आज लालबहादूर शास्त्री यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी लालबहादूर शास्त्री यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेत जायचे. कडक उन्हाळ्यातही तापलेल्या रस्त्यावरून शाळेत जायचे. वयात आल्यावर लालबहादूर शास्त्री यांना परकियांच्या गुलामगिरीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढ्यात रुची निर्माण झाली. भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणार्या भारतीय राजांच्या मोहनदास गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्या वेळी लालबहादूर शास्त्री हे केवळ ११ वर्षांचे होते आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याविषयी प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली.
गांधीजींनी देशवासियांना ‘असहकार चळवळी’त सहभागी होण्याचे आवाहन केले. त्या वेळी लालबहादूर शास्त्री अवघे १६ वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यांनी शिक्षण सोडून देण्याचा विचार केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा-आकांक्षांना हादरा बसला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; मात्र लालबहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. त्यांच्या निकटच्या व्यक्तींना ठाऊक होते की, त्यांनी एकदा निर्णय घेतला की, तो ते कधीही पालटणार नाहीत; कारण बाहेरून मृदु वाटणारे शास्त्री आतून एखाद्या खडकासारखे कणखर होते.
(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, गोवा, ११.१.२०२३)