हिंदु समाजात श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने निर्माण झालेले चैतन्य अन् उत्साह रामराज्य स्थापनेपर्यंत टिकून राहो !
अयोध्येच्या अभूतपूर्व आणि भव्य अशा श्रीराममंदिरात श्री रामलला विराजमान होत आहेत. एका कथेनुसार श्रीरामाच्या जन्माची वेळ अशी होती की, त्या वेळेच्या आधी श्रीरामाने जन्म घेतला, तर त्याचे जीवन संकटमय अन् समस्यामय असणार आणि त्या वेळेनंतर जन्म घेतला, तर केवळ सुख, यश, कीर्ती असेच जीवनात असणार होते. त्यामुळे कौसल्यामाता श्रीरामाला ठरलेल्या वेळेनंतर जन्म घेण्यास सांगत होती. श्रीरामाने त्या वेळेच्या आधी किंवा नंतर जन्म न घेता, त्याच वेळेवर जन्म घेतला. या वेळेवर जन्म घेऊन श्रीरामाने जीवन संघर्षमय असणार, तरी आत्मबलाने त्यावर मात करून प्रचंड कीर्ती आणि यश संपादन करणार, असेच अधोरेखित केले होते. श्रीरामरायाच्या आयुष्यात सुखाचा त्याग करणारे मोठे प्रसंग आले, तरी श्रीरामाने त्यावर मात करून जगाला सुख, समाधान आणि आनंद प्रदान केला. आयुष्यातील मोठ्या संकटांमध्ये अविचल, स्थिर राहून अन् परिस्थिती स्वीकारून संकटाला तोंड दिले पाहिजे, हे श्रीरामाने त्याच्या आचरणातून शिकवले. श्रीराम हे सर्वसमावेशक, सर्वव्यापी आणि लोकांच्या मनामनांत पोचलेले तत्त्व आहे. श्रीरामाला ना अयोध्येची, ना भारत देशाची, ना अन्य कुठली सीमा आहे. श्रीरामाने सर्व मर्यादांचे पालन करून मर्यादापुरुषोत्तम म्हणून गौरव मिळवला असला, तरी श्रीरामाला कोणत्याही बंधनात बांधता येत नाही. श्रीरामात सर्व दिशा, सर्व लोक, विद्या, कला, सृष्टी, अनंत कोटी ब्रह्मांडे सामावलेली आहेत. त्यामुळे श्रीरामाचे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून पृथ्वीवर पुन्हा अवतरण होत असतांना अखिल हिंदु समाजामध्ये एक वेगळाच उत्साह, चैतन्य निर्माण झाले आहे. हिंदूंसाठी हा दिवस, म्हणजे एक अभूतपूर्व आनंदसोहळाच आहे.
श्रीराम म्हणजे हिंदु धर्म
हिंदु समाज उत्सवप्रिय, समाजप्रिय असला, तरी त्याला काही ना काही तरी निमित्त लागते. श्रीरामाचे अवतरण हे असे एक चैतन्यमय निमित्त आहे की, हिंदु समाज आनंदित, हर्षाेल्हासित झाला आहे. हिंदूंमध्ये अनेक देवता, संत, राष्ट्रपुरुष, चक्रवर्ती सम्राट आहेत. त्यातील श्रीराम हा केवळ देवता म्हणून नव्हे, तर हिंदूंचा राजा, चक्रवर्ती सम्राट, आदर्श पुत्र, बंधू, पती, शत्रू असे सर्वार्थाने आदर्श जीवन जगला आहे. परिणामी प्रत्येक हिंदूला श्रीराम स्वतःचा वाटतो. ‘जेथे श्रीराम तेथे सनातन हिंदु धर्म’, ‘जेथे श्रीराम तेथे हिंदु अस्मिता, हिंदु श्रद्धा, संस्कार आणि तेथेच हिंदुत्व आहे.’ ‘राम, राम’ म्हणूनच हिंदूंचा दिवस चालू होतो आणि आयुष्याचा शेवटही रामनामाच्या सामूहिक उच्चारानेच होतो. अशा सर्वांच्या लाडक्या रामललासाठी हिंदु समाज वेडा झाला नाही तर नवल !
