Attack On Indian Navy : नौकांवर आक्रमण करणार्‍यांना पाताळातूनही शोधून काढू ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

‘आय.एन्.एस्. इंफाळ’ युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात भरती !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

मुंबई : देवांकडे विविध शक्ति असूनही जेव्हा दानवांचा पराभव होत नव्हता, तेव्हा सर्व शक्ति एकत्र आल्या आणि त्यातून ‘महाशक्ती जगदंबा’ उत्पन्न झाली. तिने दानवांचा पराभव झाला. अशाच प्रकारे संरक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व विभागांनी पूर्ण शक्ती लावून एकत्र येणे आवश्यक आहे. यामुळेच भारत महाशक्ती बनण्यास साहाय्य होईल. ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ हे त्याचेच एक प्रतीक आहे. ‘आय.एन्.एस्. इंफाळ’मुळे इंडो-पॅसिफिक भागात भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढण्यास साहाय्य होईल. भारताच्या वाढत्या नौदलाच्या सामर्थ्यामुळे काहींचा जळफळाट होत आहे.

नौकांवर होणार्‍या आक्रमणांच्या मागे जे कुणी असतील ?, जरी ते समुद्राच्या तळाशी किंवा पाताळात लपले, तरी त्यांना आम्ही शोधून काढू, असे परखड प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. विशाखापट्टनम् वर्गातील तिसरी युद्धनौका ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ २६ डिसेंबर या दिवशी नौदलाच्या ताफ्यात भरती झाली.

मुंबईतील नौदलाच्या तळावर झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी इंफाळ युद्धनौकेवर प्रथमच नौदलाचा ध्वज सन्मानपूर्वक फडकवण्यात आला.