जागतिक स्तरावर पोचवणार संस्कृत विद्यापिठाची माहिती !
संस्कृत विद्यापिठालाही होईल लाभ !रामटेक येथील संस्कृत विद्यापिठाचा प्रचार-प्रसार उत्तम झाला आहे. आतापर्यंतच्या कुलगुरूंकडूनही या संदर्भात पुढाकार घेण्यात आला आहे. सध्या विद्यापीठ ६७ सहस्र ४६३ विद्यार्थ्यांपर्यंत पोचले आहे. संस्कृत वेदपाठशाळांना संलग्नता दिल्यास संस्कृत विद्यापिठाचा प्रचार-प्रसार होईल. त्याचा लाभ विद्यापिठालाही होणार आहे. |
नागपूर – ‘संस्कृतचे अध्ययन आणि अध्यापन करणार्या राज्यातील अनुमाने १०० वेदपाठशाळांना रामटेक येथील ‘कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापिठा’शी संलग्नता देण्यात येणार आहे. आतापर्यंत ९ वेदपाठशाळांना मान्यता देण्यात आली आहे’, अशी माहिती संस्कृत विद्यापीठ नियोजन विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद गोखले यांनी दिली.
ते म्हणाले की, या विद्यापिठाच्या प्रमाणपत्रांवर ‘संस्कृत विद्यापिठाशी संलग्न’ असे लिहिले जाणार असून विद्यापिठाचे मानचिन्हही त्यावर रहाणार आहे. प्रारंभी राज्यातील नावाजलेल्या ८-९ शाळांपासून प्रारंभ करून हळूहळू वेदपाठशाळांची संख्या वाढवण्यात येणार आहे. संस्कृत संवर्धन, शिक्षण, तसेच प्रचार-प्रसाराला गती येण्यासाठी संलग्नता आवश्यक आहे.
विद्यापिठाचे उपसचिव रोशन अलोणे म्हणाले की, ‘संस्कृत विद्यापिठाला केंद्रीय विद्यापिठाचा दर्जा देण्यात यावा’, असा ठराव संस्कृत विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत पारीत करण्यात आला आहे. हा ठराव राज्यपाल कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे; मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही. यासाठी १५ सप्टेंबर २०२३ या दिवशी शिक्षक आमदार आणि विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सुधाकर आडबाले यांनी पुन्हा हा प्रस्ताव मांडला आहे.
काही वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या ‘प्रज्ञाभारती डॉ. श्रीधर वर्णेकर जन्मशताब्दी महोत्सव समिती’च्या वतीने आयोजित मानवंदना कार्यक्रमात बोलतांना माजी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांनीही देशभरात संस्कृत विद्यापिठांची अवस्था दयनीय असून संस्कृतचे शिक्षक मिळत नसल्याने खेद व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर संस्कृत विद्यापिठाचा पुढाकार महत्त्वाचा मानला जात आहे.
संपादकीय भूमिकाअशा माध्यमातून संस्कृतचे संवर्धन व्हावे आणि संस्कृत भाषा शिकण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा ! |