जगातील सर्वांत पुरातन संस्कृती हिंदूंची आहे ! ही संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा यांचा प्रत्येक हिंदूला अभिमान वाटला पाहिजे. हिंदु संस्कृती आणि आपली ऐतिहासिक परंपरा यांचा अभ्यास करणे, हे प्रत्येक हिंदु नागरिकाचे कर्तव्य आहे. आपली हिंदु संस्कृती आणि इतिहास आपल्याला ज्ञात नसेल, तर आपण संस्कृती अन् इतिहास यांची परंपरा अबाधित रहावी; म्हणून संघर्ष करण्यास सिद्ध होणार नाही. हे वास्तव आपण विसरून चालणार नाही.
१. संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा प्राणवायू इतकी महत्त्वाचे असण्यामागील कारण !
आपण आपली हिंदु संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा यांचा अभिमान बाळगला, तर जगातील इतर संस्कृती अन् ऐतिहासिक परंपरा यांचे जतन करणारे लोक दुखावले जातील, अशी खुळचट भावना मनात धरण्याचे काही कारण नाही. एखादी व्यक्ती स्वतःच्या माता-पित्यांना स्वतःचे आदर्श मानत असेल, याचा अर्थ ती व्यक्ती इतरांच्या माता-पित्यांचा अपमान करते, असा होत नाही. अन्य धर्मियांना त्यांच्या ऐतिहासिक परंपरेचा अभिमान आणि त्यांची संस्कृती प्रिय असेल, तर आम्हालाही आमची संस्कृती आमचा ऐतिहासिक परंपरेचा अभिमान जतन करण्याचा नैसर्गिक अधिकार आहे. एखादा समाज ज्या वेळी त्याची ऐतिहासिक परंपरा आणि संस्कृती यांपासून दूर जातो, त्या वेळेला त्या समाजाचे राष्ट्र धोक्यात येते. कोणत्याही समाजाच्या राष्ट्रीय जीवनाचा पाया त्या समाजाची संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा हा आहे; म्हणूनच संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा प्राणवायू इतकी महत्त्वाची आहे.
२. विकृत मनोवृत्तीला साहाय्य करणे, हा मानवी समाजाला सर्वांत मोठा धोका !
हिंदु संस्कृतीने जगाला आकर्षित करून घेतले आहे. ज्याची ज्ञानालालसा जिवंत आहे आणि ज्याची सदसद्विवेकबुद्धी ठिकाणावर आहे, अशी जगातील कोणतीही व्यक्ती हिंदु संस्कृती आणि हिंदूंची ऐतिहासिक परंपरा यांचा द्वेष करणार नाही. जगात राक्षसी आणि विकृत मनोवृत्ती बळावतांना दिसत आहे. दुर्दैवाचा भाग, म्हणजे जे स्वतःला सुशिक्षित, सुविद्य आणि सुसंस्कृत समजतात अन् ज्यांनी समाजात प्रतिष्ठा प्राप्त केली आहे, असा एक मानवी समाज दुष्ट प्रवृत्तींच्या पाठीशी ठामपणे उभा रहातो. विकृत मनोवृत्तीला विरोध करण्याऐवजी तिचे स्तवन करतांना दिसतो. यांच्यापासून मानवी समाजाला सर्वांत मोठा धोका आहे.
३. ‘अहिंसेचा अतिरेक म्हणजे निवळ मूर्खपणा’, याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले विवेचन !
इस्लामिक आतंकवादाने जगाला आज वेठीला धरले आहे. अत्यंत क्रौर्याने वागणारे हे आधुनिक काळातले राक्षस आहेत. त्यांची संस्कृती आणि त्यांचा धर्म हा मानवतेला लागलेला काळीमा आहे. अशा विकृत आणि राक्षसी प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी पुढे सरसावणे म्हणजे हिंसा ! वास्तविक अनैतिकता आणि अन्याय यांच्या विरोधात लढून नैतिकता अन् न्याय प्रस्थापित करणे, हेच मानवतेचे लक्षण आहे. ते प्रस्थापित करण्यासाठी शस्त्राचा उपयोग करणे, हीच अहिंसा आहे. अहिंसेचा अतिरेक, म्हणजे निवळ मूर्खपणा आहे. याचे सप्रमाण उदाहरण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातील ‘सोनेरी पान पाचवे’ यात दिले आहे. त्यासाठी सावरकर यांनी व्हिन्सेंट स्मिथ यांच्या ‘The early history of India’ या पुस्तकातील एक उतारा दिला आहे.
