Goa CM : गोव्यातील कुळ आणि मुंडकार प्रकरणे जलद गतीने मार्गी लावणार !

गोवा मुक्तीदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा !

(भूमीमालकाची भूमी कसणार्‍याला ‘कुळ’ म्हणतात, तर भूमीमालकाच्या शेती-बागायतीची देखभाल करणार्‍याला ‘मुंडकार’ म्हणतात.)

पणजी, १९ डिसेंबर (वार्ता.) : गोवा स्वतंत्र होऊन आता ६२ वर्षांचा कालावधी उलटूनही कुळ आणि मुंडकार प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. राज्यात ३ सहस्र ५०० मुंडकार (उत्तर गोव्यात
२ सहस्र, तर दक्षिण गोव्यात १ सहस्र ५०० प्रकरणे) प्रकरणे प्रलंबित आहेत. यापुढे ही प्रकरणे जलद गतीने मार्गी लावण्याचे आदेश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार यांना देण्यात आले आहेत. राज्यातील मामलेदार आणि मामलेदार कार्यालयातील कर्मचारी पुढील ३ महिने आठवड्याचा शनिवार हा दिवसही प्रलंबित मुंडकार प्रकरणे मार्गी लावण्यासाठी देणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ६३ व्या गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात बोलतांना केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रारंभी शाळेचे विद्यार्थी आणि पोलीस दल यांची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर ध्वजारोहण केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील विविध अधिकार्‍यांचा सन्मान करण्यात आला.

सावंत पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात ‘अटल सेतू’, ‘योग सेतू’, ‘लेखा भवन’, ‘गोवा शालांत मंडळा’ची इमारत आणि क्रीडा क्षेत्र यांसाठी उभारलेली पायाभूत सुविधा आदी जागतिक दर्जाच्या साधनसुविधा उपलब्ध आहेत.

पर्वरी येथील उड्डाणपुलाची २२ डिसेंबरला पायाभरणी

पर्वरी येथे ६४१ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा उड्डाणपूल आणि नवीन झुआरी पुलावरील फिरते उपाहारगृह यांची पायाभरणी, तसेच नवीन झुआरी पुलाच्या दुसर्‍या मार्गाचे (‘लेन’चे) उद्घाटन २२ डिसेंबर या दिवशी केले जाणार आहे.

वर्ष २०५० पूर्वी गोवा ‘कार्बन’मुक्तीचे लक्ष्य गाठणार आहे. तरुणांना येत्या काळात रोजगाराच्या नवीन ४० सहस्र संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गोव्यात शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी गोवा सरकार कार्यरत आहे. गोव्याच्या ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये) भरीव वाढ झालेली आहे.’’

स्वातंत्र्यसैनिकांच्या उर्वरित मुलांना २६ जानेवारी २०२४ पर्यंत नोकरी !

स्वातंत्र्यसैनिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, शासनाने नुकतीच अनुकंपा (कॉम्पेन्सेटरी) नोकरी योजनेच्या अंतर्गत ७१ लाभार्थ्यांना नोकरीसाठी पत्रे दिली आहेत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकरी देण्याच्या योजनेच्या अंतर्गत २८ मुलांना नोकरीचे पत्र दिले आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या उर्वरित मुलांना २६ जानेवारी २०२४ पर्यंत नोकरी दिली जाईल.

राज्यभरात ठिकठिकाणी गोवा मुक्तीदिन उत्साहात साजरा

राज्यभरात गोवा मुक्तीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. डिचोली येथील गोवा मुक्तीदिन कार्यक्रमात आमदार प्रेमेंद्र शेट आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची उपस्थिती होती. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी ध्वजारोहण केले. सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयात आमदार डॉ. देविया राणे, मडगाव येथे विधी आणि न्यायव्यवस्था मंत्री आलेक्स सिक्वेरा, फोंडा येथे कृषीमंत्री रवि नाईक, म्हापसा येथे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वास्को येथे परिवहनमंत्री माविन गुदिन्हो, पेडणे येथे मत्स्यव्यवसायमंत्री नीळकंठ हळर्णकर, सांगे येथे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, केपे येथे जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर, काणकोण येथे गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर आणि धारबांदोडा येथे आमदार गणेश गावकर यांनी ध्वजारोहण केले.

गोवा मुक्तीदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोमंतकियांना दिल्या शुभेच्छा !

गोवा मुक्तीदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्वीट करून गोमंतकियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुभसंदेशात म्हणतात, ‘‘गोवा पोर्तुगिजांपासून मुक्त होण्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या सर्व हुतात्म्यांना देशाची श्रद्धांजली आहे.

गोवा मुक्तीलढ्यात शौर्य आणि बलीदान यांचे प्रतीक बनलेले स्वातंत्र्यसैनिक अन् भारतीय सेना यांना विनम्र अभिवादन करते. गोवा मुक्तीदिनी सुंदर अशा गोव्यातील नागरिकांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देते.’’