Manipur Violence : मणीपूरमध्ये पोलीस मुख्यालयावर जमावाकडून गोळीबार : ३ पोलीस घायाळ

इंफाळ (मणीपूर) – मणीपूरच्या थौबल जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयावर १७ जानेवारीच्या रात्री जमावाने केलेल्या गोळीबारात ३ पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमावाने प्रथम मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न केला असता जमावातील काही जणांनी गोळीबार केला. यात पोलीस शिपाई गौरव कुमार, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोबराम सिंग आणि रामजी हे घायाळ झाले. या घटनेपूर्वी जमावाने खांगाबोकच्या भारतीय राखीव बटालियनवर आक्रमण केले होते, तेथून सुरक्षादलांनी बळाचा वापर करून जमावाला पांगवले होते. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने थौबलमध्ये संचारबंदी लागू केली आहे.

१६ जानेवारी सकाळी म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मणीपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह गावात सशस्त्र आक्रमणकर्त्यांनी सुरक्षादलाच्या वाहनावर आक्रमण केले होते. यामध्ये २ सैनिकांसह कुकी समाजातील एका महिलेचा मृत्यू झाला.