‘‘It is recorded by contemporary testimony that in the 7th century, King Harsh, who obviously aimed at copying closely the institutions of Ashok did not shrink from inflicting capital punishment without hope of person on any person who dare to infringe his commands by saying anything or using flesh as food in any part of his commune, kumarpal a jain king of Gujarat imposed savage penalties upon violators of his (similar) rules. An unlucky merchant who had committed the atrocious crime of cracking a louse was broad before a special court at Anahilwada and punished by the confiscation of his whole property. An other wretch who had outraged the San City of the capital by bringing in a dish of RAW meat was put to death. The special court constituted by Kumar Pal, (for this purpose) had functions similar to those of Ashoka’s censors. And the working of the letter institutions sheds much light on the unrecorded proceedings of the earlier ones.’’
(भावार्थ : तत्कालीन पुराव्यावरून हे सिद्ध होते की, अशोकाप्रमाणेच श्रीहर्षाने सुद्धा अशीच राजाज्ञा सोडली की, जो कुणी कोणत्याही प्राण्याची हिंसा करील किंवा मास खाईल, त्याला फाशी देण्यात येईल. त्याला राजदयेचा सुद्धा आधार मिळणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्या साम्राज्यात मासे, पशू, पक्षी, हिंस्रश्वापद यांना किंवा कोणताही प्राणी मारणार्यांना अन् त्यांचे मास खाणार्यांना वधदंडाची शिक्षा देण्यात येत असे. कुमार पाल हा गुजरातमधील राजा जरी जैनमताचा होता, तरीसुद्धा प्राणी हिंसेच्या प्रकरणी त्याने बौद्ध अशोकाचाच कित्ता पुढे ठेवून त्याच्या राज्यात अशा प्राणी हिंसक आणि मांस खाणार्या अपराध्यांना हुडकून काढण्यासाठी गुप्तहेरांचे जाळे पसरले होते. अशा निष्ठूर राजाज्ञेमुळे अशा अपराधी लोकांना किती रानटी शिक्षा होत असे. याची केवळ वानगीसाठी १-२ प्रमाणित उदाहरणे दिली म्हणजे पुरे. एका अभागी व्यापार्याने त्याच्या अंगावरची एक ‘ऊ’ टिचून मारली. या घोर अपराधासाठी त्याला पकडून येथील विशेष न्यायालयापुढे खेचून त्याची संपत्ती आणि शेतीवाडी जप्त करण्याची शिक्षा देण्यात आली. एक माणूस कच्च्या मांसाचा एक खाद्यपदार्थ राजधानीत आणतांना पकडला गेला, या घोर अपराधासाठी त्याला जिवे मारण्याची शिक्षा ठोठावून त्याला ठार करण्यात आले.
त्या ‘हुतात्मा (martyred) ऊ’चे काय झाले ? ज्या माणसाने आपल्या डोक्यातील ऊ टिचून मारली, त्याची जप्त केलेली मालमत्ता विकण्यात आली. त्या विक्रीतून आलेले सहस्रावधी रुपये व्यय करून त्या ऊचे स्मारक करण्यासाठी एक मोठे स्मृतीभवन जैन आचार्यांच्या सांगण्यावरून त्या जैन राजाने बांधले आणि त्याचे नाव ठेवले यूकविहार, म्हणजे ऊचे मंदिर !)
ही कथासुद्धा इतर कुणी लिहिली असती, तर जैन मताची टवाळी केली, असे वाटले असते; पण स्वतः जैन ग्रंथकाराने ही कथा गौरवाने सांगितली आहे. अशा इतरही अनेक घटना या ग्रंथकारांनी दिलेल्या आढळतात. म्हणून वरील घटना विश्वसनीय म्हणून येथे दिली आहे.
