांमध्ये पुष्कळ प्रेमभाव होता.’

४. सौ. सुप्रिया वारखंडकर, पिंगुळी

४ अ. ‘प्रभूतेंडोलकरकाका गुरुकार्याची हानी होऊ नये; म्हणून वेळेचे बंधन कटाक्षाने पाळत असत.’

५. सौ. संपदा संदीप चिऊलकर, पिंगुळी

अ. ‘प.पू. गुरुदेव सेवा करून घेणार आहेत’, असा त्यांचा भाव असायचा.’

६. सौ. मंजुषा मनोज खाडये, कुडाळ

६ अ. साधकांना विविध सेवांत साहाय्य करणे

१. ‘पंधरा दिवसांपूर्वी पार्सल सेवेसाठी चारचाकी गाडी मिळत नव्हती. मी प्रभूतेंडोलकर काकांना रात्री उशिरा भ्रमणभाष करून गाडी संदर्भात विचारले. तेव्हा त्यांनी त्यांची गाडी लगेच दिली.

२. १८.१.२०२४ या दिवशी माझ्याकडील फलक काकांकडे पोचवायचा होता. मी त्यांना काही सांगण्यापूर्वीच काकांनी स्वतःहून ‘फलक न्यायला कुठे येऊ ?’, अशी विचारणा केली.

३. दोन वर्षांपूर्वी कुडाळ येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची घडी बसवायची होती. त्या वेळी काकांनी मला अभ्यासपूर्ण साहाय्य केले.’

७. श्री. आनंद नाईक, आंबडपाल, कुडाळ

७ अ. आधार वाटणे : ‘काका साधकांच्या अडचणी समजून घेऊन साधकांना साहाय्य करायचे. ते माझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी माझ्या समवेत सावलीसारखे उभे रहायचे.

७ आ. प्रेमभाव : माझ्या कुटुंबियांविषयी काकांना पुष्कळ जिव्हाळा होता. माझ्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांचे स्थान होते.’

८. श्री. गुंडू डिचोलकर, तेर्सेबांबर्डे

८ अ. टापटीपपणा : ‘प्रभूतेंडोलकर काका यांच्याकडे अनेक वर्षांच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांचा साठा एकत्रित आणि व्यवस्थितपणे बांधून ठेवलेला आहे. त्यांना मागील कोणत्याही दिनांकाचा दैनिकाचा अंक मागितल्यावर ते तो अंक पटकन शोधून द्यायचे.’

९. सुश्री वैशाली भंडारी, कुडाळ

९ अ.साहाय्य करणे

१. ‘वर्ष २०२२ मध्ये आम्ही मुंबईहून कुडाळ येथे स्थलांतरण केले. मला कुडाळचा परिसर नवीन होता. तेव्हा प्रभूतेंडोलकरकाकांनी मला दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाच्या सेवेत पुष्कळ साहाय्य केले. ते १२ ते १४ कि.मी. प्रवास करून मला साहाय्य करण्यासाठी यायचे.

२. गुरुपौर्णिमेच्या सेवेत साहाय्य करणे : वर्ष २०२३ मध्ये माझ्याकडे कुडाळ येथील गुरुपौर्णिमा सोहळ्याचे आयोजन करण्याचे दायित्व होते. काका मला सेवेसाठी सहसाधक म्हणून लाभले होते. कुडाळचे साधक मला नवीन होते. तेव्हा साधकांशी समन्वय करणे, उद्घोषणा करणे, फलक लावणे इत्यादी सेवांसाठी काकांनी मला पुष्कळ साहाय्य केले. त्यांना जेवणासाठी दुपारचे २.३० वाजायचे, तरीही त्यांनी कधीही तक्रार केली नाही.’

९ आ. सेवेची तळमळ आणि गुरूंवर श्रद्धा असणे : माझ्याकडे कुडाळ केंद्राचे दायित्व होते. तेव्हा मला ३ उपकेंद्रात सत्संग घेणे आणि इतर सेवांसाठी जावे लागायचे. तो मार्ग निर्जन असायचा आणि तिथे काळोख असल्यामुळे मला घरी यायला उशीर व्हायचा. तेव्हा काका माझ्या समवेत यायचे. त्यांना वयोमानानुसार रात्रीची गाडी चालवण्यास त्रास व्हायचा, तरीही ते मला म्हणायचे, ‘‘गुरुदेवांनी सेवा दिली आहे आणि तेच सेवा करण्यासाठी बळ देतील अन् तेच सेवा करवून घेतील.’’ यातून त्यांची सेवेप्रती तळमळ आणि गुरुदेवांवरील श्रद्धा दिसून आली.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २७.१.२०२४)