पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले समितीच्या कार्याचे कौतुक !
परभणी – बागेश्वर धाम येथील पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी त्यांचे मंगल आशीर्वाद घेतले. हिंदु जनजागृती समितीचे कार्य पाहून आशीर्वाद देतांना पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी ‘समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे. तुम्ही पुष्कळ चांगले करत आहात’, असे कौतुक केले.
परभणी येथे ११ डिसेंबरपासून भव्य हनुमान कथा प्रारंभ झाली आहे. प्रत्यक्ष पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या दिव्य वाणीतून होत असलेल्या या कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या कथेचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीच्या मराठवाडा संघटक कु. प्रियांका लोणे यांनी परभणी येथे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे दर्शन घेतले. त्यांना समितीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी जे कार्य चालू आहे, त्याविषयी माहिती देऊन गोवा येथे होणार्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे निमंत्रणही दिले.
या वेळी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, या ग्रंथांसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले अन्य ग्रंथ आणि ‘सनातन पंचांग २०२४’ भेट देण्यात आले. याप्रसंगी त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना बागेश्वर धाम येथे येण्याचे निमंत्रण देऊन ‘आपण हिंदु राष्ट्राविषयी बोलूया’, असे सांगितले. समिती करत असलेल्या कार्याची पुस्तिका त्यांनी आवर्जून पाहिली.
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्याकु. प्रियांका लोणे यांचा सत्कार !
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी चांगले कार्य करत आहात’, असे म्हणून कु. प्रियांका लोणे यांचा आशीर्वादरूपी सत्कार केला. |