श्रीरामाचा अवमान करणार्‍या सोहेल याला कुडचडे येथील श्री रामभक्तांनी सर्वांसमक्ष क्षमा मागण्यास भाग पाडले !

प्रतिकात्मक चित्र
  • सामाजिक माध्यमातून आक्षेपार्ह विधान प्रसारित
  • धार्मिक तणाव निर्माण करण्याची गोव्यातील ३ दिवसांतील चौथी घटना

कुडचडे, २५ जानेवारी (वार्ता.) – अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी श्रीराममंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या गोव्यात ४ घटना घडल्या आहेत. प्रभु श्रीरामाविषयी सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह विधान प्रसारित केल्याच्या प्रकरणी कुडचडे येथील श्री रामभक्तांनी संशयित सोहेल याला सर्वांसमक्ष क्षमा मागण्यास भाग पाडून नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह माहिती सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्याचे समजल्यानंतर कुडचडे येथील श्रीरामभक्तांनी याविषयी पोलिसांत तक्रार नोंदवून संशयिताचा शोध घेतला. संशयित हाती सापडल्यानंतर त्याला कुडचडे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खाली उभा करून त्याला सर्वांसमक्ष हिंदूंची जाहीर क्षमा मागण्यास भाग पाडले, तसेच ‘असा प्रकार पुन्हा करणार नाही आणि इतर कुणीही असा प्रकार करत असल्यास त्यांना त्यापासून परावृत्त करणार’, असे वदवून घेतले. यापूर्वी म्हापसा शहरात २ ठिकाणी, तर पणजी तंत्रनिकेतन येथे एक घटना घडली होती. पणजी येथील घटनेत पोलिसांनी संशयिताला कह्यात घेतले आहे, तर म्हापसा प्रकरणी पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. आठवडाभरापूर्वी पर्वरी येथे श्री रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे फलक फाडण्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणाच्या माध्यमातून अन्वेषण करून संशयिताला कह्यात घेतले होते.