खरी श्रीमंती !

एकदा एक आई आपल्या मुलीला शाळेत सोडायला गेली होती. तिने साध्या पद्धतीचा पंजाबी पोषाख, तर काही मुलींच्या आईने शाळेत सोडायला येतांना आधुनिक पद्धतीचे कपडे घालून ओष्ठशलाका (लिपस्टिक) लावून, थोडाफार मेकअप केलेला होता. जिची आई साधा पोषाख परिधान करून आली होती, त्या मुलीला एका मुलीने विचारले, ‘‘तुम्ही गरीब आहात का ? तुझी आई इतकी साधे कपडे का घालून येते ?’’ त्यावर त्या मुलीने सांगितले, ‘‘आम्ही गरीब नाही.’’ प्रत्यक्षातही तसेच होते. येथे लक्षात घेण्याचे सूत्र, म्हणजे सध्याची लहान मुले कोणत्या प्रसंगातून काय आकलन करून घेतात, हे पहाणे महत्त्वाचे आहे. ‘फॅशनेबल कपडे परिधान करणे, ओष्ठशलाका लावणे, मेकअप करणे, हे श्रीमंतीचे लक्षण आहे’, असा अपसमज नव्या पिढीत निर्माण होत आहे. तसे जर कुणी केले नाही, तर ते मागासलेले किंवा गरीब अशा स्वरूपात त्यांना हिणवले जाते. ही वृत्ती लहान मुलांमध्ये वाढणे, हे भविष्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. शाळेत सोडायला येणार्‍या आईच्या पेहराव्यावरून ही मुले ‘श्रीमंत-गरीब’ असा भेदभाव करू लागली, तर पुढे ती किती जणांना तुच्छ लेखतील, ते सांगता येणार नाही.

चित्रपट, मालिका या माध्यमांतून ‘फॅशन’ या संकल्पनेला ऊत आला आहे. जो तो प्रसिद्धीसाठी भडक कपडे घालून सौंदर्यप्रसाधनांचा अधिक वापर करत आहे. ‘मी सुंदर कि तू सुंदर ?’, अशी चढाओढ लागलेली असते. खरी सुंदरता ही अंतरंगात दडलेली असते. अंतरंगातील सद्गुण, सुस्वभाव ही खरी सुंदरता आहे आणि तीच खरी श्रीमंती आहे. हे ज्ञान मुलांना द्यायला हवे; पण सध्याच्या मुलांसमोर बाह्य श्रीमंतीच स्वतःचे प्रदर्शन करत असल्याने खरी श्रीमंती आणि सद्गुणांचे महत्त्व त्यांना कोण समजावून सांगणार ? काही वर्षांपूर्वी एका मालिकेत शाळेतील दृश्य दाखवले होते. ‘कोणत्या विद्यार्थिनीचे हात सर्वांत सुंदर आहेत ?’, अशी परीक्षा शिक्षिका घेणार होत्या. त्यासाठी प्रत्येक मुलीने आपले हात गोरे आणि सुंदर दिसण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. एका मुलीला प्रतिदिन शेणात काम करावे लागायचे. त्यामुळे तिला हातांची बाह्य सुंदरता राखणे अशक्य होते. ‘आपले हात सर्वांत खराब असतील’, असे तिला वाटत होते. प्रत्यक्षात शिक्षिकेने ‘अन्य मुलींच्या हातांपेक्षा शेणात काम करणारे हातच खरे सुंदर आहेत’, असे सांगून तिला या स्पर्धेत पारितोषिक दिले. ‘कष्ट करणारे हातच सुंदर दिसतात’, हा बोध यातून घ्यायला हवा. बालमनावर योग्य संस्कार होण्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी प्रयत्न करायला हवेत. तसे झाल्यासच भावी पिढी खर्‍या अर्थाने श्रीमंत होईल !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.