नाशिक येथे रामकुंडावर गोदावरीची महाआरती करून पंतप्रधान घेणार काळाराम मंदिराचे दर्शन !

राष्ट्रीय युवा संमेलनास प्रारंभ होणार !

नाशिक येथील काळाराम मंदिर

नाशिक – राष्ट्रीय युवा संमेलनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी या दिवशी शहरात रस्त्यावरील देखावा (रोड शो) करणार आहेत. त्यानंतर ते दक्षिण गंगेची ख्याती असलेल्या गोदावरी नदीची महाआरती करून काळाराम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी नतमस्तक होतील. यानंतर राष्ट्रीय युवा संमेलनाचे उद्घाटन मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनीही या दौर्‍याची पुष्टी केली.

मोदी यांचे नाशिक विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथून ते संभाजीनगर रस्त्यावर नीलगिरी बाग येथील मैदानावर हेलिकॉप्टरने उतरणार आहेत. त्यानंतर उपाहारगृह मिर्ची ते संत जनार्दन स्वामी आश्रमापर्यंत त्यांचा ‘रोड शो’ असेल. संभाजीनगरनाका येथून ते जुना आडगावनाका, पंचवटी कारंजा, मालेगाव बसस्थानकमार्गे रामकुंड येथे जातील. तेथे महाआरती करून ते काळाराम मंदिरात जाऊन रामरक्षा पठण करतील. त्यानंतर ते तपोवन येथील सभास्थळी जातील. काळाराम मंदिर दर्शनाच्या वेळी सुरक्षेसाठी काही काळ भाविकांना दर्शनासाठी बंदी असेल.

आयुष्यमान कार्ड मंदिरांत मिळणार, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ !

‘देशातील प्रत्येक धार्मिक स्थळावर प्रसाद म्हणून ‘आयुष्यमान हेल्थ कार्ड’ दिले जाणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौर्‍यानिमित्त या कार्डचा नवा पॅटर्न देशभरात पोचेल. त्याचा प्रारंभ पंचवटी येथील काळाराम मंदिरापासून होणार आहे’, अशी माहिती ‘आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती’चे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली.