काणकोण येथे २९ वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन
काणकोण, १५ जानेवारी (वार्ता.) : २९ वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन काणकोण येथील प्रा. स.शं. देसाई नगरीत तथा आदर्श ग्राम, आमोणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले. प्रारंभी १३ जानेवारी या दिवशी आमोणे संस्कृती भवनाजवळ स्थानदेवतेला वंदन करून दिंडीयात्रेला प्रारंभ झाला. टाळ-मृदंगांच्या गजरात संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सभापती रमेश तवडकर, साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश वंसकर, कार्याध्यक्ष श्री. सुनील पैंगीणकर आणि मोठ्या संख्येने मराठीप्रेमी यात सहभागी झाले होते. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्रातील साहित्यिक सोनाली नवांगुळ, सभापती तवडकर, गोव्यातील साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमरपंत, श्री. सुनील पैंगीणकर, श्री. राजमोहन शेट्ये, श्री. किसन फडते, श्री. विठ्ठल गावस, नगराध्यक्ष श्री. रमाकांत नाईक गावकर काणकोण तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींचे सरपंच आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप आणि दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक सागर जावडेकर यांची विशेष उपस्थिती होती.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत त्यांच्या भाषणात म्हणाले, ‘‘पोर्तुगीज काळात चौफेर आघात सहन करूनही मराठी वाङ्मयीन परंपरा गोव्याने सुरक्षित ठेवली. येथील मराठी साहित्य, लोकवेद, संगीत आणि नाट्यकला हे आत्मस्वर मालवू न देता अनेक आव्हानांवर मात करून सतत तेवत ठेवले.
येथील तत्कालीन शिक्षक, राष्ट्रप्रेमी साहित्यिक यांनी गोव्याबाहेर होणार्या मराठी साहित्य संमेलनातून देशभक्त निर्माण केले. शब्दांच्या शक्तीमुळे राष्ट्रजीवन घडते, याची प्रचीती आली. याच प्रयत्नवादातून आणि सभापती रमेश तवडकर यांच्या सहकार्याने यंदा प्रथमच काणकोण महालात संमेलन झाले आहे. आनंदमय आणि चैतन्यमय वातावरणात मनामनांचे संमेलन येथे पहायला मिळाले.’’
स्वागताध्यक्ष रमेश तवडकर म्हणाले, ‘‘एकेकाळी येथील बहुतेक शाळा मराठी माध्यमाच्या होत्या. काणकोण तालुक्याला मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारसा असून या संमेलनाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक प्रदर्शनाची संधी येथील सर्व कार्यकर्त्यांना मिळाली.’’
महाराष्ट्रातील विकलांग साहित्यिका सोनाली नवांगुळ म्हणाल्या, ‘‘मी अपघातानंतर दोन्ही पाय निकामी होऊनही स्वतःचे मनोबल ढळू न देता पुढील वाटचाल चालू ठेवली. इच्छा असेल, तर मार्ग मिळतो. विद्यार्थ्यांनी त्यांचा आत्मविश्वास आणि सतत पुढे जाऊन कर्तृत्ववान नागरिक होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील रहाणे आवश्यक आहे.’’
साहित्य संमेलनाचे कार्यवाहक सर्वश्री किसन फडते, गुरुदास नाटेकर, प्रकाश तळवडेकर, शांताजी ना. गावकर, प्रा. अकल्पिता राऊत देसाई, डॉ. पांडुरंग फळदेसाई, गायक कलाकार प्रवीण गावकर आदींचा या वेळी गौरव करण्यात आला.
आमोणे, पैंगीण येथील २ दिवसांच्या या संमेलनात गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत आणि जैवविविधता व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम, बलराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अंकुश गावकर, ज्येष्ठ साहित्यिक गिरीश प्रभुणे आदी मान्यवरही सहभागी झाले.
समारोपाच्या वेळी सभापती श्री. रमेश तवडकर, श्री. अंकुश गावकर, डॉ. प्रदीप सरमोकादम आदींनी महत्त्वपूर्ण विचार मांडले.
‘प्रत्येक शाळेत वाचनासाठी १ घंटा राखीव ठेवणे आवश्यक आहे’, असे संमेलनाच्या परिसंवादात सहभागी सर्व मान्यवरांनी सूचित केले. संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. सुनील पैंगणकर यांनी शेवटी ऋणनिर्देश केले.