पूर्ण भारतभरात रामभक्तीच्या लाटा उसळत आहेत. भारतासह अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया असे जगभरात अनेक देशांमध्ये श्रीरामाच्या स्वागतासाठी फेर्या काढणे, परिसरामध्ये ध्वज लावणे, भजने गाणे, नृत्य करणे असे कितीतरी प्रकारे रामाचे स्तवन चालू आहे. रामाला भेटण्यासाठी नेपाळ ते तमिळनाडू येथील रामभक्त कुणी चालत, कुणी सायकलवरून, कुणी स्वत:च्या वाहनाने निघाले आहेत, कुणी तर रस्त्यावर साष्टांग दंडवत घालत, स्वत:चे राममंदिरासाठी केलेले कल्पनेच्या पलीकडील नवस फेडत रामनामजप करत अयोध्येकडे मार्गस्थ झाले आहेत. श्रीरामाला प्रसन्न करण्यासाठी, आपापल्या परीने भक्तीचा रंग प्रकट करत आहेत. कुणी रामासाठी स्वत:च्या परिसरात, तर कुणी अयोध्येला जाऊन रांगोळ्या घालत आहेत. अनेकांनी स्वत:चा परिसर, परिसरातील रस्ते, झाडेही तोरणे लावून सजवली आहेत. अनेक आस्थापनांनी त्यांच्या इमारतींवर श्रीरामाचे भव्य चित्र लावले आहे. हॉटेल्स, दुकाने यांनी त्यांच्याकडील ग्राहकांच्या खरेदीतील अर्धे पैसे राममंदिरासाठी अर्पण करण्यास सांगितले आहे. खाद्यपदार्थ विक्री करणार्या हातगाडीवाल्यांनी त्यांच्याकडील पदार्थ सर्वांना विनामूल्य वाटप केले आहेत. ठिकठिकाणी रामकथांचे आयोजन होत आहे. संगीतकार आणि गीतकार रामावरील भजने, भक्तीगीत गात आहेत. कुणाला श्रीरामासाठी काय करू आणि काय नको ? असे झाले आहे. ‘जय श्रीराम’ हा जयघोष आसेतुहिमाचल ऐकू येत आहेत.
मिठाचा खडा
जनता एवढ्या उत्साहात आहे, तर शासनही मागे कसे राहील ? अनेकांनी शासनाकडे मागणी केली होती, त्याप्रमाणे शासनाने २२ जानेवारी या दिवशी सुटी घोषित केली आहे. देशभरातील १७ राज्यांनी सुटी घोषित केली आहे. तरी याविषयी काहींना पोटदुखी झाली आहे. शाळा-महाविद्यालयांना सुटी घोषित केली आहे. या सुटीचेही हिंदूंनी स्वागत केले असतांना या सुटीला काहींनी आक्षेप घेतला आहे. रिलायन्ससारख्या आस्थापनांनी हिंदूंच्या श्रद्धेचा मान राखत कर्मचार्यांना सुटी घोषित केली आहे. विरोध करणार्यांच्या विरोधात हिंदू संघटित झाले असून त्यांनी सुटीला विरोध करणार्यांचे सुप्त मनसुबे पडताळण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. काही पक्षांनी श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला येणार नाही, असे सांगितले आहे. त्याविषयी हिंदूंकडून हनुमान चालिसातील ‘भूत पिशाच निकट नही आवे, महावीर जब नाम सुनावे’, हा श्लोक उद्धृत करून विरोधकांना चांगलेच उत्तर दिले आहे, तसेच ‘जो नही राम का, वो नही देश के किसी कामका’, असे सुनावले आहे. ‘अयोध्येला अनेक वर्षे धार्मिक संवेदनशील ठिकाण बनवून अयोध्येचे महत्त्व न्यून करण्याचा काही शासनकर्त्यांनी प्रयत्न केला. हा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे’, असे काहींनी सांगितले आहे. ते खरेच आहे. आता अयोध्या भक्ती, संघटन आणि शक्ती यांचे ठिकाण बनले आहे. भारतात अनेक भाषा, संस्कृती, चालीरिती, प्रादेशिक वैशिष्ट्ये आहेत. अशा विविधांगी वैशिष्ट्ये असलेल्या हिंदूंना आणि हिंदु समाजाला एकत्र ठेवू शकेल, एकत्र बांधू शकेल, असा केवळ सनातन हिंदु धर्मच आहे. अन्यथा प्रत्येक गोष्टीत भिन्नता आहे. या हिंदु धर्मात श्रीराम अशी देवता आहे, जिने हिंदूंना एकतेच्या धाग्यात बांधले आहे. श्रीराममंदिरासाठी लाखो हिंदूंनी बलीदान दिले आहे. श्रीराममंदिरासाठी कारसेवेत महिला, मुलीही मागे नव्हत्या. आताही हा उत्सव साजरे करण्यात महिलाच आघाडीवर आहेत. एवढेच काय मुसलमान मुलींनीही त्यांच्या हातावर मेहेंदी काढली आहे. काही मुसलमानही ‘श्रीराम त्यांचेही पूर्वज होते’, असे म्हणत श्रीरामाचे गोडवे गात आहेत.
गत मासाभरापासून हिंदूंमध्ये निर्माण झालेली उत्सुकता, ५०० वर्षांची हिंदूंची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. एखादा देशव्यापी पालट हवा असेल, तर नेतृत्वासह देशवासीयही त्यासाठी अनुकूल, सकारात्मक, उत्साही असणे आवश्यक असते. ती स्थिती आता निर्माण झाली आहे. आता कुणी काही मिठाचा खडा टाकेल वा विरोध करील, तर त्याची काही खैर नाही. हिंदूंनी केवळ श्रीराममंदिरापर्यंत न थांबता रामाचे अस्तित्व कायम अनुभवता येण्यासाठी श्रीरामाचे राज्य स्वत:च्या परिसरात, जिल्ह्यात, राज्यात आणि भारतात आणण्यासाठी प्रयत्न केल्यास ते नक्कीच रामलला साध्य करून देईल, हे निश्चित !