मुंबईत उद्धव ठाकरे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन !
मुंबई – मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते की, निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने मते मागितली तर तो गुन्हा होतो का ? निवडणूक आयोगाने माझ्या पत्रास उत्तर दिले नाही. याचा अर्थ आम्ही काय मानायचे ? देवाच्या आणि धर्माच्या नावाने मते मागायला तुमची काहीच हरकत नाही, असे आम्ही मानू का ? त्यास तुमची मान्यता आहे, असे मानून आम्ही आगामी निवडणुकीत ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘गणपति बाप्पा मोरया’चा जयघोष करून प्रचार करू. हिंदुत्वाचे प्रश्न उघडपणे मांडू, त्या वेळी तुम्हाला आमच्यावर कारवाई करता येणार नाही. मंत्रालयाच्या परिसरात उद्धव ठाकरे गटाच्या शिवालय या कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी ठाकरे म्हणाले की, कर्नाटकच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बलीच्या नावाने मते मागितली. तर मध्य प्रदेशात अमित शाह यांनी मतदारांना रामलल्लाचे फुकट दर्शन घडवण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिंदुत्वाचे सूत्र घेतल्यावर ६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती, त्यांचा मतदानाचा मूलभूत अधिकारही काढून घेतला होता.