४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विषद केलेले सनातन धर्माचे महत्त्व
या घटनेवर भाष्य करतांना सावरकर लिहितात, ‘‘डोक्यातील ऊवा वाचाव्यात; म्हणून डोकेच उडवायचे. माशाचा जीव वाचवायचा म्हणून माणसाचा जीव घ्यायचा. याला ‘अहिंसा’ असे नाव देण्यात आले. जणू काही माणसाला मारणे, म्हणजे हिंसा नाही, माणसाला काही प्राण नाही. अहिंसेने आततायी झालेल्या या अहिंसेच्या राक्षसी छळाने भारतातील व्याध, म्हणजे शिकारी, मासेमार, कोळी, खारवी, पारधी इत्यादी हिंसात्मक व्यवसाय करणार्या लक्षावधी लोकांच्या उपजीविकेचे साधनच नष्ट झाले.
त्या त्या जातीच्या लक्षावधी लोकांना या राजाच्या या अहिंसात्मक आज्ञेमुळे त्यांची आणि त्यांच्या मुलाबाळांची मात्र उपासमारीने हिंसा झाली. त्याविषयी बरीच चळवळ केल्यानंतर गुजरातमधील धर्मपाल राजाने कृपाळू होऊन दुसरी आज्ञा केली की, असे हिंसात्मक धंदे करणार्या लक्षावधी लोकांनी हे धंदे सोडले पाहिजेत. तथापि त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या पोटगीसाठी ३ वर्षांपर्यंत शासनसंस्थेकडून त्यांना पैसे देण्यात येतील. अर्थात् ३ वर्षांनंतर पुन्हा उपासमारीने त्या लक्षावधी लोकांचे हाल बंद होणार नव्हते; कारण मांस हेच ज्यांचे मुख्य अन्न आहे आणि त्यांना तेसुद्धा फुकट मिळत होते; पण त्या आततायी अहिंसेच्या छळापायी तेच मृत्यूदंड देणारे ठरले. त्यामुळे त्या सर्वसामान्य जनतेत सुद्धा बौद्ध धर्माविषयी आणि त्याच्या राजवटीविषयी अत्यंत संताप उत्पन्न झाला. त्या त्या राज्यातील लक्षावधी जनतेने बुद्ध धर्माचे झूल झुगारून दिले. देशकाल पात्रानुसार आणि मानवी हितकारी अशा सापेक्ष अहिंसेचाच काय तो पुरस्कार करणार्या वैदिक, म्हणजेच त्या काळी अधिक समावेशक स्वरूप असलेल्या सनातन धर्माला लक्षावधी लोक पुन्हा शरण गेले.’’
याचा अर्थ वैदिक धर्म किंवा हिंदु संस्कृती ‘समतोल सांभाळून व्यावहारिक जीवन कसे जगायचे ?’ याची शिकवण देते. आपल्या पूर्वजांनी मानसिक संतुलन ढळू न देता जीवन कसे जगावे ? याचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले आहे. मानवतेचा खरा विचार करून राज्य चालवणारे तत्त्ववेत्ते राजे आपल्या देशात निर्माण झाले आहेत. सम्राट कनिष्काने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली, तरी वैदिक उपास्यांची उपासनाही तो करत असे. प्राणी हिंसा करू नये. ‘शस्त्र विजय हा खरा विजय नसून धर्म विजय हाच खरा विजय’, या गोष्टीला सम्राट कनिष्काने थारा दिला नाही. ‘शस्त्रबळावाचून धर्मविजय पंगू असतो आणि धर्मबळावाचून नुसता शस्त्र विजय पाशवी असतो’, असा सुवर्णमध्य काढून हिंदु संस्कृतीने ऐहिक जीवन सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला आहे.
अशी आपली हिंदु संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा यांचा अभ्यास केल्यास वर्तमान काळात निर्माण झालेल्या समस्यांना कसे सामोरे जायचे अन् त्यावर मात करून स्वतःचे स्वत्व कसे टिकवायचे ? याचे योग्य मार्गदर्शन होईल; म्हणूनच संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा यांचा अभिमान उराशी बाळगला पाहिजे. एवढेच या निमित्ताने सांगण्याचे प्रयोजन !
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२९.११.२०२३)
संपादकीय भूमिकासमस्यांना सामोरे जाऊन त्यावर मात करून स्वत्व टिकवण्याचे मार्गदर्शन हिंदु संस्कृती करते ! |