संस्कृत भाषेचे सौंदर्य : साधनेचे महत्त्व

त्यजेत्कुलार्थे पुरुषं ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत्।
ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत्॥ – महाभारत उद्योगपर्व ३७.१६

अर्थ : विदुर धृतराष्ट्राला सांगतो, एका पुरुषामुळे कुळाचा (कुटुंबाचे) नाश होत असेल, तर त्याचा त्याग करून कुळाचे रक्षण करावे. एका कुटुंबाच्या योगे ग्राम नाश पावत असेल, तर ते कुटुंब ग्रामातून काढून टाकावे आणि ग्राम रक्षावे. एका ग्रामामुळे जर देश संकटात येत असेल (उदा. गावात सर्वत्र भयंकर रोगराई पसरली असेल, गावातील सर्व लोकांनी सामूहिक अपराध केला असेल, देशावर शत्रूंचे मोठे आक्रमण होऊन सर्व देशाचा बळी जात असता केवळ एक गाव सोडून जर ते संकट टळत असेल), तर ते गाव सोडून द्यावे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी पृथ्वी सोडण्याचा जरी प्रसंग आला, तर मायेत न अडकता तिचाही त्याग करावा.


धर्माचे महत्त्व

धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा।
लोके धर्मिष्ठं प्रजा उपसर्पन्ति।
धर्मेण पापमपनुदति।
धर्मे सर्वं प्रतिष्ठितम्।
तस्मात् धर्मं परमं वदन्ति॥ – महानारायणोपनिषद, अनुवाक् ७९, वाक्य ७

अर्थ : धर्म सर्व प्राण्यांचा आश्रय आहे. लौकिकात सर्व जन धर्माचरण करणार्‍या पुरुषापाशी धर्माधर्मनिर्णयार्थ जातात. प्रायश्चित्तरूप धर्माच्या योगाने लोक पापाचा विनाश करतात. धर्मामध्ये सर्व प्रतिष्ठित आहे; म्हणून ‘धर्म परम साधन आहे’, असे म्हणतात.

नास्ति धर्मसमो बन्धुर्नास्ति धर्मसमा क्रिया।
नास्ति धर्मसमो देवः सत्यं सत्यं वदाम्यहम्॥

अर्थ : धर्मासारखा बंधू नाही. धर्मासारखी क्रिया नाही, धर्मासारखा देव नाही, हे सत्य मी पुनःपुन्हा सांगतो.