‘निर्भया पथका’च्या अडचणी ?

सातारा जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची ७ ‘निर्भया पथके’ आहेत. या ७ ‘निर्भया पथकां’ना कारवाई करण्यासाठी आणि गस्त घालण्यासाठी एकूण २ दुचाकी आणि १ चारचाकी वाहन देण्यात आले आहे; मात्र गत २ मासांपासून ‘निर्भया पथका’चे चारचाकी वाहन दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या वाहनावरील चालक रजेवर गेल्यामुळे पर्यायी वाहन तर सोडाच, पर्यायी चालकही देण्यात आलेला नाही. वाहनाला तांत्रिक अडचण असल्याचे मोटर वाहन विभागाच्या वतीने सांगण्यात येत असले, तरी ‘निर्भया पथका’तील पोलिसांना २ दुचाकींवर गस्त घालणे भाग पडत आहे. ‘निर्भया पथका’कडे तक्रार अर्ज येत आहेत. या अर्जाचा पाठपुरावा करून कारवाई करण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. ‘निर्भया पथका’ला सातारा शहर, शाहूपुरी, तालुका आणि बोरगाव पोलीस ठाण्यांच्या सीमेत गस्त घालावी लागणे, तसेच रात्री कास, यवतेश्वर येथेही गस्त घालावी लागते. पथकामध्ये महिला पोलीसही आहेत. या परिसरात मद्यपी, गावगुंड फिरत असतात. जंगली प्राणी रात्रीच्या वेळी बाहेर येत असल्याने ते आक्रमणही करू शकतात. अचानक कोणताही प्रसंग उद्भवल्यास पोलिसांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.

या अडचणींविषयी मोटर वाहन विभागाला विचारले असता त्यांनी लवकरच ‘निर्भया पथका’ला आवश्यक वाहने उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. ‘वस्तूत: ‘निर्भया पथका’साठी असणारे वाहन मोटर परिवहन विभागाकडून बंदोबस्तासाठी पाठवण्यात येत आहे’, असे ‘निर्भया पथका’तील पोलीस कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे, तसेच ‘निर्भया पथका’ला वाहन न देता चालक नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे; मात्र इतर बंदोबस्तासाठी चालक देऊन हे राखीव वाहन उपयोगात आणले जात असल्याचेही ‘निर्भया पथका’तील पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तरुणी आणि महिला यांच्यावरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच महाविद्यालयीन युवतींना फसवून त्याचे शारीरिक शोषण केल्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘निर्भया पथका’च्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पथकासाठी आवश्यक वाहने, चालक आणि कर्मचारी वर्ग देणे आवश्यक आहे. अन्यथा ‘निर्भया पथक’च कुणाच्या तरी ‘भया’मुळे अकार्यक्षम झाले आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा