Indian Passport : भारताचे पारपत्र जगामध्ये ८० व्या स्थानी !

पाकिस्तान १०१, तर चीन ६२ व्या क्रमांकावर !

नवी देहली – ‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’ने जगभरातील देशांच्या पारपत्रांचे मानांकन प्रकाशित केले आहे. या सूचीमध्ये जपान, सिंगापूर, स्पेन, फ्रान्स, इटली आणि जर्मनी या देशांनी अनुक्रमे पहिल्या ६ देशांमध्ये स्थान मिळवले आहे. भारत यात ८० व्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान १०१ क्रमांकावर आहे. चीन ६२ व्या क्रमांकावर आहे. भारत वर्ष २०२३ मध्येही ८० व्याच क्रमांकावर होता; मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारतियांना आणखी ५ देशांमध्ये व्हिसा (एखाद्या देशामध्ये प्रवेश करण्याची आणि तेथे रहाण्याची अनुमती देणारे कागदपत्र) न घेता प्रवास करता येणार आहे. वर्ष २०२३ मध्ये, भारतीय ५७ देशांमध्ये व्हिसाखेरीज प्रवास करू शकत होते, तर यावर्षी हा आकडा ६२ वर पोचला आहे. पाकिस्तानी केवळ ३४ देशांमध्ये व्हिसा न घेता प्रवास करू शकतात.

जवळपास २ वर्षांपासून युद्ध चालू असतांनाही युक्रेनचा पारपत्र रशियापेक्षा शक्तीशाली असल्याचे यात सांगण्यात आले आहे. युक्रेनचा पासपोर्ट ३२ व्या क्रमांकावर आहे. येथील नागरिक १४८ देशांमध्ये व्हिसाखेरीज प्रवास करू शकतात, तर रशियाचे पारपत्र ५१ क्रमांकावर आहे. रशियाचे नागरिक व्हिसाखेरीज ११९ देशांना भेट देऊ शकतात. इस्रायलचा पारपत्र २१ क्रमांकावर आहे.


मानांकन कसे ठरवले जाते ?

‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’कडून अशा प्रकारचे मानांकन वर्षातून दोनदा घोषित केले जाते. जानेवारीमध्ये पहिल्यांदा आणि जुलैमध्ये दुसर्‍यांदा याची घोषणा केली जाते. एखाद्या देशाचा पारपत्रधारक व्हिसा न घेता किती देशांमध्ये प्रवास करू शकतो, या आधारावर मानांकन ठरवले जाते.