कोल्हापूर – आपणा सर्वांना प्रत्येक अपघाताची कारणे शोधावी लागतील. त्यांचे परीक्षण केल्यानंतरच त्यावर उपाययोजना करून अपघातांचे प्रमाण अल्प करता येईल. बस चालवतांना वैमानिकासारखेच चालकाचे दायित्व असते. शरीर आणि मन यांचे स्वास्थ चांगले ठेवून आपण कर्तव्य बजावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ११ ते २५ जानेवारी या कालावधीत राबवण्यात येणार्या सुरक्षितता मोहिमेचा मध्यवर्ती बसस्थानक येथे प्रारंभ करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी २५ वर्षे सुरक्षित सेवा बजावणार्या ७० हून अधिक चालकांना २५ सहस्र रुपये देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के म्हणाल्या, ‘‘नैसर्गिक मृत्यूच्या खालोखाल जगात सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातामुळे होणार्या दुर्घटनांत होतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचे सूत्र लक्षात घेऊनच ही मोहीम राज्य स्तरावर राबवण्यात येत आहे. बस चांगल्या स्थितीत ठेवणे आणि तिची निगा राखणे अपघात अल्प करण्यासाठी आवश्यक आहे.’’ आगार व्यवस्थापक अनिल म्हेतर यांनी आभार मानले.