आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो कंपनी’वर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून धाडी !

मनी लाँड्रिंग प्रकरणी ६ ठिकाणी अन्वेषण चालू !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार

बारामती (जिल्हा पुणे) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो कंपनी’वर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने धाड घातली आहे. ५ जानेवारीला सकाळी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे पथक येथे पोचले असून या आस्थापनाच्या कार्यालयात अन्य लोकांना प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. ५ जानेवारीला पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून धाडी घालण्यात आल्या. ईडीच्या पथकाने एकूण ६ ठिकाणी धाडी चालू केल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे.

यापूर्वी बारामती अ‍ॅग्रो आस्थापनाला महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस दिली होती. ७२ घंट्यांत प्लँट बंद करण्याची सूचना नोटिसीमध्ये दिली होती. त्या वेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत सप्टेंबर २०२३ मध्ये ही माहिती दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयातून त्यांनी स्थगिती मिळवली होती. रोहित पवार हे बारामती अ‍ॅग्रो आस्थापनाचे सीईओ आहेत. आता अंमलबजावणी संचालयालयाने ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणाच्या अन्वेषणाला आरंभ केला आहे. यामुळे ‘बारामती अ‍ॅग्रो कंपनी’च्या संबंधित लोकांच्या घरी धाडी टाकल्या जात आहेत. रोहित पवार यांना गेल्या वर्षी ‘बारामती ॲग्रो कंपनी’तील अपव्यवहार प्रकरणी नोटीस मिळाली होती. या प्रकरणी रोहित पवार यांनी २ मोठ्या नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यांच्या सांगण्यावरून माझ्या आस्थापनात धाड घातल्याचे ते बोलले होते.

६ ठिकाणी धाड

मुंबई आणि मुंबईच्या जवळच्या काही ठिकाणी ‘ईडी’कडून धाडी घालण्यात आल्या. ज्यात मुंबईसह इतर ६ ठिकाणी धाडी घालण्यात आल्या आहेत. ईडीच्या एका पथकाकडून रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कार्यालयावर धाड घातली आहे. आधी प्रदूषण महामंडळ आणि साखर आयुक्तांनी बारामती ॲग्रोवर कारवाई केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. तिथे त्यांना दिलासा मिळाला होता; पण आता पुन्हा एकदा त्यांच्या बारामती ॲग्रोवर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून धाड घालण्यात आली आहे.