१० दिवसांच्या ‘एम्.बी.ए.’च्या ‘क्रॅश कोर्स’पासून सावध रहा !

‘भारतीय तंत्रशिक्षण संस्थे’ची विद्यार्थ्यांना चेतावणी !

पुणे – काही प्रेरणादायी वक्ते १० दिवसांचा ‘एम्.बी.ए.’चा (व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी) ‘क्रॅश कोर्स’ (अल्प वेळेत मूलभूत तथ्ये शिकवणारा कोर्स) उपलब्ध करून देत असल्याचे निदर्शनास येत आहे; मात्र अशा ‘क्रॅश कोर्स’च्या माध्यमातून तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याविषयी भारतीय तंत्रशिक्षण संस्थेने (‘ए.आय.सी.टी.ई.’ने) विद्यार्थ्यांना सतर्क रहाण्याची चेतावणी दिली आहे. या संदर्भातील संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी संकेतस्थळावर जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संस्थेला किंवा विद्यापिठाला एम्.बी.ए.सह कोणताही तंत्रशिक्षणाचा अभ्यासक्रम ए.आय.सी.टी.ई.च्या मान्यतेविना राबवता येत नाही. हा २ वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहे. व्यवसाय आणि व्यवस्थापनातील प्रगत माहिती अन् कौशल्य देण्याची रचना या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका :

  • विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत असल्याने शिक्षणक्षेत्र वारंवार कलंकित होणे लज्जास्पद !
  • अशा प्रकारे दिशाभूल करणार्‍यांना कठोर शिक्षा करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केल्यास पुन्हा असे धाडस कुणी करणार नाही !