जळगाव येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा अनिल हेम्बाडे यांचा साधनाप्रवास !

सौ. शोभा हेम्बाडे

१. साधनेत येण्यापूर्वी

‘मी साधनेत येण्यापूर्वी उपवास करणे, देवपूजा करणे, मंदिरात जाणे अशा प्रकारे साधना करत होते.

२. सनातनशी संपर्क

२ अ. सत्संगात सांगितल्याप्रमाणे नामजप आणि प्रार्थना करणे : मला जळगाव येथील सनातनच्या सत्संगातून ‘कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त।’ यांच्या नामजपाचे महत्त्व कळले. त्याप्रमाणे मी नामजप करायला आरंभ केला; पण आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे मला बसून नामजप करणे जमत नव्हते. त्यामुळे मी घरातील कामे करत असतांना नामजप करत असे. नंतर मला प्रार्थनेचे महत्त्व कळले. तसे माझ्याकडून प्रार्थना होऊ लागल्या आणि मला त्यातून आनंद मिळू लागला.

२ आ. मतीमंद मुलीला सांभाळून नामजप करणे आणि सत्संग ऐकणे : आमच्या घरी साधकांच्या सेवेचे नियोजन आणि सत्संग होत असत. माझी मुलगी (कु. प्रज्ञा हेम्बाडे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३१ वर्षे) मतीमंद असल्यामुळे मला कधीही प्रत्यक्ष सत्संगांना पूर्ण वेळ बसता आले नाही. मी तिला घेऊन दुसर्‍या खोलीत बसायचे आणि तिला खेळवत मी नामजप करायचे अन् सत्संग ऐकायचे.

३. नातेवाईक आणि समाजातील लोकांनी मतीमंद मुलीविषयी काळजी व्यक्त करणे; परंतु ‘हे प्रारब्ध आहे’, असे समजून स्वीकारणे अन् साधना चालू केल्यावर मुलीमध्ये चांगले पालट होणे

मी साधनेला आरंभ करण्यापूर्वी माझ्या मतीमंद मुलीला आकडीचे झटके येत असत. प्रत्येक १ – २ मासांनी तिला रुग्णालयात भरती करावे लागत असे. मला मुलीला होत असलेला त्रास पाहून पुष्कळ रडू यायचे आणि वाईट वाटायचे. नातेवाईक आणि समाजातील लोक म्हणायचे, ‘‘या मुलीचे कसे होईल ?’’ त्या वेळी मला फार वाईट वाटायचे. मी साधना चालू केल्यावर मुलीमध्ये पालट होऊ लागले. तिला आकडी येण्याचे प्रमाण न्यून झाले. त्यामुळे माझी देवाप्रती श्रद्धा वाढू लागली. साधनेमुळे ‘हे माझे प्रारब्ध आहे’, हे मला कळू लागले. पूर्वी घरातील सदस्य काही बोलले, तरी मला त्याचे फार वाईट वाटायचे. मी साधना चालू केल्यावर मला त्या प्रसंगांवर मात करता येऊ लागली.

४. अनुभूती

४ अ. पुष्कळ साधक अल्पाहार, चहा आणि जेवण घेण्यासाठी घरी येत असूनही नेहमीच्या किराणा मालातच सर्व भागणे : आमच्या घरी पुष्कळ साधक अल्पाहार, चहा आणि जेवण घेण्यासाठी यायचे; पण देवाच्या कृपेने कधी काही अडचण आली नाही. घरातील नेहमीच्या एका मासाच्या किराणा साहित्यात सर्वकाही भागायचे. ‘प्रत्येक प्रसंगात देवच करून घेतो’, हा माझ्यातील भाव वाढू लागला.

४ आ. मतीमंद मुलीला घेऊन सत्संगाला जाणे आणि मुलीला आकडीचा होणारा त्रास पूर्णपणे थांबणे : मी माझ्या मतीमंद मुलीला कडेवर घेऊन सत्संगाला जात असे. तेव्हाही मला कधी थकवा आला नाही. मला सत्संगातून परतल्यावर पुष्कळ उत्साह वाटायचा. मुलीतही पालट झालेला जाणवायचा. तिला आकडीचे झटके येण्याचे प्रमाण अल्प होत गेले आणि आता पूर्णपणे बंद झाले आहे. तसेच तिला आता कुठलेही औषध चालू नाही.

५. नातेवाइकांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे देता येणे

५ अ. मतीमंद मुलीसह जळगाव सेवाकेंद्रात जाऊन सेवा करणे आणि शेजारच्या लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांकडे लक्ष न देता सेवेतील आनंद घेणे : माझे यजमान साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अहवालाची सेवा करायचे. त्या वेळी मला घरातील कामे करून त्यांना साहाय्य करण्यास आनंद वाटायचा. जळगाव येथे आमच्या घरापासून जवळच सनातनचे सेवाकेंद्र होते. तेव्हा मी माझ्या मतीमंद मुलीला घेऊन प्रतिदिन सेवाकेंद्रात जात होते. मी तेथे मिळेल, ती सेवा करायचे आणि मुलीलाही तेथे नामजप अन् प्रार्थना करायला चांगले वाटायचे. मला आमच्या शेजारच्या काही महिला म्हणायच्या, ‘‘घरचे सर्व आवरून मुलीला घेऊन सेवाकेंद्रात जातेस. तुला कंटाळा येत नाही का ?’’ त्या वेळी मी त्यांना सांगायचे, ‘‘मला आणि मुलीला सेवाकेंद्रात गेल्यावर आनंद वाटतो. तेथे गेल्यावर मला सेवा करता येते. माझ्याकडून नामजप आणि प्रार्थना केल्या जातात. माझी मुलगी मतीमंद आहे. तिला इतरत्र कुठेही जाण्यास आवडत नाही; पण ती आश्रमात पूर्ण दिवस शांत रहाते आणि मला सेवाही करू देते.’’

५ आ. दोन्ही मुली आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी गेल्यावर नातेवाइकांनी नावे ठेवणे आणि त्यांना मुलींना साधनेतून मिळणार्‍या आनंदाविषयी सांगता येणे : आमच्या घरात साधनेला पोषक असे वातावरण असल्यामुळे गुरुमाऊलीच्या कृपेने माझ्या दोन्ही मुलींवर (सौ. अक्षरा शिंदे आणि कु. पल्लवी हेम्बाडे) साधनेचे संस्कार झाले. आता त्या दोघीही पूर्णवेळ साधना करत आहेत. मुलगाही (श्री. देवेंद्र हेम्बाडे) प्रासंगिक सेवा करतो. मुलींना साधनेसाठी आश्रमात पूर्णवेळ पाठवल्यावर नातेवाईक मला म्हणायचे, ‘‘त्यांचे लग्न करा. तुम्हाला त्यांना सांभाळणे होत नसेल, तर आमच्याकडे पाठवा.’’ त्या वेळी मी त्यांना शांतपणे साधनेचे महत्त्व सांगायचे. तसेच मी त्यांना म्हणायचे, ‘‘आम्हाला मुलींना घरी सांभाळायला होत नाही; म्हणून आम्ही त्यांना आश्रमात पाठवले नाही, तर त्यांना साधना समजली आणि साधनेतून मिळणारा आनंदही त्या घेत आहेत; म्हणून त्या आश्रमात गेल्या आहेत. लग्न प्रारब्धानुसार होणार आहे.’’ तसा माझा स्वभाव फार घाबरट होता; पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला लोकांना योग्य उत्तरे देणे जमू लागले.

६. मुलीचे लग्न वैदिक पद्धतीने झाल्याचे पाहून काही नातेवाइकांनी साधना चालू करणे

वर्ष २०१७ मध्ये माझी मुलगी सौ. अक्षरा शिंदे हिचे वैदिक पद्धतीने लग्न झाले. ते पाहून सर्व नातेवाईक आणि समाजातील लोक म्हणाले, ‘‘तुमची साधना फार चांगली आहे.’’ त्यानंतर काही नातेवाईक साधना करू लागले. ही सर्व परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आहे.

७. स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, तसेच आध्यात्मिक मैत्रिणीशी बोलणे

‘स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत’, हे मला सत्संगातून कळले. त्यानंतर मी तसे प्रयत्न करू लागले. तेव्हा मी घरातील प्रसंग शांत राहून स्वीकारण्याचा प्रयत्न करू लागले. काही प्रसंगांत मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी सूक्ष्मातून बोलायचे. काही प्रसंगांत मी त्यांना ‘मला योग्य काय ते लक्षात येऊ दे’, अशी प्रार्थना करून प्रयत्न करायचे. त्याविषयी मी उत्तरदायी साधकांशीही बोलायचे. मला सत्संगातून कळले होते की, आपल्याला आध्यात्मिक मैत्रीण असायला हवी. तेव्हा मी एका साधिकेशी बोलायचे. त्यामुळे माझे मन हलके होऊन मला नामजप आणि प्रार्थना करण्यास उत्साह वाटायचा.

८. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या कृपेने घरातील कठीण प्रसंगांवर करता येणे

मधल्या काळामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या कृपेने मला घरातील काही कठीण प्रसंगांवर मात करता आली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेले साधनेचे आणि भावजागृतीचे प्रयत्न देवाने माझ्याकडून करून घेतले आणि मला त्या प्रसंगांतून बाहेर काढले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझी आणि माझ्या मतीमंद मुलीचीही आध्यात्मिक प्रगती करून घेतली. ही केवळ परम दयाळू गुरुमाऊलीची कृपा आहे. देवा, मला काहीच लिहिता येत नाही; पण देवाची आज्ञा म्हणून प्रयत्न केला. देवा, यात काही चूक झाली असल्यास मला क्षमा करा. प.पू. गुरुदेव, आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. शोभा अनिल हेम्बाडे, (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५२ वर्षे) जळगाव. (६.४.२०२२)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक