धर्मरक्षणार्थ ९ डिसेंबरला आळंदी (जिल्हा पुणे) येथे वारकरी अधिवेशनाचे आयोजन !  

डावीकडून ह.भ.प. अर्जुन महाराज रासकर, ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे, ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे, ह.भ.प. बापू महाराज रावकर आणि श्री. पराग गोखले

पुणे – महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असूनही अद्याप आळंदी, देहू आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्रांना म्हणाव्या अशा सुविधा मिळालेल्या नाहीत. या सुविधा मिळाव्यात,  तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य टिकवण्यासाठी या तीर्थक्षेत्रांच्या परिसरात मद्य आणि मांस यांवर बंदी घालावी, पंढरपूर येथील चंद्रभागा अन् आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी यांसह विविध मागण्यांसाठी ९ डिसेंबर या दिवशी आळंदी येथे १७ व्या वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे होेणार आहे, अशी माहिती पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे, कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, पुणे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अर्जुन महाराज रासकर, तसेच ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे उपस्थित होते.

या वेळी ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे म्हणाले, ‘‘गेल्या १६ वर्षांपासून हे अधिवेशन आयोजित करण्यात येत असून वारकर्‍यांचे विविध प्रश्‍न सातत्याने मांडले जात आहेत. यंदाही अधिवेशनात सहभागी होणारे मान्यवर वारकर्‍यांना मौलिक मार्गदर्शन करणार आहेत.’’

ह.भ.प. तुणतुणे महाराज म्हणाले, ‘‘या परिषदेसाठी पू. अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी), विश्‍व हिंदु परिषदेचे मठाधिपती देवगड संस्थानचे केंद्रीय मार्गदर्शक श्रीमहंत भास्करगिरी महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज हडपे, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. भागवताचार्य केशव महाराज, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्‍वरशास्त्री महाराज, ह.भ.प. गोपाळ महाराज वक्ते यांच्यासह अनेक मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात ब्रिगेडीयर (निवृत्त) हेमंत महाजन यांचे ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि आव्हाने’, तसेच माजी सनदी अधिकारी श्री.अविनाश धर्माधिकारी हेे ‘राष्ट्रासमोरील संकटे’ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.’’

या प्रसंगी ‘श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान समिती आळंदी’च्या विश्‍वस्तपदी निवड झाल्याविषयी ह.भ.प. निरंजननाथजी महाराज, हिंदूभूषण श्री. भारतानंद सरस्वती महाराज आणि ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी भाविक आणि सांप्रदायिक साधक यांनी मोठ्या संख्येने यास उपस्थित रहावे, तसेच अधिक माहितीसाठी ह.भ.प. बापू महाराज रावकर यांना ९९७५५७२६८४ या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.