इस्रायलकडून सीरियातील इराणी सैन्याधिकार्यांच्या हत्येचा हा सूड ! – इराण
तेहरान (इराण) – इराणच्या विशेष सैन्याने इराकमधील इस्रायली गुप्तचर संघटना ‘मोसाद’च्या कार्यालयावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले. यामध्ये ४ जण ठार झाले. इराणची राज्य वृत्तसंस्था ‘आय.आर्.एन्.ए.’ने दिलेल्या माहितीनुसार इराणविरोधी ‘आतंकवादी’ गुप्तचर केंद्रांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इस्रायलने अद्याप या आक्रमणावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
१. इस्रायलच्या आक्रमणात मारल्या गेलेल्या त्याच्या सैन्याधिकार्यांचा सूड म्हणून हे आक्रमण केल्याचे इराणचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांत इस्रायलने सीरिया आणि लेबनॉन येथे हवाई आक्रमणे केली होती. २५ डिसेंबर २०२३ या दिवशी इराणचे ब्रिगेडियर जनरल राजी मुसावी आणि हमासचे उपनेते सालेह अल् अरोरी मारले गेले होते.
२. दुसरीकडे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार इराणचे आक्रमण इराकच्या कुर्दिस्तानची राजधानी एरबिलपासून अनुमाने ४० किमी उत्तर-पूर्वेला असलेल्या अमेरिकी दूतावासाजवळ झाला.
३. इराणच्या आक्रमणावर अमेरिकेने टीका करत म्हटले की, इराणचे हे घाईचे पाऊल आहे. हे आक्रमण इराकच्या स्थिरतेला मोठा धक्का आहे.
४. गाझामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू झाल्यानंतर इराण अन् अमेरिका यांच्यात अप्रत्यक्ष युद्ध चालू झाले. दोन्ही देश इराक आणि सीरिया येथे एकमेकांच्या लक्ष्यांवर आक्रमणे करत आहेत. यामुळे गेल्या आठवड्यात इराकचे पंतप्रधान महंमद शिया अल्-सुदानी यांनी अमेरिकेकडे त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्य त्यांच्या देशातून मागे घेण्याची मागणी केली होती.